Advertisement

फोर्ट इमारत दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, अद्याप बचावकार्य सुरुच


फोर्ट इमारत दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, अद्याप बचावकार्य सुरुच
SHARES

दक्षिण मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरात गुरूवारी ५ मजली इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून, तर ३ जण जखमी आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या २३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं असून अद्यापही बचावकार्य सुरु आहे.

गुरुवारी संध्याकाळी ४:४५ वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील टपाल मुख्यालयाजवळील ५ मजली 'भानुशाली' इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत मदत कार्याला सुरूवात केली. रात्रभर सुरु असलेलं बचावकार्य अजूनही सुरु आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत उपकरप्राप्त इमारत होती. जर्जर झालेल्या या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ‘म्हाडा’कडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्यात आले होते. 

महापालिकेकडूनही आवश्यक ती परवानगी देण्यात आली होती. या इमारतीचं १ एप्रिलपासून दुरुस्तीचं काम सुरू करण्यात येणार होते. परंतु टाळेबंदीमुळे हे काम सुरू होऊ शकले नाही, अशी माहिती येथील स्थानिकांनी दिली. जर्जर झालेली ही इमारत त्वरित रिकामी करण्याची गरज होती. मात्र, तरीही रहिवासी या इमारतीत वास्तव्यास होते, असे आसपासच्या इमारतींमधील रहिवासी सांगत होते.

इमारतीचा एका बाजूचा भाग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळला आणि प्रचंड मोठा आवाज झाला. आवाज ऐकून या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. स्थानिक रहिवाशांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची अग्निशमन दलाला माहिती दिली. या इमारतीचा एका बाजूचा संपूर्ण भाग कोसळला, तर दुसऱ्या भागात रहिवासी अडकले होते. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि आवश्यक वाहनं घटनास्थळी दाखल झाली. कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा उपसण्यासाठी महापालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयानं ५० कामगारांची फौज उपलब्ध केली. कोसळणाऱ्या पावसामुळं बचावकार्यात अडथळा येत होता.



हेही वाचा -

अखेर डहाणू ते चर्चगेट लोकल रुळावर, अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना दिलासा

महापालिकेनं अखेर नाल्यावरील 'तो' फलक हटवला



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा