अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या 'या' हस्तकाला अटक

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या आणि मुंबईतील व्यावसायिकांचा काटा काढणाऱ्या एका शार्प शूटरला अटक करण्यात मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकांच्या अधिकाऱ्यांना यश आलं आहे.

SHARE

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या आणि मुंबईतील व्यावसायिकांचा काटा काढणाऱ्या एका शार्प शूटरला अटक करण्यात मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाला यश आलं आहे. रामदास रहाणे असं या आरोपीचं नाव असून मुंबईसह गुजरातमध्ये त्याच्यावर 11 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. न्यायालयाने त्याला 30 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रहाणेच्या चौकशीतून दाऊदच्या इतर हस्तकांची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


दाऊद गँगच्या सांगण्यावरून...

भारतातील एका हॉटेल व्यावसायिकाने दुबईत 1999 ते 2001 मध्ये पंचतारांकीत हॉटेल सुरू केलं होतं. या हॉटेलमध्ये त्या व्यावसायिकाच्या मित्रानं 5 लाख दिराम गुंंतवले होते. दरम्यान 2001 मध्ये दाऊद गँगच्या सागंण्यावरून हॉटेलमध्ये पैसे गुंतवलेल्या व्यावसायिकाच्या मित्राची हत्या या रहाणेने केली होती. काही दिवसानंतर 5 लाख दिरामसाठी दाऊद गँगने हॉटेल व्यावसायिकाला धमकावलं. त्यामुळे व्यावसायिकाने त्याचं दुबईतील ते हॉटेल विकून मित्राने गुंतवलेले पैसे दाऊद गँगला दिले.


खंडणी विरोधी पथकाकडे नोंदवली तक्रार

हे प्रकरण ऐवढ्यावरच थांबलं नव्हतं. काही दिवस उलटत नाही, तोच पुन्हा दाऊद गँगकडून पाकिस्तानहून व्यावसायिकाला 50 लाखांच्या खंडणीसाठी फोन आला. त्यावेळी दाऊद गँगने तात्काळ 5 लाख हस्तकाकडे देण्यास सांगितले. अन्यथा परिणाम वाईट होईल, अशी धमकीही दिली. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून संबधित व्यावसायिकाने मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार नोंदवली. वांरवार पैशांसाठी दाऊदच्या हस्तकांकडून फोन येऊ लागले. दरम्यान संबधित व्यावसायिकाच्या हत्येचा कट दाऊद टोळीने आखल्याची माहिती मिळताच पोलिसांनी व्यावसायिकाला सुरक्षा पुरवली. तसंच संबधित व्यावसायिकाला मारण्याची सुपारी दिलेल्या रामदास रहाणे याचा शोध सुरू केला.


'या' गुन्ह्यांमध्ये सहभाग

मूळचा अहमदनगरच्या संगमनेरचा असलेला रहाणे दाऊद टोळीसाठी अनेक वर्षांपासून काम करत होता. दाऊदच्या टॉप शूटरच्या यादीतही त्याचं नाव आहे. दाऊदच्या मुंबई आणि गुजरातमधील प्रमुख 11 गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आढळून आला आहे. विशेष म्हणजे 2011 मधील व्यावसायिक ढोलकीया यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबारातील तो मुख्य आरोपी होता.

संबधित व्यावसायिकाची सुपारीही त्यालाच दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या व्यावसायिकाच्या हत्येसाठी परदेशातून त्याला पैसेही पुरवण्यात आले होते. दरम्यान मुंबईजवळील परिसरात रहाणे येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय सावंत यांना होती. त्यानुसार त्यांनी पोलिस निरीक्षक सचिन कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक वंजारी, पवार आणि इतर कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्याला शुक्रवारी ताब्यात घेतलं. 


पिस्टल, काडतुसं जप्त

रहाणेला अटक केल्यानंतर त्याच्या अहमदनगर येथील घराची पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्या घरातून एक पिस्टल आणि दोन काडतुसं जप्त केली. चौकशीत त्याने दाऊदच्या रडारवर असलेल्या मुंबईतील अनेकांची नावं घेतली. या सर्वांचा टप्प्याटप्प्याने काटा काढण्याचं काम रहाणेला सोपवलं होतं. न्यायालयाने रहाणेला 30 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र रहाणेच्या अटकेमुळे दाऊद टोळीला मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे. तसंच रहाणेच्या चौकशीतून दाऊदच्या हस्तकांपर्यंतही पोलिस लवकरच पोहचतील, अशी माहिती पोलिस उपायुक्त दिलीप सावंत यांनी दिली.


हेही वाचा - 

दाऊदचा हस्तक तारिक परवीनच्या अडचणीत वाढ

'डी कंपनी'त फुट? अंडरवर्ल्डमध्ये भूकंप

संबंधित विषय
ताज्या बातम्या