दिवसेंदिवस शाळांमध्ये वाढणाऱ्या फीमुळे पालक पुरते हैराण झाले आहेत. दरवर्षी एवढे पैसे आणायचे कुठून? असा प्रश्न पालकांना पडलाय. असाच फी वाढीचा फटका लोखंडवाला शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना बसला आहे. या शाळेने तर कहरच केला आहे. केजीतून पहिलीत जाण्यासाठी चक्क प्रवेश फी या शाळेने आकारली आहे.
1500 रुपये प्रवेश फीच्या नावाखाली ही शाळा घेणार आहे. तसेच री अॅडमिशनसाठी 25,000 रु, सुरक्षेसाठी 30,000 रुपये फी ही शाळा आकारणार आहे. महत्त्वाचे म्हणजे 15 एप्रिलपर्यंत प्रवेश न घेतल्यास प्रवेश रद्द करण्यात येणार असल्याचे शाळेने सांगितले. विशेष म्हणजे याबाबत पालकांनी थेट शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार करूनही त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे ‘फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन’चे प्रमुख जयंत जैन आणि पालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता 'आम्ही लवकरच शाळा आणि पालकांची एकत्रित बैठक घेऊ, त्याचप्रमाणे वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल असं अश्वासन विनोद तावडे यांनी दिलं'.

तर दुसरीकडे डोंबिवलीच्या ओमकार इंटरनॅशनल स्कूलने यावर्षी शाळेच्या फीमध्ये 45 टक्के वाढ केली आहे. पुस्तके, सहल वार्षिक स्नेहसंमेलन, स्कूलबस या सगळ्यांची फी या शाळेने वाढवली आहे. त्यामुळे पालकांच्या भुवया उंचवाल्या आहेत. एवढी फी वाढवताना शाळेने किमान कल्पना द्यायला हवी होती. 45 टक्के एवढी फीवाढ न करता 10 टक्क्यांपर्यंत फी वाढ केली असती तर आमचा त्याला विरोध नसता, अशी प्रतिक्रिया पालकांनी देत शुक्रवारी यासंदर्भात मुख्याध्यापकांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
