Advertisement

मुंबईत बंगाली दुर्गा उत्सवाला सुरुवात


मुंबईत बंगाली दुर्गा उत्सवाला सुरुवात
SHARES

नवरात्रीदरम्यान शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी बंगाली दुर्गा देवीचीही प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्याप्रमाणे शिवाजी पार्क येथेही बंगाल क्लबकडून देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. या देवीची मूर्ती 'बंगाली देवी' म्हणून मुंबईत प्रसिद्ध आहे. गेल्या 82 वर्षांपासून बंगाल क्लबकडून देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते.

पूर्वी देवीच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोषणाई आणि सजावट दिसून येत असे. परंतु, गतवर्षीपासून शिवाजी पार्क हे शांतता क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गाणी वाजवणे, नृत्य करणे किंवा कोणतेही आवाज करण्याला कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. तरीही बंगाल क्लबकडून सजावटीमध्ये कोणतीही कसूर पहायला मिळत नाही. खास दुर्गा देवीच्या उत्सवासाठी भव्य सुंदर सुबक असा महाल या ठिकाणी साकारण्यात आला आहे.



शिवाजी पार्क दादर येथील बंगाल क्लब असोसिएशनच्या या देवीला 82 वर्षांचा एक वेगळा जुना इतिहास असल्यामुळे इथल्या देवीच्या पूजेचा एक वेगळाच मान असतो. शहर आणि उपनगरातले बंगाली तसेच इतर भाविक या देवीच्या दर्शनाला आवर्जून शिवाजी पार्क येथे येतात.



महाराष्ट्रातील भाविक ज्याप्रमाणे अंबा देवीची या काळात पूजा करतात, त्याचप्रमाणे बंगाली बांधव नवरात्रीच्या षष्टीपासून ते दसऱ्यापर्यंत दुर्गा मातेची पूजा करतात. बंगालचे मूर्तिकार उत्तम पाल हे उत्सवापूर्वीच शिवाजी पार्कच्या मैदानात या दुर्गा देवीची भव्य मूर्ती तयार करतात. मुंबईत अनेक बंगाली कलाकारांच्या घरी तसेच अंधेरी, ठाणे, मालाड, बोरिवली, वांद्रे, अॅन्टॉप हिल, परळ या ठिकाणी सार्वजनिक मंडळे देखील या बंगाली देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्क येथे दुर्गा देवीच्या उत्सवाची सजावट करण्यात आली आहे. परंतु, या ठिकाणी असलेल्या कालीमाता मंदिराजवळच्या क्रीडा भवनच्या परिसरामध्ये बंगाली दुर्गोत्सवाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा देवीच्या मंडपाची जागा बदल्याण्यात आली आहे.

रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त, जी उत्तर विभाग


अॅन्टॉप हिल येथील सी. जी. एस. कॉलनीमधील बंगाली देवी

अॅन्टॉप हिल येथील सी. जी. एस. कॉलनीमध्ये बंगाली असोसिएशनतर्फे नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या असोसिएशनचे यंदाचे हे 32 वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बंगाली परंपरेनुसार दुर्गा देवीची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा केली जात आहे.

येथे साजरा होणारी दुर्गा पूजा ही संपूर्ण बंगाली परंपरेनुसार केली जाते. कोलकाताहून आलेले गुरुजी येथे विधीवत पूजा करतात तर, पूजेच्या वेळेस महिला 'धुनुची' पेटवून देवीपुढे आरती करतात. त्यावेळी 'ढाक' हे बंगाली वाद्य वाजवले जाते. बंगाली भाषिकांमध्ये हा सण महत्त्वपूर्ण मानला जातो. त्यासाठी मुंबईमध्ये देखील तो त्याच परंपरेनुसार आम्ही साजरा करतो.

दीपेंदू पुरकायस्थ, सभासद, बंगाली असोसिएशन



हेही वाचा - 

'देवीला दान नको, पण गरीबांना कपडे द्या'!

नवरात्री स्पेशल - सव्वाशे साड्या परिधान करणारी 'दक्षिण मुंबईची महालक्ष्मी'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा