Advertisement

अंतिम सत्रातील परीक्षांबाबत २० जून रोजी निर्णय - उदय सामंत

राज्यातील कोरोनाच्या संसर्गाबाबत २० जून रोजी पुन्हा आढावा घेऊन त्यानंतरच अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षांबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना दिली.

अंतिम सत्रातील परीक्षांबाबत २० जून रोजी निर्णय - उदय सामंत
SHARES

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परीक्षा रद्द करण्यात येणार असून केवळ अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाच होणार असल्याचं घोषित केलं होतं. परंतु, उदय सामंत यांच्या या निर्णयावर अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळं आता राज्यातील कोरोनाच्या संसर्गाबाबत २० जून रोजी पुन्हा आढावा घेऊन त्यानंतरच अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षा घ्यायच्या की नाहीत, याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना दिली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे आयोजित राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आगामी शैक्षणिक वर्ष व समस्या या विषयावर त्यांनी फेसबुकद्वारे संवाद साधला. अनेक स्वायत्त आणि खासगी विद्यापीठं विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याच्या तयारीत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी या वेळी केल्या. त्यावर आपण उद्याच सर्व विद्यापीठांच्या प्रशासन आणि कुलगुरूंशी संवाद साधणार आहोत. यूजीसीच्या निर्देशांप्रमाणे, राज्य शासनाच्या धोरणानुसारच स्वायत्त, खासगी विद्यापीठांना परीक्षांबाबतचं धोरण राबवावं लागेल. याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा - अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला युवासेनेचं समर्थन

ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहेत. मात्र, परीक्षा झाली नाही त्यांच्या शुल्काबाबत काय निर्णय घ्यावा, यासंदर्भात येत्या २ दिवसांत राज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करून निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अंतिम सत्रातील ज्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉगच्या परीक्षा बाकी आहेत, त्यांना १ ते ३० जुलैदरम्यान या परीक्षांच्या दरम्यानच त्या द्याव्या लागतील.

विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी, परीक्षेत मदत व्हावी यासाठीही विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करून येत्या २ दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे. सीईटी रद्द केल्यास लाखो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात येऊ शकते, अशी माहिती त्यांनी सीईटी रद्द करा या विद्यार्थ्यांच्या मागणीला उत्तर देताना दिली. तसंच यंदा सीईटी जिल्हास्तरावर घेण्याऐवजी तालुकास्तरावर घेण्याचं नियोजन करत असल्याचीही माहिती त्यांनी दिली.



हेही वाचा -

पालिकेच्या शिक्षकांनो २ दिवसांत उपस्थित राहा- महापालिका आयुक्त

धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या हजाराच्या जवळ



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा