Advertisement

भांडुपच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची जागा अखेर विकासकाच्या ताब्यात


भांडुपच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची जागा अखेर विकासकाच्या ताब्यात
SHARES

भांडुप येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेतील सुमारे ८ हजार चौरस मीटरची जागा पुन्हा खासगी विकासक रुणवाल कंपनीला देण्यात येणार आहे. मागील अनेक बैठकांमध्ये प्रशासनाविरोधात चीड व्यक्त करत राखून ठेवण्यात येणारा हा प्रस्ताव अखेर सोमवारी सुधार समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.


...म्हणून पालिकेला परत करावी लागली जागा

भांडुप येथील आरक्षणांतर्गत सुमारे १८ हजार चौरस मीटरची जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आली होती. यावर महापालिकेने सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला. परंतु, पुढे या भूखंडावर विकास नियोजन रस्त्यांचे आरक्षण टाकल्यामुळे याचा लाभ मिळवण्यासाठी विकासकाने सरकारदरबारी प्रयत्न केले. परंतु, सरकारने दखल न घेतल्यामुळे विकासक न्यायालयात गेला आणि न्यायालयाने यातील सुमारे ८ हजार चौरस मीटरची जागा पुन्हा विकासकाला देण्याचे निर्देश दिले. मात्र, ही जागा देण्यास सुधार समिती सदस्यांनी तीव्र विरोध करत याबाबतचा प्रस्ताव परत पाठवून दिला होता. असे असताना सप्टेंबर महिन्यात ८ हजार चौरस मीटरची जागा विकासकाच्या ताब्यात देण्यात आली.


अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

मात्र, ही जागा देताना वरीष्ठ कायदेतज्ज्ञांनी यासाठी सुधार समितीच्या मान्यतेची गरज नाही, असा सल्ला दिला होता. त्याचा निषेध मागील बैठकांमध्ये व्यक्त करण्यात आला होता. परंतु, सोमवारी हा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपाचे प्रकाश गंगाधरे यांनी ज्या अधिकाऱ्यांमुळे हा भूखंड द्यावा लागत आहे, त्या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी केली. याला काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनीही पाठिंबा देत अशा प्रकारे कारवाईची मागणी केली.

प्रशासनाकडून उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांनी ही चूक अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाली नसल्याचे स्पष्ट केले. विकास नियोजित रस्त्यासाठीची जागा ही आरक्षणातच मोडत असून त्याचा लाभ त्यांना देण्यात येत आहे. यापुढेही अशा प्रकारे रस्त्याच्या आरक्षणाचा लाभ विकासकांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी ही जागा महापालिकेची असून त्यावर रुग्णालयाचे आरक्षण आहे, ते आरक्षण आगामी विकास आराखड्यात कायम ठेवावे, अशी सूचना करत हा प्रस्ताव मंजूर केला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा