Advertisement

दिवाळीची शॉपिंग करताय? मग दादरमध्ये या!


दिवाळीची शॉपिंग करताय? मग दादरमध्ये या!
SHARES

दिवाळी म्हटलं तर रांगोळी, पणत्या, आकाश कंदील, फराळ, मिठाईसह, कपडे, दागिने प्रत्येक गोष्टीच्या खरेदीसाठी मुंबईकर दादरच्या बाजारपेठेत आवर्जून येतात. दिवाळीच्या यंदाच्या खरेदीवर जीएसटीमुळे महागाईचे सावट असले तरीही नागरिक खरेदी करताना दिसत आहेत.



भारतीय बनवटीच्या लाईटच्या माळा

बाजरपेठेत भारतीय बनवटीच्या वस्तूंना लोकांची विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे. मातीच्या पणत्यांमध्ये लाईटचे छोटे बल्ब लावून तयार करण्यात आलेल्या आकर्षक पणत्यांच्या माळा ग्राहकांचे आकर्षण आहेत. डेकोरेशनसाठी वापरात येणाऱ्या या माळा अवघ्या 250 रुपयांपासून आहेत. दरवर्षी दादरच्या बाजारपेठेत चीनी लाईटच्या तोरणांना विशेष मागणी असल्याचे पहायला मिळत होते. परंतु, यंदा मात्र भारतीय बनवटीच्या लाईटच्या तोरणांना मागणी आहे.



भारतीय बनावटीचे कंदील

भारतीय बनावटीच्या कंदीलांमध्ये लोकरीचे कंदील, पतंग कागदाचे कंदील, तसेच नव्याने मार्केटमध्ये दिसत असलेले विणलेले कंदील ग्राहकांचे आकर्षण ठरत आहेत. हे कंदील हाताने विणलेले असल्यामुळे मजबूत आहेत. किमतीने महाग असले तरीही लोकांच्या पसंतीस उतरतील अशा या कंदीलांची किंमत 1000 रुपयांपासून सुरू आहे.



मातीच्या पणत्या

दादरच्या बाजरपेठेत यंदा सर्व पणत्या धारावीतून खरेदी केलेल्या मातीच्या आणि भारतीय बनावटीच्या आहेत. या पणत्यांची किंमत 30 रुपये ते 60 रूपयांदरम्यान आहे.


गिफ्टसाठी चॉकलेट बॉक्स विशेष पर्याय!

सुका मेवा महागल्यामुळे दिवाळी भेट म्हणून देण्यासाठी चॉकलेट बॉक्स लोकांसाठी विशेष पर्याय ठरत आहेत. जितके चॉकलेट तितकी त्या बॉक्सची किंमत वेगवेगळी असलेली पाहायला मिळत आहे. आकर्षक पद्धतीने पॅकिंग केलेले हे चॉकलेट बॉक्स सिंगल पीस 5 रुपये 10 रुपये प्रमाणे घेऊन घरगुती पद्धतीने देखील सजवून भेट देता येऊ शकतात.



रांगोळी खरेदीसाठी महिलांची घाई

दादर कबुतरखान्यापासून दादर फुल मार्केटपर्यंत रंगेबेरंगी विविध प्रकारच्या मिक्स तसेच पावडरच्या रांगोळ्या उपलब्ध आहेत. 10, 20 रुपये ग्लास प्रमाणे आणि 5 रुपयांपासून वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये देखील या रांगोळ्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. ज्या गृहिणींना रांगोळी काढता येत नाही, अशा गृहिणींसाठी खास प्लास्टिकमध्ये रांगोळीचे छापे, ठिपक्यांचे कागद, रांगोळीची पुस्तके उपलब्ध आहेत.



महाराष्ट्र व्यापारी पेठेतील डिझायनर रांगोळ्या

आकर्षक आणि डिझाईनर असलेल्या या रांगोळ्या बाजारपेठेत हल्ली 50 रुपयांपासून 1000 रुपयांर्यंत सहज उपलब्ध आहेत. त्यामध्ये अगदी ताटाभोवती असणारी रांगोळी, उंबरठ्यावर असलेली रांगोळी, दरवाजामध्ये असलेली रांगोळी उपलब्ध आहे. गेल्या 1-2 वर्षांत सुशोभिकरणाच्या वस्तूंमध्ये या डिझायनर रांगोळ्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या रांगोळ्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एक सेट खरेदी केल्यानंतर त्याची रचना किमान 2 पद्धतीच्या डिझाइनमध्ये करता येते. त्याचबरोबर वापरून झाल्यानंतर या डिझायनर रांगोळ्या व्यवस्थित ठेवल्या तर त्यानंतरच्या सणालादेखील वापरता येतात.

दिवाळीदरम्यान विशेष पणत्यांची रचना असलेल्या रांगोळ्या बाजारपेठत विक्रीसाठी आलेल्या दिसून येतात. अशा रांगोळ्यांमध्ये मोर, कमळ, विविध फुले, कोयरी, स्वस्तिक अशा डिझाइन उपलब्ध आहेत. या रांगोळ्यांनी घरगुती विणकाम आणि सुशोभिकरणाच्या वस्तू तयार करणाऱ्या महिलांना एक रोजगार निर्मिती झाली आहे. अशा रांगोळ्या फक्त नेहमीच्या बाजारपेठेतच नव्हे, तर दादरच्या महाराष्ट्र व्यापारी पेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.


दिवाळीनिमित्त दादरमध्ये वाजवी दरात घरगुती फराळ

मुंबई शहरात रोज कामाला जाणाऱ्या महिलांना धकाधकीच्या जीवनात फराळ तयार करायला वेळ मिळत नाही. अशा महिलांसाठी मिठाईच्या दुकानांमध्ये विविध प्रकारचा दिवाळीचा फराळ उपलब्ध असतो. असे असले, तरी महागाईमुळे पदार्थांचे भाव प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. या वाढत्या महागाईत देखील ग्राहकांना उत्साहात दिवाळी साजरी करता यावी, यासाठी दादरच्या फुटपाथवर दिवाळीपूर्वी घरगुती फराळाचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. 

लोकांना घरगुती फराळ कमी किंमतीत मिळावा आणि घरगुती खाद्यपदार्थ बनवणाऱ्या महिलांना व्यापारी पेठ मिळावी या हेतूने दादरच्या फुटपाथवर दरवर्षी हे स्टॉल्स लावण्यात येतात. दिवाळी पूर्वी 8 दिवस हे स्टॉल्स कबुतर खाना, गोखले रोड, सेना भवन समोरील फुटपाथ, तसेच शारदाश्रम शाळेसमोरील फुटपाथवर लावण्यात येतात. यामध्ये फक्त दादरच नाही, तर इतर ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्याही स्टॉल्सचा समावेश असतो. दुकानात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या तुलनेत अत्यंत वाजवी दरात हे फराळ उपलब्ध असतात.


खरेदीसाठी दादरच्या महाराष्ट्र व्यापारी पेठेत लोकांची गर्दी

दिवाळीची खरेदी सोपी व्हावी यासाठी दादरच्या महाराष्ट्र व्यापारी पेठेत ग्राहक गर्दी करत आहेत. एकाच छताखाली घरगुती सुशोभिकरणासह फराळाच्या वस्तू उपलब्ध आहेत. त्यामुळे यंदाही व्यापारी पेठेत लोकांची गर्दी पहायला मिळत आहे. घरात लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे लोकांचा प्रतिसाद उत्तम असल्याचे पहायला मिळत आहे.


सुक्या मेव्याचे भाव वाढले, ग्राहकांची खरेदीकडे पाठ

बाजारपेठेत सुक्या मेव्याच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दादरमध्ये पहायला मिळत मिळत आहे. सालाबादप्रमाणे दिवाळीसाठी मार्केटमध्ये सुक्या मेव्याची आवक झाली आहे. परंतु, खरेदी मात्र तितकी झाल्याचे दिसत नाही. जीएसटीमुळे सुक्यामेव्याचे भाव वाढल्यामुळे सुक्या मेव्याचा बाजार फिका पडलाय, असे म्हणायला हरकत नाही. 

घरगुती वापरात दिवाळीत जरी मोजका सुका मेवा वापरला जात असला, तरी त्याचे प्रमाण मोजके असते. परंतु, हल्ली दिवाळीत सुक्या मेवाच्या बॉक्स गिफ्ट देणे हा नवीन ट्रेंड झाला आहे. अनेक कंपन्या उद्योग समूह हल्ली कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सुका मेवा त्याचे विविध आकारातील बॉक्स गिफ्ट देतात. त्यामुळे या सुक्या मेव्याला बाजारपेठेत विशेष मागणी असायची. यंदा बादामावर 12 टक्के काजूवर 5 टक्के असा जीएसटी लागू झाल्यामुळे यांचे भाव अधिक वाढलेले पहायला मिळत आहेत.

गिफ्ट द्यायला खरेदीसाठी मिळणारे 700 रुपयांच्या सुक्या मेव्याच्या बॉक्सची किंमत 1000 रुपये झाली आहे. महागाईमुळे सध्या ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या बाजरपेठेत बदामाचे दर 1200, काजू 800 रुपये, चारोळे 1000 रुपये किलो, पिस्ता 900-1500 रुपये किलो, अक्रोड 1200 रुपये, खारीक 180 रुपये किलोपासून वेगवेगळ्या दरांमध्ये उपलब्ध आहेत.



हेही वाचा - 

गिफ्ट, सुक्या मेव्याकडे ग्राहकांनी फिरवली पाठ


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा