रेल्वे रुळांवर ठेवली जाणार 'ड्रोन'ने गस्त


रेल्वे रुळांवर ठेवली जाणार 'ड्रोन'ने गस्त
SHARES

जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना अशी ओळख असलेल्या 'इसिस'ने घातपात घडवून आणण्यासाठी हत्यार किंवा स्फोटकाचा वापर न करता मोठी दुर्घटना घडवून आणण्याचा कट रचल्याची माहिती मल्टी एजन्सी सेंटरने (मॅक) काही दिवसांपूर्वी सर्व सुरक्षा विभागांना दिली आहे. घातपात घडवून अाणू, अशा अाशयाचे दहशतवाद्यांचे पत्र उत्तर प्रदेशमध्ये आल्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे रूळ कमकुवत करून भीषण दुर्घटना घडवण्याचा दहशतवाद्यांचा डाव असल्याने लवकरच रेल्वे रुळांवर ड्रोनची गस्त ठेवली जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे.


कमकुवत सुरक्षेचा फायदा

शहरात लाखो नागरिक दररोज रेल्वेनं प्रवास करतात. त्या तुलनेत रेल्वेची सुरक्षा अत्यंत तकलादू आहे. या पूर्वीही रेल्वेत साखळी बाॅम्बस्फोट होऊनही सुरक्षेच्या दृष्टीनं कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात अालेल्या नाहीत. याचाच फायदा उचलत कोणतंही हत्यार किंवा स्फोटकांचा वापर न करता दहशतवाद्यांनी रेल्वे रूळ कमकुवत करून दुर्घटना घडवण्याचा कट रचल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना यापूर्वीच प्राप्त झाली आहे.


दुर्घटना कशी घडवणार?

उन्हाळ्यात लोखंड गरम होऊन ते किंचीत प्रसरण पावतं, तर हिवाळ्यात ते अाकुंचन पावत असल्यानं रेल्वे रूळ एकमेकांना जोडताना त्यात इंचभर जागा सोडली जाते. याच इंचभर जागेत सिमेंट किंवा दगड टाकल्यास रूळ वाकडे होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असल्यानं घातपाताची ही नवी पद्धत दहशतवाद्यांनी शोधून काढली आहे. त्याचबरोबर रेल्वे रुळांवर कोणतीही गस्त नसते. त्यामुळे रूळाखाली स्फोटकांचा वापर करून स्फोट घडवून मोठी दुर्घटना हे दहशतवादी घडवणार होते. तशी कबुली नुकत्याच एटीएसनं अटक केलेल्या फैजल मिर्झानं पोलिसांना दिली होती.


रेल्वेला सतर्कतेचे आदेश

दहशतवाद्यांच्या या पद्धतीची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाल्यानंतर त्यांनी रेल्वे सुरक्षा विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. रेल्वे स्थानक, रूळ परिसर आणि गोडाऊनमध्ये गस्त वाढवण्याचे निर्देश त्यांना दिले आहेत. आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांना रेल्वे रूळातील गडबड कळणं कठीण असल्यानं लांबपर्यंत गस्त घालणे सुरक्षारक्षकांना शक्य नाही. त्यामुळे विविध अंतरावर ड्रोन उडवून दिवसा रेल्वे रुळांवर गस्त ठेवली जाणार असल्याचे कळते. रुळांवरून रेल्वे धावण्यापूर्वी ड्रोन पुढे गस्त घालणार आहे. काही संशयास्पद दिसल्यास कंट्रोलरूमहून पुढील सूचना दिल्या जातील.


ड्रोनचे फायदे

शहरात कुठेही ओव्हरहेड वायर तुटल्यास किंवा रुळांना तडे गेल्याची पूर्वकल्पना नियंत्रण कक्षाद्वारे दिल्यास मोठी दुर्घटना टळली जाऊ शकते. तसेच फटका गँग किंवा मोबाइल चोरांवरही नजर ठेवली जाऊ शकते. रेल्वेच्या नव्याने सुरू असलेल्या कामाचा आढावाही थेट कार्यालयातून रेल्वे अधिकाऱ्यांना घेता येईल. जानेवारीत या ड्रोनद्वारे सुरक्षेची चाचणी रेल्वेने जबलपूर, भोपाळ आणि कोटा येथे केली. त्या पार्श्वभूमीवर देशाताल १७ रेल्वे झोनमध्ये ड्रोनद्वारे गस्त घालण्याचा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या रेल्वे प्रशासनाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत घेण्यात अाला अाहे.


सध्याची सुरक्षा 'पीडब्ल्यूअाय'वर

सद्यस्थितीत रेल्वेच्या सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळेस कायमस्वरूपी तपास अधिकारी अर्थात 'पर्मनंट व्हे इन्स्पेक्टर' (पीडब्ल्यूआय) गँगमन्सची नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यासोबत क्यूआरटीचे जवान शस्त्रासह महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. तर श्वान पथकांनाही रेल्वे स्थानक आणि रेल्वे रूळांवर घेऊन फिरवण्याचे आदेश दिले आहेत.


हेही वाचा -

विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात बाॅम्बची अफवा

ड्रोन टिपणार मुंबईकरांच्या हालचाली

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा