उकाड्यामुळे तहान लागल्यास प्रवाशांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होऊ नयेत, यासाठी आयआरसीटीसी कंपनीतर्फे रेल्वे स्थानकावर वॉटर वेंडिंग मशीन लावण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी लावण्यात आलेल्या वॉटर वेंडिंग मशीन अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बंद आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या वॉटर वेंडिंग मशीन बंद अवस्थेतच आहेत. मात्र अजूनही प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्षच होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे ऐन उकाड्यात प्रवाशांना पाणीच उपलब्ध होत नसल्यामुळे प्रवाशांची पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होत आहे.
रेल्वे प्रशासनाने ऐन उकाड्यात प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी वॉटर वेडिंग मशीन बसवल्या, या मशिनच्या प्रसिद्धीचा गाजावाजा देखील सोशल मीडियातून करण्यात आला होता. मात्र अपुऱ्या आणि बंद मशीनमुळे आम्हा प्रवाशांना तहानलेलेच राहावे लागत आहे.
- राजू दळवी, प्रवासी
चर्चगेट ते विरार दरम्यान 20 वॉटर वेंडिंग मशीन बसवण्यात आल्या आहेत. या मशीनद्वारे अवघ्या 2 रुपयांत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. मात्र बहुतांश मशीन बंदच आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना स्थानकांवरील केटरिंग सेंटरमधून रेल निरच्या पाण्याची बाटली विकत घ्यावी लागत आहे. 2 रुपये मोजून पाण्याची सोय केलेली असताना मशीन बंदमुळे प्रवाशांना रेल नीरसाठी 15 मोजावे लागत असल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यात उकाडयामुळे रेल नीरची मागणी वाढत असताना अनेकदा थंड पाणी मिळत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. वर्दळीच्या स्थानकांवर वाढती गर्दी पाहता एक वॉटर वेंडिंग मशीन देखील अपुरी पडत आहे. उकाड्यामुळे या मशीनभोवती प्रवाशांची पाणी पिण्यासाठी झुंबड पहायला मिळत आहे. याबाबत अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे.
वॉटर वेंडिंग मशीनच्या देखभालीसाठी एक व्यक्ती असते. त्या बंद असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यावर आमचे काम सुरु आहे.
- आरती सिंह परिहार, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक
मध्ये रेल्वे स्थानकांवर पाणी टंचाई