...नाहीतर 26 जुलैची पुनरावृत्ती होईल

Mumbai
...नाहीतर 26 जुलैची पुनरावृत्ती होईल
...नाहीतर 26 जुलैची पुनरावृत्ती होईल
...नाहीतर 26 जुलैची पुनरावृत्ती होईल
...नाहीतर 26 जुलैची पुनरावृत्ती होईल
...नाहीतर 26 जुलैची पुनरावृत्ती होईल
See all
मुंबई  -  

अनेक वर्ष मुंबईत राहूनही मुंबईत नद्या नाहीत, असे छातीठोक पणे अनेक जण सांगतात. छे...छे...नद्या आणि मुंबईत? हे शक्यच नाही... नद्या वैगरे गावा-खेड्यांमध्ये वाहतात. तिथे तशी गरजच असते ना! मुंबईसारख्या विकसित शहरात नद्यांची काय आवश्यक्ता आहे? मुंबईत नळाला 24 तास पाणी असते. 24 तास नसले तरी अर्धा-एक तास तर पाणी येतेच की? आणि काहीच नाही तर पाण्याची टाकी आहेच. बहुतांश मुंबईकरांचा हाच दृष्टीकोन असतो. मुंबईकरांच्या याच चुकीच्या समजुतीमुळे नद्यांचे चक्क नाले झाले आहेत. 

एकेकाळी मुंबईत एक दोन नव्हे, तर चक्क चार नद्या होत्या. दहिसर, ओशिवरा, पोयसर आणि मिठी अशा चार नद्यांचे रूपांतर आज नाल्यात झाले आहे. या सर्वांचा जेव्हा आम्ही आढावा घेतला तेव्हा धक्कादायक वास्तवच समोर आले. असे वास्तव जे मुंबईच्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.   


मुंबईतल्या नद्यांच्या काठावर समस्यांचा गाळदहिसर नदी

नॅशनल पार्कमधून वाहणारी नदी

दहिसर नदी ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून उगम पावते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, श्रीकृष्ण नगर, दौलत नगर, कांदरपाडा, संजय नगर, दहिसर गावठाण असा प्रवास करत ही नदी मनोरी इथे अरबी समुद्राला मिळते. नॅशनल पार्कमधून उगम पावणारी ही नदी नॅशनल पार्कच्या क्षेत्रात स्वच्छ आणि खळखळून वाहत असते. पण शहरात प्रवेश करताच त्यात प्लॅस्टिक, कचरा, तबेल्यातील शेण, मानवी विष्ठा, सांडपाणी आणि धोबीघाटमधून निघणारे साबणाचे पाणी हे सर्व फेकले जाते.


संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या विरूद्ध बाजूला अनेक तबेले आहेत. तबेल्यांमधून जनावरांचे मलमूत्र आणि शेण नदीत सोडले जाते. याच तबेल्याच्या बाजूला कृष्णा हाऊसिंग सोसायटी आहे आणि या सोसायटीला लागूनच दहिसर नदी आहे. तबेल्यातील मलमूत्र आणि शेण हे या नदीतच सोडले जाते. त्यामुळे नदीचा अक्षरश: गोबरझाला आहे. "तबेल्यात जनावरांचे मलमूत्र आणि शेण तर टाकले जातेच, पण मृत म्हशी सुद्धा नदीतच टाकल्या जातात. सर्वात धक्कादायक म्हणजे तबेल्याची पाईपलाईन ही कृष्णा बिल्डिंगच्या खालूनच जाते. नदीच्या दिशेला असलेल्या या पाईपलाईनचे तोंड इतके मोठे आहे की, मृत म्हशींना या पाईपलाईनमधून नदीत टाकले जाते की काय? अशी शंका आम्हाला आहे.


पावसाळ्यात तर प्रचंड हाल असतात. पण उन्हाळ्यात दहिसर नदीचे पाणी आटले की सर्व उकिरडा दिसू लागतो. त्यामुळे अनेक आजार पसरतात," अशी माहिती परिसरातल्या रहिवाशाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. संजय नगर आणि पुष्पा विहार या परिसरातून दहिसर नदी पुढे वाहत जाते. या नदीच्या काठावर झोपड्यांचे अतिक्रमण पाहायला मिळते. २६ जुलैच्या महाप्रलयानंतर संजय नगर परिसरात नदीच्या किनारी मोठी संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. पण दुसऱ्या बाजूला असणाऱ्या पुष्पा विहार इथे मात्र संरक्षण भिंत नाही. त्यामुळे जर पाऊस जास्त पडला तर पाणी झोपड्यांमध्ये शिरण्याची भिती इथल्या रहिवाशांनी व्यक्त केली. संजय नगर परिसरातून वाहणाऱ्या दहिसर नदीचा आढावा घ्यायला गेलो असता धक्कादायक दृष्य समोर आले. नदीच्या पाण्यात चक्क म्हैस मृत अवस्थेत आढळली.पालिकेने साफसफाई सुरू केल्यानंतर नदीपात्रातील कचरा कमी झाला आहे. पण पालिकेचे काम नेहमी अर्धवटच असते. नदीच्या काठावर गाळ काढला की किती तरी दिवस तो तिकडेच असतो. त्यामुळे दुर्गंधी पसरते. शिवाय जवळच असणाऱ्या गोठ्यातून मृत म्हशी टाकल्या जातात. कोणाला कळू नये म्हणून त्यावर शेण टाकले जाते. पाण्याचा प्रवाह वाढला की मृत म्हशी नदीच्या प्रवाहासोबत वाहत येतात.  

शांती, रहिवासी


थोडे पुढे गेल्यावर दहिसर नदीच्या मार्गात एक धोबीघाटही लागतो. या धोबीघाटाच्या माध्यमातून नदीचे पाणी प्रदूषित होते. कपडे धुतल्यानंतर धोबीघाटमधून निघणारे साबणाचे पाणी, साबणाचे तुकडे त्यासोबतच साबणाच्या पिशव्या या नदीच्या पात्रातच फेकल्या जातात. परिसरातल्या वस्त्यांमधून सांडपाणी, मलमूत्र विसर्जनाचे पाईप थेट नदीमध्ये सोडण्यात येतात. एवढेच काय, तर घरामधून भिंतीपलीकडे कचरा फेकला जातो. 


पोयसर नदी

संजय गांधी उद्यानातूनच पोयसर नदीचे उगम स्थान आहे. संजय गांधी उद्यानातून निघणारी ही नदी पुढे आप्पा पाडा, क्रांती नगर, कुरार गाव, हनुमान नगर, महिंद्रा अँड महिंद्रा इथून मालाड खाडीला मिळते. समता नगर, ठाकूर कॉम्प्लेक्स, जोगळेकर नाला, मजिठिया नाला असे नाले या नदीला जोडले गेले आहेत. त्यामुळे या नाल्यांचे घाण पाणीसुद्धा या नदीत मिसळते. 1985 साली नदीला पूर आला होता. या पुरामुळे मोहितेवाडी उद्धवस्त झाली होती. आता हा भागच अस्तित्वात नाही.   पोयसर नदीच्या पुनरुज्जीवनासाठी कांदिवलीकरांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून कांदिवलीकरांनी प्रवाहात उतरून नदी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. पण पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण होते. स्वच्छ केलेल्या ठिकाणी काही दिवसांमध्ये पुन्हा उकिरडा झालेला दिसतो. पण कांदिवलीकरांनी हार मानलेली नाही. 'रिव्हर मार्च' या संस्थेच्या मदतीने पोयसर नदीच्या काठावरील वस्त्यांमध्ये जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. एकेकाळी नदीचे पाणी आम्ही पिण्यासाठी वापरायचो. सुंदर, स्वच्छ आणि चवीला गोड असे नदीचे पाणी होते. एवढेच काय लहान असताना तर इथे पोहायला देखील यायचो. पण नदी काठच्या परिसरात मानवी वस्ती वाढत गेली. कचरा, प्लॅस्टिक आणि सांडपाणी हे सर्व या नदीत टाकले जायचे. त्यामुळे नदीचे रुपांतर नाल्यात झाले.

अंकुश चव्हाण, रहिवासी


ओशिवरा नदी

ओशिवरा नदीची सुद्धा इतर नद्यांप्रमाणेच दयनीय अवस्था झाली आहे. आरेमधून येणारी ही नदी गोरेगावमधल्या नागरी निवारा, राम मंदिर, ओशिवरा, भगतसिंह नगरमधून वाहत मालाडच्या खाडीत मिळते. मालाडमधले बहुतेक कॉलसेंटर हे नदीच्या काठावर उभारण्यात आले आहेत. शिवाय आरेतल्या तबेल्यांमधून या नदीत मलमूत्र आणि शेण सोडण्यात येते. शिवाय औद्योगिक क्षेत्रातून येणारी रासायनिक द्रव्ये, झोपडपट्ट्यांमधील कचरा, सांडपाणी हे सुद्धा यात फेकले जाते. त्यामुळे ओशिवरा नदीची गटरगंगा झाली आहे.     


मिठी नदी

मिठी नदीची खरी ओळख मुंबईला झाली ती २६ जुलैच्या महाप्रलयानंतरच. २६ जुलै २००५ च्या मुसळधार पावसात नदीने आपले अक्राळ-विक्राळ रूप दाखवले. शांत दिसणाऱ्या या नदीने नुसता हाहाकार माजवला. नदीभोवती वाढलेले अतिक्रमण, नदीतील कचरा, प्लॅस्टिक यामुळे नदीचा जीव घुटमळत होता. अखेर २६ जुलैच्या पावसात नदीचा तोल सुटला. २६ जुलैच्या पावसात नदीचे पात्र धोकादायक पातळीवरून वाहत होते. १६ ते २० फुटांपर्यंत पाण्याची पातळी गेली होती. या प्रलयात अनेकांचे संसार वाहून गेले. कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले होते.शहरातील पावसाचे अतिरिक्त पाणी नैसर्गिकरित्या बाहेर काढणे हे मिठी नदीमुळे शक्य होते. पण २६ जुलैला या नदीमुळेच मुंबईची तुंबई झाली. पण ही वेळ मुंबईकरांवर का आली असावी? याचा विचार कधी कुणी केला आहे का? कुठे ना कुठे मिठीच्या नासाडीला आपण सर्वच जबाबदार आहोत. 


खरेतर मिठी नदी शंभर-दीडशे वर्षांपूर्वी मुंबईच्या सौंदर्य स्थळांपैकी एक असल्याचे बोलले जाते. बोरिवली नॅशनल पार्क इथल्या विहार तलावातून निघणारी ही नदी आरे कॉलनी, पवई तलावाकडून एल अँड टी, जेव्हीएलआर, सीप्झ, विमानतळ, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स मार्गे माहिम खाडीतून अरबी समुद्रात जाते. पूर्वी या नदीचे पाणी इतके शुद्ध होते की लोक पिण्यासाठी हे पाणी वापरायचे. पण आता परिस्थिती वेगळी आहे. मिठी नदी नॅशनल पार्कमध्ये असते तोपर्यंत ती स्वच्छ असते. पण नॅशनल पार्कमधून बाहेर येताच तिचे नाल्यात रूपांतर होते.


शहरीकरण आणि औद्योगिकरणांनीच या नद्यांचा विनाष घडवला आहे. मिठी नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झाले. साहजिकच मिठी नदीच्या परिसरात मानवी वस्त्या उभारण्यात आल्या. काँक्रेटिकरण यामुळे नदी आता बारा महिने वाहू शकत नाही. नैसर्गिक झरे होते ते काँक्रेटिकरणामुळे गाडले गेले. नदी ही संसकृतिचा आधार आहे. आपण ती पूर्णपणे गाडून टाकली आहे. तिच्यावर आपण अर्थ व्यवस्थेचे प्रतिक म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सेंचज उभे केले आहे. विमानतळ बनवताना कुर्ला आणि सांताक्रुझ येथे तिचा मार्ग बदलण्यात आला. त्यामुळे मिठी नदीचा नैसर्गिक प्रवाह थांबला. परिणामी २६ जुलैला मुंबईत पूर आला. मिठी नदीवर वांद्रे-कुर्ला संकुल इथले गार्डन उभारले आहे. एमएमआरडीचे हेड ऑफिस देखील मिठी नदीच्या मूळ पात्रावर उभे आहे.उरलेली कसर वाद्रे-वरळी सीलिंकने पूर्ण केली. वांद्रे-वरळी सीलिंकमुळे मिठी नदीच्या मुखामध्ये येणारी समुद्राची भरती ८०-८५ टक्के अडवली गेली आहे. २६ जुलैच्या महाप्रलयामागे मुख्य कारण वांद्रे-वरळी सीलिंक होते. मुंबईतल्या चारी नद्यांची कहाणी सारखीच आहे. नद्यांच्या काठावर होणारे अतिक्रमण, आसपासच्या परिसरातील कारखान्यांचे दूषित पाणी, छोट्या-छोट्या नाल्यांचे पाणी, नदीत टाकण्यात येणारं प्लॅस्टिक, कचरा हेसुद्धा नद्यांचे नाल्यात रुपांतर होण्यासाठी कारणीभूत आहेत. या सर्वांचाच परिणाम तापमानावर म्हणजे एकूणच पर्यावरणावर याचा परिणाम होतोय. यावर उपाय म्हणजे औद्योगिकरण आणि शहरीकरणावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. जर थांबता येत नसेल तर आपणच आपल्या विनाषाला जबाबदार असणार आहोत.   

