डिवाईन फाउंडेशनचा पर्दाफाश!

 Vikhroli
डिवाईन फाउंडेशनचा पर्दाफाश!
Vikhroli, Mumbai  -  

झटपट पैसा कमवून श्रीमंत होण्याच्या नादात कोण काय करेल याचा खरेच नेम नाही. विक्रोळीच्या हरियाली व्हिलेजमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. अनेकांकडून पैसे उकळल्यानंतर फरार झालेला आरोपी निलेश सूर्यकांत शाह याला मंगळवारी विक्रोळी पोलिसांनी अटक केली आहे.


सामाजिक कार्याच्या नावाखाली फसवणूक

तीन वर्षांपूर्वी निलेश शाह आणि त्याची पत्नी या दोघांनी मिळून 'डिव्हाईन फाउंडेशन' नावाची एक संस्था स्थापन केली. या दोघांनी सामाजिक कार्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लोकांकडून देणग्या गोळा केल्या होत्या.

निलेश हा बोलण्यात अतिशय हुशार असून त्याची गुजराती समाजात मोठी ओळख आहे. या ओळखीचा फायदा घेत त्याने अर्ध्या किंमतीत घरपोच औषधसेवा ही योजना सुरू केली होती. या योजनेतून त्याने अनेकांकडून औषधासाठी दोन ते तीन वर्षांसाठीचे आगाऊ पैसे घेतले. काही काळ त्याने लोकांना औषधे पुरवलीही. पण काही दिवसांनंतर औषधे का येत नाहीत? याचा तपास करण्यासाठी काही ग्राहक विक्रोळीच्या कार्यालयात गेले. तेव्हा महिन्याभरापासूनच हे दोघेही त्या ठिकाणी नसल्याचे समजले. त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेल्या बारा कामगारांनादेखील ते कुठे गेले? याची माहिती नव्हती. या कामगारांचे सहा महिन्यांपासूनचे वेतनही त्यांनी दिले नव्हते. काही लोकांचा विश्वास संपादन करून त्याने लाखो रुपये उधार घेतले असल्याचंही समोर आलं आहे.


लाखोंची बिलेही थकवली

औषध विक्री करणाऱ्या काही लोकांची लाखोंची बिलेदेखील त्याने थकवली होती. अशा प्रकारे कमीतकमी पाच हजार सभासदांची नोंद असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यातील अशोक भोसले या 70 वर्षांच्या वरिष्ठ नागरिकाला मधुमेहाची औषधे अर्ध्या किमतीत देण्याचे सांगून फसवले होते. त्यांच्या तक्रारीनंतर विक्रोळी पोलिसांनी निलेश आणि त्याची पत्नी मनीषा विरोधात कलम 420 आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर अशाच प्रकारे फसवणूक झालेल्या आणखी 15 जणांनी त्याची तक्रार विक्रोळी पोलिस ठाण्यात केली होती. अखेर महिनाभर शोध घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून आतापर्यंत साडेसहा लाख रुपयापर्यंत फसवणूक झाल्याच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हा आकडा आणखी मोठा होण्याची शक्यता असल्याचे विक्रोळीचे पोलिस सहाय्यक आयुक्त शेखर तावडे यांनी सांगितले.हेही वाचा -

भाडेतत्वावर कॅमेरा देताय? जरा सांभाळून !

'हनी ट्रॅप' लाऊन फसवणूक करणारं नायजेरियन जोडपं जेरबंद


Loading Comments