Advertisement

फेरीवाल्यांनो, पुन्हा त्याच जागेवर बसून धंदा करा: शशांक राव

फेरीवाल्यांचं पुन्हा सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी करावी आणि त्यांना परवाने देण्यात यावेत, अशी मागणी मुंबई हॉकर्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली.

फेरीवाल्यांनो, पुन्हा त्याच जागेवर बसून धंदा करा: शशांक राव
SHARES

केंद्र सरकारने बनवलेला कायदा अंमलात आणण्याऐवजी फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचं पुन्हा सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी करावी आणि त्यांना परवाने देण्यात यावेत, अशी मागणी मुंबई हॉकर्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली. फेरीवाला धंदा करत असलेल्या ठिकाणीच ही नोंदणी करणं आवश्यक असल्यामुळे फेरीवाल्यांनी कारवाईला न घाबरता पुन्हा आपल्या जागी जावून बसावं, अशी सूचना राव यांनी केली.


फेरीवाल्यांची उपस्थिती कमी

फेरीवाल्यांवर सुरु असलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी मुंबई हॉकर्स युनियनने मुंबईतील फेरीवाल्यांचा आझाद मैदानात मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये संपूर्ण मुंबईतील फेरीवाले सहभागी झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी उपस्थित फेरीवाल्यांची संख्या फारच कमी होती.


नोंदणी जागेवरच हवी

यावेळी फेरीवाल्यांना संबोधित करताना, शशांक राव यांनी, महापालिकेने पुन्हा फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करावं, अशी मागणी केली. महापालिका तसं करणार नसेल, तर युनियनतर्फे फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करून त्यांना ओळखपत्र देऊ. त्यासाठी सर्व फेरीवाल्यांनी पुन्हा आपापल्या जागांवर जावून धंदा करावा. कारण कोणत्याही फेरीवाल्याची नोंदणी तो व्यवसाय करत असलेल्या जागेवरच व्हायला हवी, असं आवाहन राव यांनी फेरीवाल्यांना केलं.


कायद्याची अंमलबजावणी करा

केंद्र सरकारने २०१४ ला बनवलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची आमची मागणी आहे. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी न करता फेरीवाल्यांवर कारवाई करणं योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.


अर्ज भरून घेणार

येत्या २ ते २१ नोव्हेंबर दरम्यान सर्व फेरीवाल्यांकडून युनियनच्या माध्यमातून अर्ज भरून घेतले जाणार असून ते सर्व अर्ज येत्या २१ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला सादर केले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन आजवर कारवाई करण्यात आलेल्या फेरीवाल्यांना पुन्हा धंदा करण्याची मुभा द्यावी, सर्व फेरीवाल्यांची नोंदणी होईपर्यंत त्यांना त्यांच्या जागेवर बसू देण्यात यावं, अशी आमची मागी असल्याचंही राव यांनी सांगितलं. याप्रसंगी हॉकर्स युनियनचे सरचिटणीस शंकर साळवी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.



हेही वाचा-

फेरीवाल्यांचा 'वाल्या'

फेरीवाल्यांना रेल्वे स्थानकापासून 150 मीटर परिसरात एंट्री नाहीच, निरूपम यांना कोर्टाचा दणका



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा