Advertisement

जागर महिलाशक्तीचा : कोणत्याही महिलेवरचा अन्याय 'ती'ला सहन होत नाही!


जागर महिलाशक्तीचा : कोणत्याही महिलेवरचा अन्याय 'ती'ला सहन होत नाही!
SHARES

ग्रामीण भागातून किंवा परराज्यातून मुंबईत येणारी प्रत्येक व्यक्ती भरभरून पैसे कमवण्याची स्वप्ने उराशी बाळगून असते. एकदा मुंबईत आलं, की रहायला घर, सुंदर कपडे, चांगला पगार असल्यास एखादी सुंदर गाडी देखील खरेदी करण्यासाठी धडपडत असतो. पण परराज्यातून येऊन गरीब गरजूंसाठी निरपेक्ष काम करणाऱ्या व्यक्ती क्वचितच मुंबईत पहायला मिळतात. अशा दुर्मिळ व्यक्तींपैकी एक आहेत उत्तराखंडमधील ऋषिकेश येथून 20 वर्षांपूर्वी लग्नानंतर मुंबईत स्थायिक झालेल्या समाजसेविका संध्या विक्रम पुंडीर!



अनेक महिलांना केले सुशिक्षित

संध्या जेव्हा मुंबईत आल्या, तेव्हापासूनच त्या चेंबूरच्या गणेशनगर वसाहतीत राहातात. ऋषिकेशसारख्या समृद्ध ठिकाणाहून मुंबईत आल्यानंतर छोट्याशा घरात पती विक्रम पुंडीर यांच्यासह त्या राहतात. गणेशनगर वसाहतीच्या परिसरात असलेल्या बेघर कम्पाऊंडमध्ये संध्या यांचे नेहमी येणे जाणे असते. गणेशनगर वसाहतीत अनेक महिला 20 वर्षांपूर्वी अशिक्षित होत्या. अनेक महिलांना व्यवहार करता यावा इतकेही ज्ञान नव्हते. बीएची पदवी घेतलेल्या संध्या या महिलांना नेहमी शिकवण्याचा प्रयत्न करत असत. संध्या यांच्या या प्रयत्नांना खरी साथ दिली ती त्यांचे पती विक्रम यांनी. पत्रकार असलेले विक्रम नेहमीच समाज सुधारावा यासाठी प्रयत्न करत होते.



धाडसी आणि ज्ञानी अशी पत्नी लाभल्यामुळे विक्रम यांना संध्या यांचे नेहमीच कौतुक वाटे. कालांतराने संध्या यांनी जवळच्या झोपडपट्टी तसेच बेघर कम्पाऊंडमधील महिला आणि मुलांना शिकवण्यासाठी मोफत क्लास घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू महिला साक्षर होत गेल्या. झोपडपट्टीमधील मुले देखील शाळेत जाऊ लागली. आता संध्या यांना देखील मुलगी झाली होती. त्यांनी कामाचा व्याप वाढवायचे ठरवले आणि या परिसरातील महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काम करण्याचा निर्णय घेतला.

प्रत्येक महिला सक्षम असावी. तिला स्वतःचे हक्क माहिती असावेत. समाजात प्रत्येक महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि तो तिला मिळायला हवा. समाजात वावरताना भेदभाव पाहिला, तर प्रचंड चीड येते. जिजाऊंची लेक आहे मी, कोणत्याही महिलेवर अन्याय झाला तर माझं रक्त खवळतं.

संध्या विक्रम पुंडीर, समाजसेविका

संध्या मोफत क्लासेससोबतच आरोग्य विषयक शिबिरांचे आयोजन देखील करत असत. गेली 16 वर्षे अविरतपणे त्या महिलांसाठी काम करत आहेत. महिलांसाठी त्या वारंवार आरोग्य विषयक शिबिरांचे आयोजन करतात. व्यक्तिमत्त्व विकासावर मार्गदर्शन केले जाते. त्याच बरोबर महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी बचत गटाविषयी मार्गदर्शन, लघुउद्योग कसे करावेत? त्यातील फायद्या-तोट्यासाठी पूरक माहितीसाठी संध्या शिबिरांचे आयोजन करतात. अनेक वर्ष समाजसेवा केल्यानंतर संध्या यांनी 'सक्षम महिला सामाजिक संस्था' या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचे काम संध्या करत आहेत.


समाजकार्यात त्यांची मुलगीही देते साथ

चेंबूरच्या गणेशनगर परिसरात, बेघर कम्पाऊंडमध्ये संध्या यांना कुणी ओळखत नसेल तरच नवल! सध्या यांच्या समाजसेवेच्या कार्यात त्यांची मुलगी स्वप्ना देखील हिरीरीने भाग घेते. आपला समाजसेवेचा डोलारा सांभाळत असलेल्या संध्या आज वयाच्या 37 व्या वर्षी आपले पती विक्रम यांची देखील कामात मदत करतात. आजही काम सांभाळत मुलांशी गप्पा मारत सामान्य जीवन जगतात. समाजात प्रत्येकाला सक्षमपणे जगण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचे महत्त्व संध्या यांनी चेंबूरमध्ये अनेक महिलांना त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून पटवून दिले आहे.

संस्थेच्या स्थापनेपूर्वी आणि आजपर्यंत मी महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत आहे आणि काम करत राहीन. जेव्हा मी या शहरात नवीन होते, तेव्हा वाटलं नव्हतं मी घराबाहेर पडून काही करू शकेन. पण मला या मायानगरीने नव्याने झेप घेण्याचे बळ दिले आणि मी आज अनेक महिलांचा खंबीरपणे आधारस्तंभ बनले.

संध्या पुंडीर, समाजसेविका



हेही वाचा - 

जागर महिलाशक्तीचा : गेली 20 वर्षे 'ती' चालवते स्कूल बस

जागर महिलाशक्तीचा : वडिलांच्या प्रेरणेतून घेतला स्वच्छतेचा ध्यास


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा