Advertisement

बेस्टच्या संपाला शिवसेना, भाजपाच जबाबदार - विरोधी पक्षनेते


बेस्टच्या संपाला शिवसेना, भाजपाच जबाबदार - विरोधी पक्षनेते
SHARES

बेस्टच्या संपाला पूर्णपणे शिवसेना आणि भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप करत बेस्ट समितीचे ज्येष्ठ सदस्य आणि विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी बेस्टला महापालिकेनेच मदत करायला हवी, असे स्पष्ट केले. महापालिकेकडे पैसे नसल्यास ते राज्य सरकारकडे निधीसाठी मागणी करू शकतात. पण मदतीचा पहिला हात हा महापालिकेनेच द्यायला हवा. मागील 22 वर्षांपासून सेना- भाजपाने बेस्टची वाट लावली असून त्यांच्यामुळेच संपाची वेळ कामगारांवर आली असल्याचा आरोपही राजा यांनी केला.


शिवसेना, भाजपाचे बेस्ट समिती अध्यक्ष

रक्षाबंधनाच्या दिवशी संप पुकारणे हे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे सांगत एकप्रकारे मुंबईकरांना त्रास देण्याचे काम केले आहे. बेस्टची आर्थिक स्थिती ही मागील 15 वर्षांपासून बिघडत चालली आहे. मागील 22 ते 25 वर्षांपासून बेस्ट ही शिवसेना भाजपाच्या ताब्यात आहे. बेस्ट प्रशासनावर नियंत्रण हे बेस्ट समितीचे आहे. गेल्या 22 वर्षांत सेना भाजपाचे नगरसेवकच बेस्ट समिती अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे बेस्टच्या आर्थिक डबघाईला हेच पक्ष जबाबदार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.


बेस्टला मदत करणे बंधनकारक

मुंबईत एकूण बेस्टचे 520 बस मार्ग आहेत. त्यातील 300 बसमार्ग पूर्णपणे तोट्यात आहेत. तर 300 मार्ग हे ना नफा ना तोटयात चालतात. केवळ 2 मार्गच नफ्यात आहेत. बेस्टला सर्वप्रथम महापालिकेनेच मदत करायला हवी. ही आर्थिक मदत पुरवणे महापालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले.


काँग्रेसचा बेस्ट दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार

रक्षाबंधनाच्या दिवशी कामगारांनी संप पुकारल्यामुळे सोमवारी एकही बस रस्त्यावर धावली नाही. संप मागे घेतला तरी प्रत्यक्षात मध्यरात्रीनंतरच बेस्ट बस रस्त्यावर धावणार असल्यामुळे मुंबईकरांची मोठी गैरसोय होणार आहे. परंतु प्रवाशांचे हाल करून बेस्ट दिन साजरा करण्यात येत आहे, हे आम्हाला पटणार नसून याचा निषेध म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने या कार्यक्रमाला न जाता बहिष्कार घालण्यात येणार असल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्पष्ट केले. काँग्रेससोबत भाजपाच्या बेस्ट समिती सदस्यांनीही याचा निषेध करत बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला असल्याचेही समजते.



हेही वाचा

उद्धव ठाकरेंच्या आश्वासनानंतर बेस्टचा संप मागे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा