घरगुती तयार फराळ हवाय? मग दादरला या..!

  दादर मार्केटसह कबुतरखाना, गोखले रोड आणि सेना भवन, शारदाश्रम शाळा या ठिकाणालगतच्या फुटपाथवर घरगुती तयार फराळाचे स्टॉल यंदा मोठ्या प्रमाणात लागले आहेत. हा फराळ स्वस्त आणि मस्त असल्याने नक्कीच नोकरदार महिलांसह प्रत्येक गृहिणीच्या पसंतीस पडत आहे.

  Dadar
  घरगुती तयार फराळ हवाय? मग दादरला या..!
  मुंबई  -  

  दिवाळी फराळाशिवाय साजरी होऊच शकत नाही. त्यामुळे दिवाळीत फराळ हवाच. पण अनेक नोकरदार महिलांना वेळ काढून फराळाचा घाट घालत फराळ तयार करणे शक्यच होत नाही. त्यामुळे अशा महिलांचा कल गेल्या काही वर्षांपासून वाढलाय तो तयार फराळ खरेदी करण्याकडे. पण हे तयार फराळ घरगुती फराळापेक्षा महाग असतातच, पण त्याचवेळी त्याच्या दर्जाचाही प्रश्न उपस्थित होतो. म्हणूनच नोकरदार महिलांचा आता शोध असतो तो तयार घरगुती आणि दर्जा असलेला फराळ कुठे मिळेल याकडे!  तर, मग या शोधात असलेल्या महिलांनी यंदाच्या दिवाळीत एकदा दादरला भेट द्यायलाच हवी! दादर मार्केटसह कबुतरखाना, गोखले रोड आणि सेना भवन, शारदाश्रम शाळा या ठिकाणालगतच्या फुटपाथवर घरगुती तयार फराळाचे स्टॉल यंदा मोठ्या प्रमाणात लागले आहेत. हा फराळ स्वस्त आणि मस्त असल्याने नक्कीच नोकरदार महिलांसह प्रत्येक गृहिणीच्या पसंतीस पडत आहे.  हे फराळ महिलांनी, महिलांच्या गटांनी, संस्थांनी तयार केले असून ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या या स्टॉलला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेली 50 वर्ष शिवसेना भवन परिसरात स्टॉल लावणाऱ्या सीमा नायक सांगतात, 'यंदा आमच्या फराळाला चांगली मागणी असून आम्ही व्हॉटसअॅपवरूनही फराळाच्या ऑर्डर्स घेतल्या आहेत. ग्राहकांना ताजा आणि चांगला फराळ मिळावा हा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळेच ग्राहक आमच्याकडे वळत आहेत. अगदी ठाणे, पुणे, पनवेलचे ग्राहकही आमचा फराळ विकत घेत आहेत. या फराळ विक्रीतून आम्हाला पैसा मिळत आहेच, पण फराळ तयार करणाऱ्या महिलांनाही रोजगार मिळत आहे. त्यामुळे ही माझ्यासाठी मोठी समाधानाची बाब आहे.  असे आहेत फराळाचे दर (प्र. किलो रु.)

  • चकली - 280
  • चिवडा - 240
  • करंजी - 300
  • शंकरपाळी - 240
  • बेसनलाडू - 300

  तेव्हा मग फराळ करायला वेळ नसेल तर आधी दादरला या आणि घरगुती तयार फराळ खरेदी करत यंदाची दिवाळी दणक्यात साजरी करा!  हेही वाचा

  दिवाळीत फटाके फोडण्याआधी जरा हे वाचा!


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.