SHARE

केंद्र सरकारच्या 'नॅशनल मेडिकल कमिशन' (विधेयक) अर्थात 'राष्ट्रीय वैद्यकीय आयोग' विधेयकाला देशभरातील डाॅक्टरांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. हे विधेयक रद्द करण्याची 'इंडियन मेडिकल असोसिएशन'ची मागणी आहे. पण या मागणीकडं कानाडोळा करत हे विधेयक मंजूर करून घेण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. त्यामुळंच हे विधेयक संसदेत चर्चेसाठी मांडण्यात येण्याची शक्यता असल्यानं त्याला विरोध करण्यासाठी देशभरातील डाॅक्टरांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवारी, २८ जुलैला देशभरातील डाॅक्टर संपावर जाणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डाॅ. पार्थिव सांघवी यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. या संपात देशभरातील ३ लाखांहून अधिक डाॅक्टर सहभागी होतील असंही ते म्हणाले.


केंद्राचा निर्णय काय?

वैद्यकीय क्षेत्रात पारदर्शकता आणण्याबरोबरच वैद्यकीय क्षेत्रावर सरकारी नियंत्रण आणण्यासाठी 'मेडिकल काऊंसिल आॅफ इंडिया' बरखास्त करत राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. त्यासाठीच यासंबंधीचं विधेयक केंद्रानं आणलं आहे. मात्र या विधेयकाला डाॅक्टरांनी विरोध केला आहे.


विरोध कशाला?

'मेडिकल काऊंसिल आॅफ इंडिया' मध्ये ८० टक्के सदस्य हे निवडून येतात, तर २० टक्के सदस्यांची नियुक्ती केली जाते. इथं मात्र ९० टक्के सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून १० टक्के सदस्य निवडून देण्यात येणार आहे. त्यामुळं वैद्यकीय क्षेत्रात पारदर्शकता कशी येईल, असा सवाल 'इंडियन मेडिकल असोसिएशन'ने केला आहे. या विधेयकातील अनेक तरतुदींनाही डाॅक्टरांचा विरोध आहे.


६ महिन्यांपूर्वी संप

त्यामुळेच हे विधेयक हाणून पाडण्यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून डाॅक्टरांनी या विधेयकाविरोधात लढा सुरू केला आहे. त्याताच भाग म्हणून ६ महिन्यांपूर्वी डाॅक्टर संपावर गेले होते. या संपाची दखल घेत केंद्रानं डाॅक्टरांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. त्यानंतर डाॅक्टरांनी त्वरीत संप मागे घेतला.


तीव्र संपाचा इशारा

पण या ६ महिन्यात केंद्रानं विधेयक रद्द करण्याबाबत कोणतंही पाऊल उचललं नाही. उलट हे विधेयक चर्चेसाठी ठेवत विधेयक मंजूर करून घेण्याचा डाव आखला आहे. त्यामुळं डाॅक्टर आक्रमक झाले असून त्यांनी शनिवारी संपाची हाक दिली आहे. हा संप प्रातिनिधीक असेल. या संपानंतरही केंद्र सरकारने डाॅक्टरांचं न ऐकल्यास संप तीव्र करू असा इशाराही डाॅ. सांघवी यांनी दिला.

'नो टू एनएमसी', 'काॅल फाॅर अॅक्शन' म्हणत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून शनिवारी ३ लाखांहून अधिक डाॅक्टर संपावर जाणार आहेत. आपत्कालीन सेवा वगळता संपूर्ण वैद्यकीय सेवा शनिवारी ठप्प असणार आहेत. त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होण्याची शक्यता आहे.हेही वाचा-

दिल्लीत ठरलं! डॉक्टरांचा २ एप्रिलला देशव्यापी संप!

अशा डॉक्टरांना घरीच बसवा!संबंधित विषय
ताज्या बातम्या