Advertisement

शारदाश्रम शाळेच्या नाव बदलाची परवानगी रद्द

शिक्षण विभागाने शारदाश्रम शाळेच्या नावात कोणताही बदल करता येणार नसून शारदाश्रम शाळेला राज्य मंडळाचा अभ्यासक्रम बंद करू नये, असे आदेशही मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने दिले आहे. याबरोबरच यासंदर्भात शाळेने काय कारवाई केली? याबाबतचा अहवाल सादर करण्याचं देखील शाळा प्रशासनाला कळवण्यात आलं आहे.

शारदाश्रम शाळेच्या नाव बदलाची परवानगी रद्द
SHARES

दादरमधील शारदाश्रम विद्यामंदिर या शाळेत राज्य शिक्षण मडंळाचा इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम बंद करून आयसीएसई बोर्डात रुपांतर करण्याचा घाट शाळा व्यवस्थापन मंडळाने घातला होता. यासोबतच या शाळेच्या नावात बदल करून 'एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूल' असं ठेवण्यात येणार होतं. पण याबाबत शिक्षण विभागाने शारदाश्रम शाळेच्या नावात कोणताही बदल करता येणार नसून शारदाश्रम शाळेला राज्य मंडळाचा अभ्यासक्रम बंद करू नये, असे आदेशही मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने दिले आहे. याबरोबरच यासंदर्भात शाळेने काय कारवाई केली? याबाबतचा अहवाल सादर करण्याचं देखील शाळा प्रशासनाला कळवण्यात आलं आहे.


नेमकं प्रकरण काय?

जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात शारदाश्रम शाळेने पहिली ते पाचवीसाठी 'आयसीएसई'चा अभ्यासक्रम सुरू करण्याचं ठरवलं होतं. यामुळे या शैक्षणिक वर्षात चौथीत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी इयत्ता पाचवीत गेल्यावर त्यांना नवा अभ्यासक्रम शिकवला जाणार होता.

इतकंच नाही तर चौथीतल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देत त्यांना संस्थेच्या 'आयसीएसई'च्या शाळेत प्रवेश घेण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र शाळेतील बहुतांश पालकांनी राज्य मंडळाच्याच अभ्यासक्रमाचा आग्रह धरला होता. तसेच हे बदल करण्यासाठी शाळेने नाव बदलण्यासाठी शिक्षण उपसंचालकांकडून परवानगी मिळवून शाळेचं नाव 'एसव्हीएम इंटरनॅशनल' असं केलं होतं. यासर्व प्रकाराला पालक आणि युवासेनेकडून कडाडून विरोध झाला. याप्रकरणी युवसेनेच्या वारंवार पाठपुराव्यामुळे शारदाश्रम शाळेने नमतं घेतल्याची प्रतिक्रिया पालकवर्गाकडून व्यक्त होत आहे.


शिक्षण विभागाची दिशाभूल 
 

शारदाश्रम शाळेला सोमवारी शिक्षण विभागाने चांगलंच खडसवलं असून शाळा व्यवस्थापनाला राज्य मंडळाची शाळा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय शारदाश्रमच्या राज्य मंडळाच्या शाळेत पहिली ते चौथी या इयत्तेमध्ये ७७७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेला शिक्षण    विभागाची ३१ मे २०२० पर्यंतची मान्यता मिळाली आहे. असं असताना शाळा प्रशासनाने ही शाळा बंद करून आंतरराष्ट्रीय मंडळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. तो चुकीचा असल्याचं या पत्रात नमूद केलं आहे. तसेच शाळेच्या नावात बदल करण्यासाठी पालिका शिक्षण विभागाने अद्याप मान्यता दिलेली नाही. यामुळे बदललेल्या    नावाने ओळखपत्र देणे आदी बाबींबाबत खुलासा करण्यासही शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

 

'पुन्हा सुधारित अर्ज करा' 
 

काही महिन्यांपूर्वी शारदाश्रम शाळेने नमुना दोन प्रमाणपत्र मिळण्यासाठी एसव्हीएम इंटरनॅशनल नावाने प्रस्ताव शिक्षण विभागाला सादर केला होता. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने सादर केलेला शाळेच्या नावात बदल करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला. मात्र समितीने मंजुरी दिली नसल्यामुळे पुन्हा सुधारित अर्ज करावा, अशा सूचनाही शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. 


शाळेने शारदाश्रम इंग्रजी प्राथिमिक शाळा आणि एसव्हीएम इंटरनॅशनल इंग्रजी प्रायमरी हायस्कूल अशा दोन शाळांसाठी दोन स्वतंत्र अर्ज दाखल करावेत, म्हणजे दोन्ही शाळांचं वेगळं अस्तित्व राहील. एसव्हीएम इंटरनॅशनल या शाळेत नवीन प्रवेश देऊन स्वतंत्रपणे सुरू करण्याबाबत परवानगी घ्यावी, अशी सूचनाही शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.

शारदाश्रम विद्यामंदिर व्यवस्थापनाने मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाची दिशाभूल करून नावात बदल करण्याची परवानगी घेतली होती. त्यामुळे शिक्षण विभागाने नमुना २ रद्द केला असून शारदाश्रम शाळेचे आयसीएसई बोर्डात रुपांतर करता येणार नाही. दरम्यान या शाळेची प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तशीच सुरू राहणार आहे. 
- साईनाथ दुर्गे, शिक्षण समिती सदस्य

शारदाश्रम शाळेला राज्य मंडळाचा अभ्यासक्रम बंद करता येणार नसून महापालिका शिक्षण विभागातर्फे मिळालेला नमुना २ हा रद्द करण्यात आला आहे. 
- महेश पालकर, शिक्षणाधिकारी


हेही वाचा -

शारदाश्रम शाळेची शरणागती; एसएससी बोर्डाचे प्रवेश सुरू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा