धावत्या लोकलमधून मुलीची उडी: ४ दिवसानंतर आरोपी गजाआड

महिलांच्या डब्यात घुसून १३ वर्षीय मुलीला चालत्या ट्रेन मधून उडी मारण्यास भाग पडणाऱ्या नराधमाला अखेर जीआरपीने अटक केली आहे.

धावत्या लोकलमधून मुलीची उडी: ४ दिवसानंतर आरोपी गजाआड
SHARES

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात महिलांच्या डब्यात घुसून १३ वर्षीय मुलीला चालत्या ट्रेन मधून उडी मारण्यास भाग पडणाऱ्या नराधमाला अखेर जीआरपीने अटक केली आहे. अश्रफअली करीमुल्ला शेख (२५) असं या आरोपीचं नाव असून त्याला याआधी मोबाइल चोरीच्या गुह्यात अटक झाल्याची माहिती जीआरपीने दिली.


काय आहे प्रकरण?

रविवार २२ ऑक्टोबरच्या सकाळी १३ वर्षीय विद्यार्थीनीने क्लासला जाण्याकरीता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून लोकल पकडली. रविवार असल्याने ती गाडीत एकटीच होती. ९ वाजून २९ मिनिटांनी गाडी सुटते न सुटते तोच एक अनोळखी इसम महिलांचा डब्यात चढला.

तेव्हा या मुलीने हा महिलांचा डब्बा असून तुम्ही पुढच्या स्थानकात उतारा असं त्याला सांगितल. त्यावर आरोपीने मुलीला गप्प बसण्यास सांगत मुलीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने चेन ओढून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडी थांबली नाही. शेवटी धीर एकवटून या मुलीने चालत्या ट्रेन मधून उडी मारली. या दुर्घटनेत ती गंभीर जखमी झाली असून तिला सेंट. जॉर्ज. रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


'अशी' झाली अटक

गुन्हा दाखल होताच जीआरपीने तपासाला सुरूवात केली. 'सीएसएमटी' तसेच मस्जिद बंदर स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली. त्यानुसार आरोपीचा शोध सुरू झाला.  

आरोपी गुरुवारी 'सीएसएमटी' स्थानकात येणार असल्याची खबर मिळताच पोलीस निरीक्षक विलास चौगुले आणि त्यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतल्याची माहिती रेल्वे जीआरपीचे पोलीस उप आयुक्त समाधान पवार यांनी दिली.


मोबाइल चोरीचा गुन्हा

चौकशीत अश्रफअली करीमुल्ला शेख (२५) नावाच्या या आरोपी विरोधात दादर जीआरपीमध्ये मोबाइल चोरीच्या गुन्ह्याची नोंद असल्याचं स्पष्ट झालं. अश्रफअली तुरूंगातून बाहेर आल्यावर त्याने हे कृत्य केल्याचं समजतंय. शुक्रवारी त्याला कोर्टात हजार केलं जाईल.



हेही वाचा

लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला का असुरक्षित? वाचा...

धावत्या लोकलमध्ये अश्लील चाळे करणाऱ्याला अटक



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा