SHARE

मलबार हिल - देशात 1 जुलै 2017 पासून जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे या कर प्रणालीच्या अनुषंगाने राज्यातील उद्योग व व्यापारी जगताने तयार राहावे, असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले.

रविवारी सह्याद्री अतिथीगृहात राज्यातील विविध उद्योग- व्यापार क्षेत्रातील संघटनांना जीएसटी कराबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांसमोर आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली. या सर्व उद्योग-व्यापाऱ्यांच्या आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधींच्या अडचणी अरुण जेटली यांनी समजून घेतल्या. या बैठकीला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, अर्थराज्य मंत्री दीपक केसरकर, आमदार मंगलप्रभात लोढा, व्यापार आणि उद्योग जगतातील विविध क्षेत्राचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पेट्रोलियम पदार्थ जीएसटीअंतर्गत आणण्याकरता जीएसटी अंमलबजावणीनंतर जमा होणारा महसूल लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल आणि पेट्रोलियम पदार्थ जीएसटीअंतर्गत घेण्याबाबत जीएसटी कौन्सिल निर्णय घेऊ शकेल, असंही अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले.

जीएसटी यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक - सुधीर मुनगंटीवार

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या नवीन कर प्रणालीतील तरतुदी या सहज-सोप्या असतील असे सांगून राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रनिहाय प्रतिनिधींशी आपण बोललो आहोत. त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील काही महत्त्वाच्या अडचणी थेट केंद्रीय अर्थमंत्र्यांसमोर मांडता याव्यात म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते, असेही मुनगंटीवार म्हणाले. तसेच आता जीएसटीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले.

देशाच्या एकूण सेवा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचे योगदान 19.8 टक्क्यांचे आहे. राज्याचा विकास दर 2014 च्या 5.4 टक्क्यांच्या तुलनेत 9.4 टक्के इतका वाढवण्यात शासनाला यश मिळाले आहे. थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हेच सर्वाधिक पसंतीचे राज्य ठरले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या