Advertisement

दिवाळीत फटाके फोडण्याआधी जरा हे वाचा!

दिवाळीत मोठमोठाले बॉम्ब लावणे, कर्णकर्कश्श्य आवाजाचे फटाके फोडणे, फटाक्यांच्या माळा लावणे यात आपण धन्यता मानतो. पण, तुम्हाला कल्पना देखील नसेल, की अशा फटाक्यांचा मुक्या प्राण्यांना किती त्रास होतो.

दिवाळीत फटाके फोडण्याआधी जरा हे वाचा!
SHARES

धूम धडाक्यात दिवाळी साजरी करण्याची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच इच्छा असते. मग दिवाळीत मोठमोठाले बॉम्ब लावणे, कर्णकर्कश्श्य आवाजाचे फटाके फोडणे, फटाक्यांच्या माळा लावणे यात आपण धन्यता मानतो. पण, तुम्हाला कल्पना देखील नसेल, की अशा फटाक्यांचा मुक्या प्राण्यांना किती त्रास होतो? तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण मोठ्या आवाजाच्या फटाक्यांनी मुक्या प्राण्यांचा जीव देखील जाऊ शकतो.


कुत्रे आणि मांजरांना सर्वाधिक त्रास

फटाक्यांचा सगळ्यात जास्त त्रास कुत्रे आणि मांजरांना होतो. कुत्रे आणि मांजरांची ऐकण्याची समस्याच ही माणसाच्या 200 पट अधिक असते. बॉम्बच्या आवाजाने आपल्या कानठळ्या बसतात. तोच आवाज जर 200 पटींनी तीव्र केला, तर आपले कान फाटायला वेळ लागणार नाही. मग विचार करा की, कुत्रे आणि मांजरांना एका साध्या लवंगीपासून ते सुतळी बॉम्बचा किती त्रास होत असेल?

कुत्र्याची वास घेण्याची क्षमता ही माणसाच्या क्षमतेपेक्षा तब्बल 700 ते 800 पट जास्त असते. फटाके फोडल्याने धूर आणि कचरा होतो. अशा वेळी मोठ्या प्रमाणात हा धूर कुत्र्यांच्या शरीरात जातो, ज्याने त्यांना श्वसनाचे विकार होतात.

कित्येकदा कुत्र्यांवर फटाके फेकले जातात, त्यांच्या शेपटीला फटाके बांधून फोडण्यात देखील काही विकृतांना आसूरी आनंद मिळतो. यात कुत्रे भाजतात. काही घटनांमध्ये कुत्र्यांचा जीव देखील जातो.

डॉ. जे. सी. खन्ना, सचिव, पशु वैद्यकीय रुग्णालय, परळघरातील प्राण्यांना देखील होतो त्रास

फटाक्यांचा त्रास हा फक्त रस्त्यावरील जनावरांनाच होतो असं नाही, तर आवाजामुळे घरातील पाळीव प्राणी देखील घाबरतात, बिथरतात. फटाक्यांच्या आवाजाने कुत्र्यांमध्ये आणि मांजरांमध्ये हार्मोनल बदल होतात. फटाक्यांमुळे ते घाबरतात आणि लपून बसतात. आपोआप त्यांचं जेवण कमी होतं, कित्येकदा त्यांना उलट्या देखील झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. मोठ्या आवाजामुळे पाळीव प्राणी घरातून पळून जाण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. काही केसेसमध्ये असे घाबरलेले प्राणी आक्रमक झाल्याचंदेखील समोर आलं आहे.


दिवाळीच्या दिवसांत पाळीव प्राण्यांची कशी घ्याल काळजी?

आवाजामुळे घाबरलेल्या प्राण्याला जवळ घेऊन त्याचे लाड करणे यासारखा उत्तम उपाय नाही. त्याचबरोबर त्याच्या खाण्याच्या वेळा बदलल्यास त्यांचं जेवण कमी होणार नाही, दिवाळीच्या दिवसांत संध्याकाळी थोडं लवकर किंवा रात्री उशीरा जेवण देण्याचा सल्ला डॉ. जे. सी. खन्ना यांनी दिला आहे.पक्ष्यांना देखील होतो त्रास

फटाक्यांमुळे आवाजासह खूप धूर होतो. या धुराचा मोठ्या प्रमाणात त्रास हा पक्ष्यांना देखील होतो. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. शिवाय, जास्त धुरामुळे माणसाप्रमाणे त्यांच्या डोळ्यातून पाणी येते. वातावरणातील धुराने कबुतरं आकाशातून खाली पडल्याच्या घटना देखील घडत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

दरवर्षी तब्बल 200 ते 250 कबुतर दिवाळीदरम्यान परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात येतात. आकाशात उंचावर फिरणाऱ्या घारी देखील उपचारासाठी या रुग्णालयात आणल्या जातात. यावरुन आपल्याला अंदाज येऊ शकतो की फटाक्यांचा धूर वातावरणात किती वर पर्यंत पसरू शकतो.हेही वाचा

रुग्णालायत लाडक्या `पेट`ची तुम्ही करू शकता सोबत!


संबंधित विषय
Advertisement