Advertisement

'आपला वडापाव' खाऊन मुंबईकरांची मयुरेच्या कुटुंबाला आर्थिक मदत


'आपला वडापाव' खाऊन मुंबईकरांची मयुरेच्या कुटुंबाला आर्थिक मदत
SHARES

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीतील बळी मयुरेश हळदणकरच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी शनिवारी मुंबईकरांनी 'आपला वडापाव'च्या स्टाॅलवर मोठी गर्दी केली. सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत तब्बल ५ हजार वडापावची विक्री झाली. रात्री ८ वाजेपर्यंत वडापाव विक्री सुरू राहणार असून यातून जमा होणारी रक्कम रात्री साडेआठ वाजता मयुरेशच्या वडिलांच्या हाती सोपवण्यात येणार आहे. ५ रुपयांच्या वडापाव खरेदीतून मुंबईकरही 'फुल ना फुलाची पाकळी' या रुपाने मयुरेशच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत अाहेत.

२१ वर्षीय मयुरेशचा एल्फिन्स्टन दुर्घटनेत मृत्यू झाला. मयुरेशच्या रुपात त्याच्या कुटुंबाने एकमेव कमावता हात गमावल्यानं हळदणकर कुटुंबावर मोठं आर्थिक संकट ओढावलं आहे. आजारी आई, शिक्षण घेणारी छोटी बहिण आणि वृद्ध वडील असं त्याचं कुटुंब असून यापैकी कुणीही कमावणारं नाही. त्यामुळे या कुटुंबाला आर्थिक मदतीची तातडीने गरज आहे. 

ही गरज ओळखून परळ एसटी डेपो इथं 'आपला वडापाव' नावानं ५ रुपयांना वडापावची विक्री करणाऱ्या मंगेश अहिवळे यांनी १४ आॅक्टोबर रोजी वडापाव विक्रीतून जमा होणारी रक्कम मयुरेशच्या कुटुंबाला देण्याचं ठरवलं. त्यासाठी मुंबईकरांना आवाहनही केलं.


मुंबईकरांची स्टाॅलवर गर्दी

त्यानुसार शनिवारी सकाळी १० वाजल्यापासून परळ एसटी स्टॅण्डजवळील सारथी हाॅटेलसमोरील आपला वडापाव स्टाॅलवर वडापाव विक्रीला सुरूवात झाली. सुरूवात झाल्याबरोबर मुंबईकरांनी या स्टाॅलवर गर्दी करण्यास सुरूवात केली. अगदी शिस्तीत, रांगेत उभं राहून मुंबईकर वडापाव खरेदी करून मयुरेशच्या कुटुंबाला मदत करताना दिसत आहेत. मुंबईकरांकडून अहिवळेंच्या या उपक्रमाचं कौतुकही होत आहे. आपण कुणाच्यातरी मदतीला उपयोगी पडत असल्याच्या भावनेने मुंबईकरही सुखावत आहेत.



मयुरेशच्या कुटुंबाला भेटल्यानंतर एकच ध्येय होत ते म्हणजे त्याच्या कुटुंबाला काही तरी मदत करायची. ते ध्येय आज पूर्ण होत आहे. मुंबईकर वडापाव खरेदी करून उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. त्याबद्दल खरं तर मुंबईकरांचे धन्यवाद. रात्री ८ वाजता वडापाव विक्री संपेल आणि त्यानंतर जी काही रक्कम जमा होईल ती याच स्टाॅलवर मयुरेशच्या वडिलांच्या हाती सुपूर्द केली जाईल.

-मंगेश अहिवळे, आपला वडापाव, मालक



'आपला वडापाव'च्या या उपक्रमातून राजकारण्यांसह इतर मुंबईकरांनी बोध घेतला, तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं कुटुंब असो वा दुर्घटनेत बळी गेलेल्या मयुरेशसारख्या पीडितांचं कुटुंब असो, सरकारकडे हात पसरण्याची खरोखर वेळ येणार नाही.


सोशल मीडिया आणि न्यूजमधून आम्हाला दोन दिवसांपूर्वी या उपक्रमाविषयी समजलं. तेव्हाच विचार पक्का केला की या स्टाँलला भेट देत वडापाव विकत घ्यायचा आणि मदत करायची. त्यामुळेच मी आणि माझा मित्र सकाळीच दिव्याहून परळला पोहोचलो आहे. आता आम्ही ५० वडापाव आमच्या आॅफिसमधील लोकांसाठी खरेदी केले आहेत.

-विक्रम तेलंग, ग्राहक


नेहमी आम्ही वडापाव विकत घेतो. पण आज सायनवरून खास आम्ही येथे वडापाव खाण्यासाठी आलो आहोत. आज वडापाव विकत घेताना आणि खाताना एक वेगळेच समाधान आणि आनंद वाटत आहे. वडापावच्या माध्यमातून आपण एखाद्याला मदत करू शकतो हे कधी वाटले नव्हतं. आज मी प्रत्यक्षात ते अनुभवत आहे. त्यामुळे खूप छान वाटत आहे.

-जुईली आंब्रे, ग्राहक


हेही वाचा -

वडापाव पेपरमध्ये गुंडाळून विकण्यास बंदी? महापालिकेत आणणार ठराव


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा