Advertisement

पैठणी विकत घ्यायचीय? मग 'या' फेस्टिव्हलमध्ये नक्की या!


पैठणी विकत घ्यायचीय? मग 'या' फेस्टिव्हलमध्ये नक्की या!
SHARES

आपल्या कपाटात एक तरी पैठणी असवी, असे प्रत्येक महिलेला वाटते. पण जगप्रसिद्ध पैठणी साडी तयार करण्यासाठी लागणारे रेशमी, जरी, चांदी यांचे भाव वाढलेले असताना या साड्या तयार करणारे कुशल कारागीरही चढे दर आकारतात. या पैठणींचे दर दिवसेंदिवस सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. परिणामी सगळीकडे दुय्यम दर्जाच्या आणि मशीनवर तयार केलेल्या सेमी पैठणी आणि डुप्लीकेट पैठणी सर्रासपणे अस्सल पैठणी म्हणून विकल्या जातात. यामुळे सामान्य ग्राहकांची फसवणूक होते.



सामान्य ग्राहकांची फसवणूक होऊ नये, तसेच याला, संभाजीनगर येथील कारागिरांना पैठणीकरता थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या विचारातून 1989 मध्ये सरोज धनंजय यांनी पैठणीचे माहेरघर असलेल्या येवला येथून अस्सल हातमागावरच्या विणकाम केलेल्या पैठणी साड्या प्रायोगिक तत्वावर मुंबईत आणून एक वार्षिक प्रदर्शन भरवले होते. तेव्हापासून या पैठणी प्रदर्शनाला सुरुवात झाली. सर्वात जुना आणि प्रख्यात असा 28 वा न्यू वेव्ह पैठणी फेस्टिव्हल यावर्षी 4 ऑक्टोबर 2017 रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे भरवण्यात आला आहे.


यंदा अक्षर पैठणीचे वेगळेपण

फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी प्रसिद्ध अक्षर सुलेखनकार अच्युत पालव यांनी पैठणी साड्यांवर बिस्पोक आर्टची झलक दाखवली. बिस्पोक आर्ट वर्कचे लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवले. अच्युत पालव हे भारतीय सुलेखन क्षेत्रातील एक प्रख्यात नाव आहे. भारतीय सुलेखनाचे वैभव पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या वर्कशॉपच्या माध्यमातून त्यांनी पैठणी साड्यांवर भारतीय संस्कृती आणि कलांचे परिपूर्ण मिश्रण दाखवले.



पालव म्हणाले, मी पारंपरिक निर्मितीचा आदर करतो. प्राचीन कलेसोबतच सद्यस्थितीत जी कला विकसित होत आहे, त्याकडे पाहून क्लासिक आणि कन्टेम्पररी डिझाईन एकत्र करण्यासाठी मला प्रेरणा मिळते. पारंपरिक माध्यमांवरील नवनिर्मितीमध्ये मला कौशल्यपूर्वक प्रयोग करायला आवडते.


या पैठणी आहेत फेस्टिव्हलमध्ये उपलब्ध

रेड, व्हायलेंट, मजेंटा, मोरपंखी, पर्ल, पिंक, पेस्टल्स इत्यादी नवीनतम ट्रेंडी रंगांसह सफेद, हिरवा, गुलाबी, राखाडी आणि काळा अशा सगळ्या प्रकारच्या पैठणी साड्या पहायला मिळत आहेत. या सर्व साड्या मुख्यतः त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि पारंपरिक डिझाईन्ससाठी प्रसिद्ध आहेत. या प्रदर्शनासाठी विशेषतः 250 पेक्षा जास्त पारंपरिक आणि डिझायनर पैठणी साडीचे सादरीकरण करण्यात आले आहे. या साड्यांच्या किंमती 7000 ते 2.5 लाखापर्यंत असेल.



पैठणीशिवाय काय काय पहाता येईल प्रदर्शनात?

पाच दिवसांच्या पैठणी प्रदर्शनात सर्व राज्यांतील वैविध्यपूर्ण साड्या जसे माहेश्वरी, चंदेरी, कांथा, इरकली, टस्सर, कोसा, काश्मिरी, कोलकाता, ओरिसा, पुणेरी साड्या आदी अनेक प्रकारच्या साड्या, पैठणीचे ड्रेस, ड्रेस मटेरियल, दुपट्टा, स्कार्फ, सेमिप्रेशियस स्टोन ज्वेलरी, हँडमेड बॅग्स असे विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले आहेत.


वैशिष्ट्यपूर्ण कामाचा मोठा उत्सव - संचालिका सन्निधा भिडे

पैठणी साडी ही एका रात्रीत तयार होत नाही, तर त्यासाठी खूप वेळ लागतो. आकर्षक आणि भरजरी पैठणी तयार करण्यासाठी सुमारे सहा महिने ते एक वर्ष कालावधी लागतो. त्यासाठी हजारो कारागीर मेहनत घेत असतात. एवढ्या वर्षानंतरसुद्धा न्यू वेव्ह पैठणी फेस्टिव्हलबद्दल लोकांमध्ये आकर्षण वाढत आहे. गेल्या काही वर्षांत न्यू वेव्ह पैठणीमध्ये फार बदल होत गेले आणि आता पैठणी प्रदर्शन हे फक्त एक प्रदर्शन राहिले नसून रंग, डिझाईन, वैशिष्ट्यपूर्ण काम यांचा एक मोठा महोत्सव झाला आहे. बिस्पोक आर्ट केलेल्या पैठणी साड्यांचा नंतर लिलाव केला जाईल आणि त्यातून येणाऱ्या रकमेतून काही रक्कम आर्टिस्ट्सला दिली जाईल. उर्वरित रक्कम सामाजिक कार्याकरता दिली जाईल, असे न्यू वेव्ह पैठणी फेस्टिव्हलच्या संचालिका सन्निधा भिडे यांनी सांगितले.

हा फेस्टिव्हल 4 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 8 पर्यंत खुला राहणार आहे. 'न्यू वेव्ह पैठणी'च्या उद्घाटन समारंभासाठी परराष्ट्र दूतावासातील राजनायिकांचा सहभाग होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस, त्यांची वाहिनी रेखा फडणवीस आणि बहीणसुद्धा या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित होते.

पैठणी हा महाराष्ट्रीयन स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आज 75 वर्षांची आहे, तरी पण पैठणीसाठी असलेलं प्रेम आणि जिव्हाळा अजूनही तसाच आहे. अशा प्रकारच्या खास पैठणींचे प्रदर्शन व्हायला हवे. सुलेखनकार अच्युत पालव यांनी पैठणी साडीवर केलेल्या बिस्पोक आर्टमुळे मला पहिल्यांदाच अनोखी आणि अतिशय छान अशी अक्षर पैठणी पाहायला मिळाली.

सरिता फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आई



हेही वाचा -

फूड फेस्टिव्हलचं आयोजन

नवरात्री स्पेशल - सव्वाशे साड्या परिधान करणारी 'दक्षिण मुंबईची महालक्ष्मी'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा