Advertisement

'मुंबई लाइव्ह'चा दणका: म्हाडाची महागडी घरं आता ‘परवडणारी’च!


'मुंबई लाइव्ह'चा दणका: म्हाडाची महागडी घरं आता ‘परवडणारी’च!
SHARES

म्हाडाच्या 'परवडणाऱ्या' घराची किंमत 1 कोटी 61 लाख! या 30 जून रोजी प्रसिद्ध झालेल्या 'मुंबई लाइव्ह'च्या वृत्ताने म्हाडात चांगली खळबळ माजली आहे. सर्वच स्तरातील ग्राहकांना परवडणाऱ्या दरांत घरे देण्याच्या उद्देशाने म्हाडाची स्थापना झाली असली, तरी म्हाडा बिल्डरप्रमाणे महागडी घरे विकत असल्याच्या या वृत्ताने म्हाडावर चौफेर टीका होत आहे.


'मुंबई लाइव्ह'च्या वृत्ताची दखल

म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेतली आहे. काहीही करा, पण तुंगा पवईच्या घरांच्या किमती कमी करा, असे मुख्य अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी खडसावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तुंगा, पवईतील म्हाडाच्या घरांच्या किंमती 25 ते 30 लाखांनी कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


2015 चे किंमत धोरण

ही घरे उच्च उत्पन्न गटासाठी असली तरी हा प्रकल्प म्हाडाचा असल्याने ही घरे खासगी बिल्डरांच्या घरांपेक्षा कमी किंमतीत विजेत्यांना उपलब्ध होणे गरजेचे आहे. परंतु म्हाडाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. टीकेनंतर म्हाडाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी 2015 च्या किंमतीच्या धोरणानुसार घरांच्या किंमती निश्चित करण्याचे आदेशच अधिकाऱ्यांना दिले आहेत.


सर्व घरे स्वस्त होणार

मुख्य अधिकाऱ्यांनी 'मुंबई लाइव्ह'च्या बातमीनंतर सोडतीतील सर्वच घरांच्या किंमतीचा पुन्हा आढावा घेत किंमती कमी करण्याचे फर्मान सोडले आहे. त्यामुळे तुंगा, पवईतील घरांसोबतच इतर प्रकल्पातील घरेही स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


अत्यल्प गटासाठी शोध सुरूच

यंदाच्या लॉटरीत अत्यल्प गटासाठी घरेच नसल्याचे वृत्त 'मुंबई लाइव्ह'ने 1 जुलै रोजी प्रसिद्ध केल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने अत्यल्प गटाच्या घरांची शोध मोहीम तीव्र केली आहे. त्यासाठी सर्वच विभाग कामाला लागले आहेत. अत्यल्प गटासाठी यंदाच्या सोडतीत घरे असणारच, अशी माहितीही मुख्य अधिकाऱ्यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


सोडत लांबण्याची शक्यता

किंमतीचा आढावा आणि अत्यल्प घरांचा शोध यामुळे सोडतीची प्रक्रिया लांबणार असल्याची चर्चा म्हाडात आहे. जुलैच्या पंधरावड्यात जाहिरात प्रसिद्ध करत आॅगस्टमध्ये सोडत काढण्याची तयारी मुंबई मंडळाने केली होती. पण आता ही सोडत पंधरा दिवस तरी पुढे जाण्याची शक्यता आहे.


तुंगा, पवई असो वा सोडतील इतर घरे, या घरांच्या किंमती अजून निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. या किंमती प्राथमिक स्वरुपातील आहेत. अंतिम मंजुरी मिळाल्याशिवाय किंमती निश्चित होत नाहीत. पण घरांच्या किंमती परवडणाऱ्या, कमी असाव्यात, असा आमचा प्रयत्न आहे. त्यानुसार नफा, इतर कर कमी करत 2015 च्या म्हाडा किंमत धोरणानुसार घरांच्या किंमती निश्चित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे म्हाडाच्या लॉटरीतील घरे परवडणारीच असतील.


- सुभाष लाखे, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ, म्हाडा



हे देखील वाचा -

आता म्हाडाची फी भरा ऑनलाईन!

म्हाडाने अखेर ती 159 घरे लॉटरीतून वगळली!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा