अाॅईलच्या नावाखाली ३० लाखांचं पाणी विकलं, नायझेरियनला अटक


अाॅईलच्या नावाखाली ३० लाखांचं पाणी विकलं, नायझेरियनला अटक
SHARES

मुंबईतल्या एका कपडे व्यापाऱ्याला आॅईलऐवजी ३० लाख रुपयांचे पाणी विकून फसवणूक करणाऱ्या नायझेरियन नागरिकासहीत एकाला अटक करण्यात ना.म.जोशी मार्ग पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


सॅम्पल खरेदी

ना.म.जोशी मार्ग परिसरात राहणारे तक्रारदार ईश्वर रामाणी यांचा कपड्याचा व्यवसाय आहे. रामाणी यांना काही दिवसांपूर्वी एक फोन आला होता. इंग्लडमध्ये काॅसमॅटीक आॅईलला मोठी मागणी असते. भारतात त्याची किंमत कमी असून इंग्लडमधील कंपनीला तुम्ही भारतातून हे आॅईल खरेदी करून विकले तर दलाली स्वरूपात मोठी रक्कम पदरात पडू शकते, असं आमिष फोनवरील व्यक्तीने दाखवले. मनात लालसा निर्माण झाल्याने व्यापाऱ्याने हा व्यवहार करण्याचे ठरवले. मात्र, समोरील व्यक्तीने पहिल्यांदा सॅम्पल म्हणून ६८ हजार रुपयांचे आॅईल खरेदी करून ते तपासणीत पास झाल्यानंतरच आॅर्डर कंपनीकडून घेतली जात असल्याचं सांगितलं. त्यानुसार व्यापाऱ्याने सॅम्पल स्वरूपात ते आॅईल घेऊन तपासणीसाठी त्या नायझेरियनला दिले.


आॅईल पाठवल्याचा मेल 

 काही तासातच आॅईलचे नमुने पास झाले असून कंपनीने ३० लिटर आॅईल पाठवल्याचा मेल फोनवरील व्यक्तीने रामाणी यांना पाठवला. त्यानुसार रामाणी यांनी १२ आणि १३डिसेंबरला वेगवेगळ्या स्वरूपात ३० लाख रुपये देऊन आॅईल खरेदी केले. मात्र, आॅईल कंपनीत आॅईल कमी असल्याचं कारण देऊन तेथून फक्त १७ लिटर आॅईल पाठवले. उर्वरित आॅईल लवकरच पाठवतो असं रामानी यांना सांगण्यात आलं. 


कॅनमध्ये पाणी

याच दरम्यान इंग्लडमध्ये ज्या कंपनीशी रामाणी यांनी व्यवहार केला त्या कंपनीकडून ६० लिटर आॅईल हवे असल्याचा मेल केला. त्यानुसार रामाणी यांनी भारतातील आॅईल पुरवठादाराकडे विचारणा केली असता त्यासाठी आगाऊ रक्कम मोजावी लागेल असं सांगण्यात अालं. कालांतराने या व्यवहारावर रामाणी यांना संशय येऊ लागला. या व्यवहाराबाबत त्यांनी आपल्या एका जवळच्या मित्राला सांगितल्यानंतर त्याने संबधित खरेदी केलेले आॅईल हे नेमके काय आहे ते पाहण्यासाठी सांगितले. रामाणी यांनी आॅईलचे कॅन फोडल्यानंतर त्या कॅनमध्ये आॅईल नसून पाणी असल्याचं दिसून अालं. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रामाणी यांनी पोलिसात धाव घेतली. 


२६ डिसेंबरपर्यंत कोठडी 

पोलिसांनी रामाणी यांना समोरील व्यवहार सुरू ठेवण्यास सांगून आरोपींना गाफील ठेवण्यास सांगितलं. तसंच पुढील आॅर्डर कॅश स्वरूपात देण्यात येईल असं कळवलं. दरम्यान हॅन्ड्री नावाचा नायझेरियन पैसे घेण्यासाठी आला असताना पोलिसांनी त्याला अटक केली. त्या नायझेरियन तरुणाच्या चौकशीतून त्या टोळीत सहभागी असलेल्या एका भारतीय तरुणालाही ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.  न्यायालयाने दोन्ही आरोपींना २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा - 

लैंगिक अत्याचार करून अल्पवयीन मित्राची हत्या

बनावट ड्रायव्हिंग लायसन्स देणारी टोळी गजाआड




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा