मुंबईतील १६९ अनधिकृत धार्मिक स्थळांवर होणार कारवाई


SHARE

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेकडून मुंबईतील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू आहे. ही कारवाई १७ नोव्हेंबर २०१७ अगोदर करण्यात यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुंबईत ४९५ अनधिकृत धार्मिक स्थळे होती. यापैकी ३२६ धार्मिक स्थळांवर यापूर्वीच कारवाई करण्यात आली असून उर्वरीत १६९ धार्मिक स्थळांवरील कारवाई अद्याप बाकी आहे. याबाबत सर्व सहाय्यक आयुक्तांनी नियोजन पद्धतीने तसेच मुदतीपूर्वी ही कारवाई पूर्ण करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालयात महापालिका अधिकाऱ्यांची मासिक आढावा बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, आय. ए. कुंदन, आबासाहेब जऱ्हाड, उपायुक्त रमेश पवार यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.


९० टक्के खड्डयांच्या तक्रारींचे निवारण

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण तुलनेने कमी झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. यावर्षी १ एप्रिल २०१७ ते ४ ऑक्टोबर २०१७ या सहा महिन्यांपेक्षा अधिकच्या कालावधीदरम्यान १ हजार ४६३ खड्डे विषयक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापैकी १ हजार ३२७ तक्रारींचे अर्थांत ९०.७० टक्के इतक्या तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

सन २०१४ - १५ मध्ये महापालिकेकडे १४ हजार ४५५ खड्डे विषयक तक्रारी आल्या होत्या. सन २०१५ - १६ मध्ये ५ हजार ३१६; तर सन २०१६ - १७ मध्ये ४ हजार ४७८ खड्डे विषयी तक्रारी महापालिकेला मिळाल्या होत्या.


खंड्ड्यांनी गिळले फक्त १३ हजार ३४ मेट्रीक टन डांबर

खड्डयांच्या तक्रारींनुसार मुंबईतील खड्डे महापालिकेने बुजवले आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात आलेल्या डांबराचा विचार करता यंदा निम्म्यापेक्षाही कमी डांबर लागल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

सन २०१५ - १६ मध्ये २५ हजार १३० मेट्रीक टन एवढे डांबर वापरण्यात आले होते. त्यानंतर २०१६ - १७ मध्ये २९ हजार ६३७ मेट्रीक टन एवढे डांबर वापरण्यात आले होते. पण यावर्षी आतापर्यंत १३ हजार ३४ एवढे मेट्रीक टन डांबर वापरण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्तांच्या बैठकीत रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली .


हेही वाचा - 

मुंबईकरांना यंदा पावसाळ्यात खड्डेमुक्त रस्ते - आयुक्त अजोय मेहताडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय