Advertisement

मुंबईच्या पुराबाबत सत्ताधारी आणि पहारेकरी मूग गिळून, विरोधक आक्रमक


मुंबईच्या पुराबाबत सत्ताधारी आणि पहारेकरी मूग गिळून, विरोधक आक्रमक
SHARES

२९ ऑगस्ट रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत निर्माण झालेली पुरसदृश्य परिस्थिती शिवसेना आणि भाजपाला मान्य आहे. पुरसदृश्य परिस्थितीमुळे मुंबईकरांना झालेल्या त्रासाची चिंता, तसेच दु:ख शिवसेना आणि पहारेकरी म्हणवणाऱ्या भाजपाला आता राहिलेली नसून स्थायी समितीत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मांडलेल्या सभातहकुबीवर त्यांनी एक चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे एकप्रकारे सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्यावर आरोप करणारे पहारेकरी म्हणवणाऱ्या भाजपाने मूग गिळून प्रशासनाची पाठराखणच केली आहे. त्यामुळे काँग्रेससह, मनसे, सपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग करतच सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनाचा तीव्र निषेध केला.


... तर मग डॉ. अमरापूरकर मॅनहोल्समध्ये पडले कसे?

मुंबईत २९ ऑगस्ट रोजी निर्माण झालेल्या पुरस्थितीबाबत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात सभा तहकुबी मांडली. चितळे समितीच्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप राजा यांनी केला. भरती नसतानाही मुंबईत पाणी तुंबले आणि आहोटी झाल्यानंतरही ते कमी झाले नाही. त्यामुळे याला महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना पक्षच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मुंबईतील प्रत्येक मॅनहोल्सवर महापालिकेचा कामगार राहील असे निवेदन आयुक्तांनी केले होते, तर मग डॉ. अमरापूरकर यांचा मृत्यू मॅनहोलमध्ये पडून झाला कसा? असा सवालही त्यांनी केली.


एकदा नालेसफाई करूच नका!

या पुराने मुंबईला पुन्हा एकदा शिकवले असल्याचे सांगत काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांनी सफाई करूनही जर पाणी तुंबत असेल, तर एक वर्ष नालेसफाई करुच नये, अशी सूचना केली. तसेच या पुरावेळी पंप सुरु नव्हते. त्यामुळे या सर्वांचे पैसे देण्यात येऊ नयेत. त्याबरोबर ज्या ज्या रस्त्यांवर पाणी तुंबले होते, त्या रस्त्यांची विशेष काळजी घेण्याची सूचनाही झकेरिया यांनी केली.


'आयुक्तांनी जबाबदारीने विधान करावे'

मुंबईत पाणी तुंबणार हे सत्य आहे. पण इथे पाणी तुंबणारच नाही, असे विधान आयुक्तांनी केले. त्यामुळे आयुक्तांनी जबाबदारीने असे विधान करायला हवे. असे विधान करून एकप्रकारे आयुक्तांनी मुंबईकरांची दिशाभूल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केला. मुंबईतील आपत्कालिन नियंत्रण कक्ष व विभाग कार्यालयांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे आता परिमंडळ निहाय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावे आणि त्यामध्ये महापालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात यावेत, अशी सूचना जाधव यांनी केली.


मुंबई पावसामुळे नव्हे, तर विकासकांमुळे तुंबली!

मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी मिठी नदीचा विकास होतच नसल्याची तक्रार करून, गेल्या बारा वर्षांपासून एकच कंत्राटदार याचे कंत्राट मिळवत आहे. परंतु प्रत्यक्षात तो या मिठीची सफाईच करत नसल्याचा आरोप केला. त्यामुळे येथील क्रांतीनगरसह अनेक घरांमध्ये पाणी शिरते. त्याकरता आयुक्तांनी येथील सर्व अतिक्रमण हटवून मिठी नदी रुंदीकरण करावे, अशी आर्जवी लांडे यांनी केली. मुंबई पावसामुळे नाही तर विकासकांमुळे तुंबल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक विकासकांनी नाले वळवले, तर काही बंद केले. त्याचा परिणाम २९ ऑगस्टला दिसल्याचे त्यांनी सांगितले.


'या पावसामुळे शिकलो'

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पत्रकार परिषदेची टेप रिवाईंड करून स्थायी समितीला ऐकून दाखवत पूरपरिस्थितीबाबत प्रशासन किती गंभीर आहे, याचीच माहिती दिली. या पावसामुळे आपण काही शिकले पाहिजे असे सांगत येत्या शुक्रवारी सर्व अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली असून यामध्ये पुढे काय केले पाहिजे, याबाबतची मते व सूचना जाणून घेऊन कृती आराखडा तयार केला जाणार आहे, असे सांगितले.


शिवसेना-भाजपाची तेरी भी चूप, मेरी भी चूप...

विरोधकांच्या या सभा तहकुबीवर सत्ताधारी पक्षाच्या वतीने सभागृहनेते यशवंत जाधव व पहारेकरी पक्षाचे गटनेते मनोज कोटक यांनी, तसेच त्यांच्या पक्षाच्या सदस्यांनी एक अवाक्षरही काढले नाही. त्यामुळे मुंबईत तुंबलेल्या पाण्याबाबत शिवसेना किती गंभीर आहे, हे उघड सत्य आहेत. पण त्यांच्यावर आरोप करणारी भाजपाही चिडीचूप राहिल्यामुळे मुंबईकरांना पुरात लोटणे या दोन्ही पक्षांना मान्य असल्याचेच उघड झाले. त्यामुळे अखेर विरोधी पक्षनेत्यांना ही सभा तहकुबी मागे घेण्याची सूचना अध्यक्षांनी करताच त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत सर्व विरोधी गटांच्या सदस्यांसह सभात्याग केला.



हेही वाचा

या ७ कारणांमुळे तुंबली मुंबई !


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा