Advertisement

'घंटावाला पान मंदिरा'ला एकदा भेट द्याच

२००३ मध्ये गिनिज बुकात नोंद झाल्यानंतर २००५ आणि २००९ मध्ये लिम्का बुकमध्ये घंटावाला पान मंदिराची नोंद झालेली आहे.

'घंटावाला पान मंदिरा'ला एकदा भेट द्याच
SHARES

मंदिर आणि देवस्थानांमध्ये घंटा असते हे आपल्याला माहितच आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका जागेची ओळख करून देणार आहोत जिथे घंटा तर आहे पण ते मंदिर नाही. बोरिवलीतल्या चंदावरकर रोडवरील ओम शाम चौकातून गेलात तर तुम्हाला मोठ्यानं घंटा वाजल्याचा आवाज येईल. आजूबाजूला एखादे मंदिर असावं असा अनेकांचा समज होईल. पण हा घंटानाद पान मंदिरातून येतो. 'घंटावाला पान मंदिर' हे ते ठिकाण. १९७२ पासून याच ठिकाणी बसून अनेकांची तोंडं लाल आणि गोड करण्याचं काम विनोदकुमार तिवारी करत आहेत.



गिनिज बुकमध्ये नोंद

'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद असलेल्या तिवारीजींकडे १६९ देशांतील ४५० घंटा आहेत. या घंटा जमवण्यासाठी तब्बल वीस वर्षे त्यांना लागली. पूर्वी या घंटा दुकानात लटकत असत पण आता त्या शोकेसमध्ये विराजमान आहेत. २००३ मध्ये गिनिज बुकात नोंद झाल्यानंतर २००५ आणि २००९ मध्ये लिम्का बुकमध्ये घंटावाला पान मंदिराची नोंद झालेली आहे. विनोद तिवारींचा वाढदिवस १ मेला म्हणजेच महाराष्ट्र दिनी असतो. त्याच दिवशी काही वर्षांपूर्वी त्यांना बाळासाहेब ठाकरेंसोबत एनबीसी पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं.



पानाची खासियत

पान म्हटलं की तंबाखू आलीच. पण तिवारी यांच्याकडे विनातंबाखू आणि तंबाखूची पानं असे दोन प्रकार आहेत. पण याशिवाय इतर अनेक फ्लेवर्सचे पान त्यांच्याकडे आहेत. कथ्था हा पानातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. दिवसातून दो-तीन वेळा तो तयार केला जातो. विड्याचे साधारण ५० प्रकार आहेत. चॉकलेट, मघई, कोलकाता, बनारसी, रसमलाई, ड्रायफ्रुट, छप्पन भोग, आइस गोला हे पानांचे विविध प्रकार तुम्हाला इथं मिळतील. फळांमध्ये अननस, चिकू, पेरू, आंबा, मोहिनी, रातराणी, ऑरेंज, कैरी या फ्लेवर्सची पानंही आहेत.



आइस गोला या हटक्या पानाचा आस्वाद तुम्ही इथं घेऊ शकता. फ्रिजमध्ये थंडगार झालेलं पान काढून ते वरून मधोमध कापलं जातं आणि त्यामध्ये नावाप्रमाणेच आइस गोळा टाकला जातो. फ्लेवर्ड बर्फाचा गोळा साखरेच्या घोळापासून तयार केला जातो. त्यामुळे काही क्षणांमध्येच हे पान तोंडात वितळून जातं. दहा रुपयांपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या पानांचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता.



असं बनतं पान...

पान लावताना सर्वप्रथम कथ्था, चुना, स्टार, पानाची चटणी आणि स्वाद, सुगंधासाठी लक्षी चुरा टाकून या सर्व गोष्टी बोटानं एकत्रित केल्या जातात. मसाला मुरल्यानंतर पानावर बडीशेप, टुटीफ्रुटी, गुलकंद, चेरी, मसाला, केशर सल्ली, गुलाब पावडर, ड्रायफ्रुट्स, इलायची टाकून ते पान फोल्ड करून त्यावर चांदीचा वर्ख चढवला जातो. 



त्यानंतर पान फ्रिजमध्ये ठेवलं जातं. गोड पानाची ऑर्डर आल्यास ते बाहेर काढलं जातं आणि त्यावर फ्लेवर्सची गोड चटणी टाकली जाते. दोन-तीन तास फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर पान खाण्याची मजाच काही औरच. पण जर पानाला तंबाखू लावली असेल तर पान लगेच खाणं आवश्यक असतं.



हेही वाचा

पान खायची आवड आहे? मग तुम्ही इथे यायलाच हवं!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा