Advertisement

'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'साठी ८४ हजार जागा उपलब्ध

'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रधान्य' या फेरीसाठी विविध कॉलेजमध्ये जवळपास ६७ हजार २९६ जागा रिक्त असून इनहाउस, मॅनेजमेंट या कोटा मिळून एकूण ८४ हजार १०६ जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे आतापर्यंत प्रवेश न मिळालेल्या आणि फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यर्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'साठी ८४ हजार जागा उपलब्ध
SHARES

यंदाच्या शैक्षणिक वर्षात अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रधान्य' या फेरीची दुसरी फेरी पार पडणार आहे. या फेरीसाठी विविध कॉलेजमध्ये जवळपास ६७ हजार २९६ जागा रिक्त असून इनहाउस आणि मॅनेजमेंट कोटा मिळून एकूण ८४ हजार १०६ जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे आतापर्यंत प्रवेश न मिळालेल्या आणि फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यर्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.


८४ हजार १०६ जागा उपलब्ध

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात अकरावीसाठी चार नियमित फेऱ्या आणि एका विशेष फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्यानं काही दिवसांपूर्वी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार प्रवेशफेरी राबवण्यात आली. या फेरीनंतरही अनेक विद्यार्थी प्रवेशाविना वंचित असल्यानं प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य याची दुसरी फेरी पार पडणार असल्याचं शिक्षण विभागातर्फे जाहीर करण्यात आलं होतं.

त्यानुसार विविध कॉलेजने रिक्त जागा जाहीर कल्या असून या फेरीसाठी विविध कॉलेजमध्ये जवळपास ६७ हजार २९६ जागा रिक्त आहेत. तर इनहाउस कोटा ५ हजार ००७, अल्पसंख्याक कोटा ७ हजार ७९२ तर व्यवस्थापन कोटा ४ हजार ०११ जागा उपलब्ध असून एकूण ८४ हजार १०६ जागा उपलब्ध आहेत.


फेरपरीक्षांचा निकाल जाहीर

काही दिवसांपूर्वी अकरावीच्या फेरपरीक्षांचा निकाल जाहीर झाला असून यात मुंबई विभागातील ४ हजार ७४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यासर्व विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेता येणार असून या विद्यार्थ्यांसाठी अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रवेशप्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशानं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेप्रमाणे तीन गट करण्यात आले असून त्या गटात दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे.


प्रवेश प्रक्रिया कधीपर्यंत?

गुरुवारी ६ सप्टेंबर रोजी गट क्रमांक १ मध्ये ६० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण असणारे विद्यार्थ्यांचा ऑनलाइन प्रवेश निश्‍चित होणार आहे. यात प्रवेशाचा पर्याय प्रथम निवडणाऱ्या विद्यार्थ्यांला रिक्त जागांनुसार प्रवेश देण्यात येणार असून ही प्रवेश प्रक्रिया येत्या ४ सप्टेंबरपासून १२ सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे.


प्रवेशासाठी काय कराल?

अकरावीच्या 'प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य' याच्या दुसऱ्या फेरीसाठी प्रामुख्यानं ६० टक्के आणि त्यावर गुण असलेले आणि ३५ टक्क्यांवरील गुण असलेले विद्यार्थी सहभागी होणार आहे. यानुसार विद्यार्थ्यांनी https://mumbai.11thadmission.net/ या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करावं. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचं प्रोफाईल उपलब्ध होईल.

या प्रोफाईल अगदी शेवटी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य (First come First serve) या पर्यायासमोरील पार्टिसिपेट (participate) या ऑप्शनवर क्लिक करावं. त्यानंतर शाखा व माध्यम निवड केल्यानंतर तुम्हाला रिक्त जागा असलेल्या कॉलेजांची यादी उपलब्ध होईल.


प्रवेश निश्चित करण्यासाठी

कॉलेजांची यादी उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला हव्या असलेल्या कॉलेजची निवड करावी लागेल. त्यानंतर अप्लाय नाऊ या ऑप्शनवर क्लिक करून प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यानंतर या प्रवेशाची कम्प्युटराइज्ड पावती स्क्रिनवर दिसल्यानंतर आपला प्रवेश निश्चित झाल्याचं विद्यार्थ्यांनी समजावं. आणि त्या पावतीची प्रिंट कॉलेजमध्ये सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तसचं उर्वरित दोन गटांसाठीची प्रवेशप्रक्रिया दिलेल्या मुदतीत राबवण्यात येणार आहे.


हेही वाचा - 

अकरावी प्रवेश: 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' फेरीसाठी ७६ हजार जागा

आता अकरावी प्रवेशासाठी 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा