SHARE

मुंबईसह राज्यात अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया करत असताना  विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास मार्गदर्शन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने काही मार्गदर्शन केंद्र सुरू केली अाहेत.  त्याचबरोबर काही हेल्पलाइन नंबरही देण्यात आले आहेत. मात्र,  मुंबई महानगर क्षेत्रातील कॉलेजांच्या प्रवेशासाठी दिलेल्या ३४ क्रमांकांपैकी एक नंबर चुकीचा अाहे. तर जवळपास सहा नंबरची सेवा खंडित अाहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


विशेष केंद्राची स्थापना

दरवर्षी अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत मार्गदर्शन करण्यासाठी विशेष केंद्रांची स्थापना करण्यात येते. तसंच काही मार्गदर्शकांचेही संपर्क नंबरही देण्यात येतात.  प्रत्येक विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशप्रक्रियेच्या पुस्तकामध्ये त्या-त्या विभागातील नंबर देण्यात आले आहेत. यापैकी अंजूमन -ए- इस्लाम या शाळेच्या केंद्रासाठी जो हेल्पलाइन नंबर दिला आहे, तो थेट उत्तर प्रदेशमधील एका डॉक्टरला लागतो. विशेष म्हणजे या डॉक्टरला फोन गेल्यावर तो विद्यार्थ्यांना निराश न करता त्यांच्याशी नम्रपणे संवाद साधून हा माझा नंबर असून हेल्पलाइन नंबर नसल्याचं सांगतो. या केंद्रावर मंत्रालय, नरिमन पॉइंट, डोंगरी, चर्चगेट, उमरखाडी या परिसरात राहणारे विद्यार्थी संपर्क साधत असतात.


काही नंबर बंद

 एम. पी. शाह कॉलेज येथील मदत केंद्रासाठी देण्यात आलेला नंबर तात्पुरता बंद असल्याचं सांगण्यात येत आहे. तर कांदिवली परिसरातील भाटिया ज्युनिअर कॉलेजसाठी देण्यात आलेला नंबर सतत डायव्हर्टेड असल्याचं सांगत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील जोंधळे विद्यालय येथील मदत केंद्राचा नंबर हा सतत बंद लागत आहे.


नंबर अस्तित्त्वातच नाही

उल्हासनगर येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील केंद्रासाठी देण्यात आलेला नंबर हा अस्तित्त्वातच नाही.  हाच क्रमांक येथील दोन मदत केंद्रांना दिला आहे. तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ऐरोली परिसरातील मदत केंद्राचा नबरही सतत बंद येत आहे. तर कामोठे परिसरातील केंद्रासाठी देण्यात आलेला नंबर अस्तित्त्वात नसल्याचं सांगण्यात येते. मात्र, येथे आणखी एक पर्यायी नंबर देण्यात आला आहे.


या प्रवेश पुस्तकात देण्यात आलेले काही हेल्पलाइन क्रमांक चुकीचे आहेत. ते वेबसाइटवर सुधारित देण्यात आले आहेत. तसेच अालेल्या तक्रारींची तपासणी करून सुधारित क्रमांक वेबसाइटवर देण्यात येतील.
 - राजेंद्र अहिरे, उपसंचालक, शालेय शिक्षण विभागहेही वाचा -

आयआयटी बॉम्बेमध्ये विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ

पदवी अभ्यासक्रमाची पहिली मेरीट लिस्ट मंगळवारी


 

संबंधित विषय
ताज्या बातम्या