Advertisement

लॉ शाखेच्या परीक्षा आता कॉलेजांकडे


लॉ शाखेच्या परीक्षा आता कॉलेजांकडे
SHARES

लॉ शाखेच्या तीन वर्षीय अभ्यासक्रमातील सत्र एक ते चार आणि पाच वर्षीय अभ्यासक्रमातील सत्र पाच ते आठ या परीक्षांची जबाबदारी कॉलेजांकडे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. लॉ च्या सर्व कॉलेजांनी विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे परीक्षा घेऊन वेळेवर निकाल जाहीर करावा, तसेच यात काही अडचण असल्यास विद्यापीठ सर्व मदत करेल, अशी ग्वाही मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी शनिवारी लॉ शाखा प्राचार्यांच्या बैठकीत दिली.


सर्वांसमक्ष झाला महत्त्वपूर्ण निर्णय

परीक्षेच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी व सविस्तर चर्चा करण्यासाठी डॉ. पेडणेकर व परीक्षा संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी सर्व लॉ कॉलेजांचे प्राचार्य आणि परीक्षा समन्वयक यांची बैठक आयोजित केली होती. विद्यानगरी येथील महात्मा फुले भवनातील केंद्रीय मूल्यांकन कक्षात ही बैठक घेण्यात आली असून त्या बैठकीला ४८ लॉ कॉलेजांचे प्राचार्य व समन्वयक उपस्थित होते.



प्रश्नपत्रिका मात्र विद्यापीठ तयार करणार

ज्या आठ लॉ परीक्षा कॉलेजांकडून घेतल्या जाणार आहेत, त्यांचे परीक्षा फॉर्म घेणे, हॉलतिकीट तयार करणे, परीक्षा घेणे, मूल्यांकन, निकाल लावणे, पुनर्मूल्यांकन व उत्तरपत्रिकांची छायाप्रत देणे अशा सर्व बाबी कॉलेजने विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे करायच्या आहेत. मात्र, या परीक्षांच्या तारखा व वेळापत्रक विद्यापीठ जाहीर करेल. तसेच या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका विद्यापीठाच्या 'डीईपीडी' मार्फत कॉलेजला पाठवल्या जाणार आहेत.


या परीक्षा विद्यापीठ घेणार

तीन वर्षीय अभ्यासक्रमाच्या सत्र पाच व सहा तसेच पाच वर्षीय विधी शाखेच्या सत्र ९ व १० या परीक्षा विद्यापीठ घेणार आहे.


आम्ही घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यापीठावरील ताण निश्चितच कमी होईल. तसेच या परीक्षा कॉलेजांमध्ये कशा स्वरूपात घेतल्या जाव्यात याच्या कार्यपद्धतीची माहिती सर्वांना पाठवण्यात आली आहे.
डॉ. अर्जुन घाटुळे, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ


मूल्यांकनासाठी आवाहन

द्वितीय वर्ष २०१७ च्या विधी शाखेचे मूल्यांकन करून त्याचे संपूर्ण निकाल जाहीर केल्याबद्दल कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सर्व लॉ कॉलेजांच्या प्राचार्यांचे अभिनंदन केले. तसेच शेवटच्या सत्राची परीक्षा विद्यापीठ घेणार असल्याने त्यांच्या मूल्यांकनामध्येही शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षांचे निकाल वेळेवर लावता येतील. विद्यार्थ्यांना पुढील करिअरचे नियोजन करता येईल, असेही आवाहन कुलगुरूंनी केले.



हेही वाचा

महापालिकेचे विद्यार्थी घेणार कंत्राटदारांची 'परीक्षा'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा