SHARE

दरवर्षी येणारा गणेशोत्सव...दरवर्षी होणारं मूर्तींचं विसर्जन...आणि दरवर्षी समुद्रकिनारी साठणाऱ्या अर्धवट तुटलेल्या मूर्ती...गणेशोत्सव आणि त्यानंतर दिसणारं हे चित्र बहुधा प्रत्येक मुंबईकरानं पाहिलं असावं. मात्र यावरचा एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे तो दादरच्या दत्ताद्री कोथूर यांनी! ट्री गणेशाची एक भन्नाट कल्पना त्यांनी शोधून काढली आहे. आणि त्यांच्या या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर मैदानात उतरली आहे!

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी दत्ताद्री कोथूर यांनी 'ट्री गणेशा'ची कल्पना शोधून काढली. यामध्ये मातीची मूर्ती बनवून त्याच वेळी त्या मूर्तीमध्ये रोपांचं बीज पेरण्यात येतं. ठराविक कालखंडानंतर या मूर्तीच्या मातीतून रोप उगवतं. या कल्पनेमुळे एकीकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे होणारं प्रदूषण कमी होतं, तर दुसरीकडे वृक्षलागवडही होते.


दत्ताद्री कोथूर ही मूर्ती बनवतानाचा व्हिडिओ सई ताम्हणकरने तिच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. तिने स्वत: कोथूर यांच्याकडून ही मूर्ती बनवून घेण्याची कल्पना समजून घेतली. आणि व्हिडिओच्या माध्यमातून ती लोकांसमोर आणली आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी अशा 'ट्री गणेशा'ची किती आणि कशी मदत होईल हे सई या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगत आहे.


शिवाय आपण पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काय करत आहोत? त्याच्या कल्पनाही तिने प्रेक्षकांना पाठवण्यास सांगितल्या असून ज्यांची कल्पना तिला आवडेल, अशा लोकांच्या घरी ती स्वतः 'ट्री गणेशा' घेऊन जाणार असल्याचं आश्वासन तिने या व्हिडिओमध्ये दिलं आहे.


हेही वाचा

पेपर गणेश मूर्ती पर्यावरणाला हानीकारक?


संबंधित विषय
ताज्या बातम्या