मुंबईतल्या ‘या’ ७ स्थानकांवर फडकताहेत १०० फूट उंचीचे झेंडे

पाऊस कमी झाल्याने मुंबईतील सर्वात व्यस्त ७ रेल्वे स्थानकांवर पुन्हा एकदा राष्ट्रध्वज लावण्यात आलेत. मोठ्या डौलाने फडकणारे १०० फूट उंचीचे हे झेंडे पाहून प्रवाशांचा उर अभिमानाने भरून येतोय.

मुंबईतल्या ‘या’ ७ स्थानकांवर फडकताहेत १०० फूट उंचीचे झेंडे
SHARES

संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येतोय. देशवासीयांच्या अभिमानाचं प्रतिक असलेला आपला राष्ट्रध्वज, तिरंगा नाक्यानाक्यावर फडकतोय. याच पद्धतीने पाऊस कमी झाल्याने मुंबईतील सर्वात व्यस्त ७ रेल्वे स्थानकांवर पुन्हा एकदा राष्ट्रध्वज लावण्यात आलेत. मोठ्या डौलाने फडकणारे १०० फूट उंचीचे हे झेंडे पाहून प्रवाशांचा उर अभिमानाने भरून येतोय.

कायमस्वरूपी राष्ट्रध्वज

दरवर्षी रेल्वे स्थानकावर स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन कार्यक्रम होतात. मात्र, रेल्वे स्थानकावर कायमस्वरूपी राष्ट्रध्वज लावला जात नव्हता. परंतु गेल्या वर्षी मध्य रेल्वे नागपूर विभागातील आरपीएफचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांनी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना एक विनंती पत्र पाठवलं. यामध्ये रेल्वे स्थानकांवर राष्ट्रध्वज लावल्यास प्रवाशांमध्ये असलेली राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत होईल, त्यामुळे या मागणीचा विचार करावा, अशी विनंती करण्यात आली हाेती.

७५ रेल्वे स्थानक

रेल्वे बोर्ड अध्यक्षांनी ही कल्पना उचलून धरत डिसेंबर २०१८ पर्यंत देशभरात ए-१ प्रकारच्या स्थानकांवर तिरंगा उभारण्याचे आदेश देशभरातील सर्व झोन्सला दिले. त्यानुसार देशभरातील ए-१ श्रेणीतील ७५ रेल्वे स्थानकांवर हळुहळू राष्ट्रध्वज लावण्याच्या कामास सुरूवात झाली.

मुंबईतील ७ स्थानकं

रेल्वे बोर्डाच्या निर्णयानुसार मुंबईतील एकूण ७ रेल्वे स्थानकांवर कायमस्वरूपी राष्ट्रध्वज लावण्यात आले. यामध्ये पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, अंधेरी, बोरीवली या स्थानकांचा, तर मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांचा समावेश आहे.

यासंदर्भात माहिती देताना पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नितीन डेव्हीड म्हणाले की,

पावसामुळे राष्ट्रध्वज खराब होऊ नये किंवा फाटू नयेत म्हणून ते काढून ठेवण्यात आले होते. परंतु स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पश्चिम रेल्वेवरील महत्त्वांच्या स्थानकांवर हे १०० फूट झेंडे पुन्हा फडकवण्यात आले आहेत. 

तर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार जैन यांनी सांगितलं की, सीएसएमटी आणि एलटीटी या महत्त्वांच्या स्थानकांसोबतच सर्व डिव्हिजन आॅफिसच्या इमारतींवर देखील राष्ट्रध्वज फडकवण्यात येतात. हेही वाचा-

राजकीय नेत्यांसह 'क्रिकेटचा देव'ही धावला पूरग्रस्तांच्या मदतीला

गणेशोत्सव २०१९ : बाप्पाला 'कॅनव्हास'ची सजावटसंबंधित विषय