- गिरीष राऊत, पर्यावरण तज्ज्ञ


नद्यांच्या स्वच्छतेसाठी 'रिव्हर मार्च'चा पुढाकार


मुंबईमध्ये असलेल्या या चार नद्या मुंबई शहरातून वाहत जाऊन समुद्राला मिळतात. जेव्हा या नद्या उगमापासून बाहेर पडतात, तेव्हा त्या स्वच्छ असतात. अगदी नॅशनल पार्कच्या क्षेत्रात असतात तोपर्यंत स्वच्छ खळखळते पाणी असते. पण नॅशनल पार्क क्षेत्रातून बाहेर जाताच या नद्या मृत बनतात. मुंबईचे शहरीकरण आणि काँक्रेटायझेशन झाल्याने नद्यांचे प्रवाह चिंचोळे झाले आहेत. त्यात दुनियाभरचा कचरा तर असतोच. मग पुढे नद्यांचे पाणी समुद्राला मिळते. त्यासोबतच सर्व कचराही समुद्रात फेकला जातो. मग तिकडून हा कचरा समुद्राच्या किनाऱ्यांवर येतो. कुठे ना कुठे हे चक्र थांबणे आवश्यक आहे. यासाठी आता 'रिव्हर मार्च'ने पुढाकार घेतला आहे. चार मित्रांनी सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेने चांगलाच लौकिक मिळवला आहे. संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करताना मृत अवस्थेत सापडलेल्या हरणाच्या पोटातून चक्क दोन ते तीन किलो प्लॅस्टिक बाहेर आले. त्यानंतर या चारही मित्रांनी नॅशनल पार्कमधील कचरा वेचण्याचा उपक्रम सुरू केला. वर्षभरात अंदाजे 80 किलो प्लॅस्टिक कचरा जमा करण्यात आला. हा उपक्रम राबवणाऱ्या तरूणांची नावे आहेत, गोपाल झवेरी, कमल कोठारी, अनिल पंड्या आणि बजरंग अग्रवाल. मुंबईतल्या नद्यांच्या संदर्भात कळल्यानंतर चौघे झपाट्याने कामाला लागले. आत्तापर्यंत रिव्हर मार्चने दहिसर, पोयसर आणि ओशिवरा नदीमध्ये स्वच्छता मोहीम राबवली आहे. पाणी व्यवस्थापनेत सिंगापूर अव्वल


मुंबईचे क्षेत्रफळ ६൦൦ चौरस फूट आहे तर सिंगापूर ५൦൦ चौरस फूट आहे. मुंबईतल्या नद्यांसारखीच अवस्था होती सिंगापूरमधल्या नद्यांची. काही वर्षांपूर्वी सिंगापूर आणि कलांग या नद्या अत्यंत दयनीय अवस्थेत होत्या. तत्कालीन पंतप्रधान ली कुआन यू यांनी या नद्यांच्या शुद्धीकरणाचे आव्हान स्विकारले. या दोन नद्या शुद्धीकरणाच्या कामाला १൦ वर्ष लागली. आज या नद्या स्वच्छ आणि सुंदर झाल्या आहेत. सिंगापूरमधल्या सरकारने नदी काठच्या वस्तीचे आणि फेरीवाल्यांचे दुसऱ्या जागी स्थलांतर केले. एवढेच नाही तर नदीच्या मार्गाने जाणाऱ्या बमबोट्सचा त्यांनी मार्ग बदलला. त्यानंतर नदीच्या तळागळातील गाळ काढण्यात आला. २൦൦൦ पर्यंत सिंगापूरमध्ये अनेक पूर आले. पण २००८ मध्ये उभारण्यात आलेल्या मरीना बराज या प्रकल्पामुळे तोही प्रश्न सुटला. मरीना बराज प्रकल्पात नऊ दरवाजे आणि सात पंप आहेत जे समुद्राचे पाणी बाहेर फेकून पावसाचे पाणी साठवून ठेवतात. 


मुंबईतल्या सर्व नद्यांचा आम्ही आढावा घेतला तेव्हा एकच सकारात्मक चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. माणसामुळे या नद्यांचे नाले झाले. पण नद्यांना पुनरुज्जीवन मिळू शकते. फक्त मुंबईकरांची साथ असेल, तर हे नक्कीच शक्य आहे. कदाचित कोणे एकेकाळी मुंबईकरांना जीवदान देणाऱ्या या नद्या त्याच मुंबईकरांमुळे एकदिवस मोकळा श्वास घेतील.


फोटो - गणेश रहाटे


हेही वाचा

मुंबईत होऊ शकते महापुराची पुनरावृत्ती!

हे वॉटरफॉल की दारूचे अड्डे?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)
Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.