Advertisement

बेशिस्त पार्किंगमुळे कोंडले लालबागचे रस्ते!

लालबागचा राजा, गणेशगल्ली, चिंतामणीसह परळ भागात गणेशदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढतच आहे. या वाढत्या गर्दीला आवरण्यासोबतच पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे ती इथल्या बेशिस्त पार्किंगने.

बेशिस्त पार्किंगमुळे कोंडले लालबागचे रस्ते!
SHARES

लालबागला गणेश दर्शनासाठी निघाला असाल, तर वाहन घेऊन न जाण्याचाच प्रयत्न करा द्या. कारण लालबागचा राजा, गणेशगल्ली, चिंतामणीसह परळ भागात गणेशदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढतच आहे. या वाढत्या गर्दीला आवरण्यासोबतच पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे ती इथल्या बेशिस्त पार्किंगने. दर्शनासाठी येणारे भक्त कुठेही, कशाही पद्धतीने वाहन पार्क करत असल्याने स्थानिक रहिवाशांना त्याचा त्रास तर होत आहेच; पण पोलिसांनाही वाहतूककोंडीने 'जाम' करून टाकलं आहे. त्यात पार्किंगचे नियम वेशीला टांगणारे बेशिस्त वाहनचालकांची अरेरावी वेगळीच. त्यामुळे कारवाई करूनही मनस्ताप आणि न करूनही अडचण अशा दुहेरी 'कोंडीत' पोलिस स्वत:च अडकलेत.
रस्त्यावरील बेशिस्तपणा

मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी १२ सप्टेंबरच्या रात्रीपासून गर्दी करायला सुरूवात केली होती. यंदाच्या वेळी लालबागच्या राजाच्या डिजिटल देखाव्यामुळे भाविकांच्या गर्दीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच दर्शनासाठी येणारे काही बेशिस्त वाहनचालक वाहतुकीचे नियम तोडून वाहने रस्त्यावर कशीही उभी करून थेट निघून जात आहेत. तर दर्शन घेऊन आलेल्या भाविकांसाठी टॅक्सीवालेही रस्त्यातच गाडी थांबवत आहेत. त्यामुळे भारतमाता चित्रपटगृहापासून लालबागच्या राजापर्यंत जाण्यासाठी वाहनधारकांना अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागत आहे.
पोलिसांकडून कारवाई

या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बेशिस्तपणे वाहनपार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी भायखळा आणि सुपारी बाग वाहतूक नियंत्रण कक्षाकडून मोहीम सुरू करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भायखळा वाहतूक विभाग दिवसाला ३५० ते ४०० दुचाकी व ३५ ते ४० चारचाकी वाहनांवर कारवाई करत आहे. तसंच सुपारीबाग विभागाकडून दिवसाला १५० ते २०० दुचाकी व २० ते २५ चारचाकी गाड्यांवर कारवाई केली जात आहे.

वाहतूक पोलिसांना कारवाईसाठी साधनसामुग्री तोकडी पडत असल्यामुळे वाॅकीटाॅकी, टोईंग व्हॅन आणि इतर साहित्यांची वाढीव कुमक उपलब्ध करून देण्यात आल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.हेही वाचा-

पाच दिवसांच्या बाप्पाचं सोमवारी विसर्जन, चौपाट्या सज्ज

'बाप्पाच्या पुढ्यात ठेवलेली फळं वाया जावू नये' रोटी बँकेचं आवाहनRead this story in English
संबंधित विषय
Advertisement