स्वत:च्याच मुलामुळे दाऊद का झाला निराश?


स्वत:च्याच मुलामुळे दाऊद का झाला निराश?
SHARES

दाऊद निराश झालाय! होय...'डॉन की तलाश ग्यारह मुलकों की पुलिस कर रही है, मगर डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है' हा डॉयलॉग ज्या दाऊदला अगदी तंतोतंत लागू होतो, असा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम निराश झालाय. डिप्रेशनमध्ये आलाय. आणि याचं श्रेय वर्षानुवर्षे त्याच्या मागावर असलेल्या मुंबई पोलिसांना न जाता हे काम आहे स्वतः दाऊदच्या मुलाचं!


दाऊदचा मुलगा झाला मौलवी!

दाऊदचा मुलगा हा दाऊदच्या अंडरवर्ल्डकडे पाठ फिरवून, त्याच्या दोन नंबरच्या व्यवसायात साथ द्यायची सोडून चक्क मौलवी झालाय म्हणे! दाऊद निराश झाल्याची माहिती दाऊदचा भाऊ इकबाल कास्कर याने दिली आहे. बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी मोक्का अंतर्गत इकबाल कास्कर सध्या ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या ताब्यात असून तिथेच त्याने हा गौप्यस्फोट केल्याचं समजतंय.


मोईनवर दाऊदचं सर्वाधिक प्रेम!

दाऊदचा मुलगा मोईन दाऊद कासकरवर दाऊदचं सगळ्यात जास्त प्रेम असलं, तरी देखील मोईनने मात्र आपल्या बापाच्या पावलांवर चालण्यास स्पष्ट नकार दिला आहे. एवढंच नव्हे, तर मोईनने दाऊदच्या श्रीमंतीचा देखील त्याग केला असून, एक मौलवी म्हणून साधं आयुष्य जगण्याचा त्याने निर्णय घेतल्याचं इकबालने सांगितलं आहे.


वय वाढलंय, दाऊद खचलाय...

वाढत्या वयामुळे आणि सततच्या आजारपणामुळे सध्या दाऊद खचलेला असून मुलाच्या या टोकाच्या निर्णयामुळे दाऊद पार निराश झाला आहे. आपल्या एवढ्या मोठ्या साम्राज्याला कोणीच रक्ताचा वारस नाही, याची चिंता सतत दाऊदला असल्याचं इकबाल कासकरचं म्हणणं आहे.


'तो' सध्या काय करतो?

पाकिस्तानात दाऊदचा मुलगा मोईन दाऊद कासकर हा अधिकृत मौलाना म्हणून ओळखला जातो. कुराणातील ६ हजार २३६ आयत त्याला अगदी तोंडपाठ असल्याचं समजतंय. बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतलेला मोईन सुरवातीला दाऊदला त्याच्या धंद्यात मदत करत होता. पण त्यानंतर मात्र तो बाजूला होऊ लागला.

दाऊदच्या वास्तव्य असलेल्या क्लिफ्टनमधील आलिशान घराचा देखील मोईनने त्याग केला असून सध्या तो बंगल्याजवळील मशिदीत राहतो. मशिदीतल्याच एका घरात मोईन सध्या आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत राहतो. २०११ साली मोईनचा कराचीतील एका श्रीमंत कुटुंबातील मुलीशी विवाह झाला असून त्याला तीन मुलीदेखील आहेत.हेही वाचा

मालमत्ता लिलावाने दाऊद भडकला, १९९३ सारख्या ब्लास्टची दिली धमकी

दाऊदच्या त्या हॉटेलवर टॉयलेट नाही टॉवर, चक्रपाणींच्या मनसुब्यांवर पाणी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा