मुंबईत पुन्हा हिट अॅण्ड रन, एकाला अटक


मुंबईत पुन्हा हिट अॅण्ड रन, एकाला अटक
SHARES

भरधाव वेगाने गाडी चालवण्याचा नाद सध्या अनेकांना जडला आहे. 'मद्यपान करुन गाडी चालवू नये' अशी जनजागृती वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत असली तरी बहुसंख्य वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसतात. त्यामुळेच मुंबईत दिवसेंदिवस अपघाताच्या घटनेत वाढ होत आहे. गुरुवारी सकाळी मुलुंड पश्चिमेकडील पाच रस्ता येथेही अशाच प्रकारचा एक दुर्दैवी अपघात घडला.



हे देखील वाचा -  

भरधाव वेगामुळे झाला अपघात



एका होंडा सिटी मोटारने धडक दिल्याने 95 वर्षीय शांताबाई जोशी या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. शांताबाई या मुलुंडमधील एम. जी. रोड येथील सीताबाई चाळीत राहात होत्या. त्यांचे कोणीही नातेवाईक नसून त्या एकट्याच राहात होत्या. वय झाल्याने त्यांना नीटसे चालताही येत नव्हते. परंतु, अशा अवस्थेतही त्या रोज सकाळी चहा पिण्यासाठी पाच रस्ता विभागात जात असत. गुरुवारी सकाळी देखील त्या चहा पिण्यासाठी पाच रस्ता चौक येथे जात होत्या. तेव्हा, भरधाव वेगात असलेल्या एका होंडा सिटी कारने त्यांना धडक दिली. त्यात शांताबाई गंभीर जखमी झाल्या. चालकाने मात्र तेथून पळ काढला. स्थानिकांनी याची माहिती मुलुंड पोलिसांना दिली. तेव्हा घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जखमी शांताबाई यांना उपचारासाठी पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठवला. 


आरोपीला ठोकल्या बेड्या

या प्रकरणी आरोपी संतोषकुमार पांडे याला मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संतोषकुमार हा एका खाजगी कंपनीत असिस्टंट जनरल मॅनेजर पदावर कार्यरत आहे. 22 जूनला सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास तो आपल्या मुलीला क्लासला सोडण्यासाठी मुलुंड स्टेशनकडे जात होता. त्यावेळी पाच रस्ता सिग्नलवर त्याने त्या ठिकाणी रस्ता ओलांडणाऱ्या 95 वर्षीय शांताबाई जोशी यांना उडवून तिथून फरार झाला. या अपघातात शांताबाईंचा जागीच मृत्यू झाला होता. पाच रस्ता चौकात असलेल्या सीसीटीव्हीमुळे पोलिसांना संतोषकुमारपर्यंत पोहोचता आले. शनिवारी संतोषकुमारला ताब्यात घेत त्याच्याविरोधात कलम 304, 304 अ, 279 अंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याची हाँडा सिटी कार ताब्यात घेतली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे अशी, माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी दिली.


सलमान खान हिट अँड रन प्रकरण


2002 साली वांद्र्याच्या रस्त्यावरती अभिनेता सलमानने दारूच्या नशेत गाडी चालवत रस्त्यावर झोपलेल्या पाच लोकांना उडवले होते. ज्यात एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयाने सलमानला सदोष मनुष्य वधाच्या आरोपाखाली दोषी ठरवत 5 वर्षाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने मात्र, या प्रकरणी सलमानची निर्दोष मुक्तता केली होती.


मुंबईत गेल्या काही वर्षांतील हिट अॅण्ड रनच्या घटना

  • 12 नोव्हेंबर 2006 - मद्यधुंद अवस्थेत असलेला एका उद्योपतीचा मुलगा अ‍ॅलिस्टर अ‍ॅन्थनी परेरा याने सुसाट वेगाने गाडी चालवत वांद्रे येथील कार्टर रोडच्या     पदपथावर झोपलेल्या सात बांधकाम मजुरांना उडवले. अभिनेता अर्शद वारसीने मुख्य भूमिका साकारलेला जॉली एलएलबी हा हिंदी सिनेमा याच सत्य घटनेवर आधारित होता 
  • 8 नोव्हेंबर 2013 - अंधेरीत भरधाव वेगात असलेल्या स्कोडा कारने दिलेल्या धडकेत एका सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेतील आरोपी डॉक्टर महिलेला कालांतराने जामिनावर सोडून देण्यात आले
  • 30 जानेवारी 2010 - दारुच्या नशेत असलेल्या नूरी हवेलीवाला या अनिवासी भारतीय महिलेने वेगात गाडी चालवत सहा जणांना चिरडले
  • 22 जानेवारी 2015 - मस्जिद बंदरच्या क्रॉफर्ड मार्केटजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने फूटपाथवरील 5 नागरिकांना चिरडले



हे देखील वाचा -

महिला कारचालकाची पोलिसांवर दादागिरी




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा