Advertisement

एल्फिन्स्टन महाविद्यालयाचा गलथान कारभार : १२७ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

एल्फिन्स्टन महाविद्यालयाने एकाही विद्यार्थ्याचा शिष्यवृत्ती अर्ज समाजकल्याण विभागाला पाठवला नाही. त्यामुळे अनुसुचित जाती, जमाती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गेली दोन वर्ष आर्थिक सवलतीचा फायदा मिळालेला नाही.

एल्फिन्स्टन महाविद्यालयाचा गलथान कारभार : १२७ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
SHARES

मुंबईतील नामांकित एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या बेफिकीरपणामुळे १२७ अनुसुचित जाती, जमाती अाणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित रहावं लागलं आहे. विद्यार्थ्यांनी भरून दिलेले शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयाने समाजकल्याण विभागाला पाठवलेच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस अाला अाहे. विशेष म्हणजे शिष्यवृत्ती अर्ज पाठवण्यासाठी मुंबईच्या समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी महाविद्यालयाशी वेळोवेळी पत्रव्यवहारही केला होता. मात्र. महाविद्यालयानं या पत्रव्यवहाराला कोणतीही दाद न देता आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला.


नेमकं प्रकरण काय ?

२०१६-१७ आणि २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात फोर्टमधील एल्फिन्स्टन महाविद्यालयाने एकाही विद्यार्थ्याचा शिष्यवृत्ती समाजकल्याण विभागाला पाठवला नाही. त्यामुळे या महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसुचित जाती, जमाती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गेली दोन वर्ष आर्थिक सवलतीचा फायदा मिळालेला नाही. महाविद्यालयाच्या या गलथान कारभाराविरोधात छात्र भारती विद्यार्थी संघटनेनं आक्रमक पवित्रा धारण केला अाहे.  एल्फिन्स्टन महाविद्यालयावर अॅट्रोसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करावा,  या प्रकरणी चौकशी समिती नेमावी तसंच विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शिष्यवृत्ती मिळावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष सचिन बनसोड यांनी केली अाहे. 


अशी आहे शिष्यवृत्ती योजना

अनुसुचित जाती, जमाती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्ती समाजकल्याण विभागामार्फत देण्यात येत असून या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याला जात प्रमाणपत्रसह इतर आवश्यक कागदपत्रं द्यावी लागतात.  त्यानंतर विद्यार्थ्याला एका विशिष्ट वेबसाईटवर आपली संपूर्ण माहिती भरून त्याची प्रिंटआऊट काढून महाविद्यालयाला द्यावी लागते. या प्रिंट आऊटमधील इतर माहिती व कागदपत्राची व्यवस्थित तपासून ती संपूर्ण फाईल समाजकल्याण विभागाला द्यावी लागते. आणि त्यानंतर समाजकल्याण विभाग त्या मुलाच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करते.


एल्फिन्स्टन महाविद्यालयात २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीचे एकूण १२७ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची फाईल महाविद्यालयाने समाजकल्याण विभागाला पाठवलेली नाही. याबाबत समाजकल्याण विभागानं त्यांच्याशी पत्रव्यवहारही केला होता. मात्र, महाविद्यालयाने अाम्हाला कोणताही प्रतिसाद अद्याप दिलेला नाही.  या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसान होत असून महाविद्यालयाने लवकरात लवकर शिष्यवृत्ती अर्जाची फाईल पाठवावी.
 - प्रसाद खैरनार, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, मुंबई



एफवायला असताना माझ्याकडून शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरून घेण्यात आला. हा अर्ज भरून संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर मला माझी शिष्यवृत्ती मिळाली. परंतू दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी मी शिष्यवृत्ती योजनेबाबत विचारलं असता, तुला फक्त तुझ्या गुणपत्रिकेची प्रत द्यावी लागेल असं महाविद्यालयातर्फे सांगण्यात आलं. त्यानुसार मी दोन्ही वर्षाची गुणपत्रिकेची प्रत जोडली. पण मला त्यानंतरही शिष्यवृत्ती  मिळाली नाही. तसंच शासनानं विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या विविध शिष्यवृत्ती योजनेबाबत महाविद्यालय कोणत्याही प्रकारचं परिपत्रक लावत नाही. त्यामुळे माझ्यासारखे अनेक विद्यार्थी या योजनांपासून दूर राहतात.
 - प्रशांत भालेराव, विद्यार्थी

याबाबत मुंबई लाइव्हने महाविद्याल्याच्या प्रध्यापकांशी वारंवार संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.


हेही वाचा -

जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्यानं खुल्या प्रवर्गातून जबरदस्तीने प्रवेश

दुसऱ्या गुणवत्ता यादीत ७० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा