Advertisement

सेंट जॉर्ज रुग्णालय स्वत:च्याच कर्मचाऱ्यावर उपचार करण्यात असमर्थ


सेंट जॉर्ज रुग्णालय स्वत:च्याच कर्मचाऱ्यावर उपचार करण्यात असमर्थ
SHARES

दररोज कित्येक रुग्णांवर उपचार करणाऱ्या सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णलयाला स्वत:च्याच कर्मचाऱ्यावर मात्र उपचार करता आलेले नाहीत. अपुऱ्या सुविधांमुळे आपल्याच आजारी कर्मचाऱ्याला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्याची नामुष्की सेंट जॉर्ज रुग्णालयावर ओढवली.

शुक्रवारी रात्री 12 च्या सुमारास सेंट जॉर्ज रुग्णालयातील औषध विभागात काम करणाऱ्या संतोष कलमकर यांच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज होती. पण, उपचारांसाठी लागणारी सुपर स्पेशालिटी उपकरणे या रुग्णालयात नसल्याकारणाने कलमकर यांना सर जे.जे. रुग्णालयामध्ये हलवण्यात आले.


नेमकं काय घडलं?

20 जुलैला कामावर जाताना अचानक कलमकर यांना दम्याचा त्रास जाणवू लागला. पण, नेहमीचाच ताण आहे असं समजून त्यांनी त्यांच्या प्रकृतीकडे त्यावेळी दुर्लक्ष केलं. पण, रात्री घरी गेल्यावर प्रकृती खूपच खालावली. त्यामुळे, सायंकाळी कलमकर यांच्या पत्नी समृद्धी यांनी संतोष यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरू असताना अचानक कलमकर यांची शुद्ध हरपली. नेमकं काय झालं, हे डॉक्टरांना कळतच नव्हतं. अशा परिस्थितीत उच्च रक्तदाबाची चाचणी करण्यात आली. पण, यातूनही काही स्पष्ट होत नव्हतं. मात्र डॉक्टरांना ईसीजी केल्यावर माहीत झालं की त्यांच्या ह्रद्याच्या एका बाजूला रक्ताची गाठ झाली आहे. ज्यासाठी 2डी इको किंवा कार्डिओलॉजिस्टची तत्काळ गरज होती. पण, हा विभागच या रुग्णालयात नसल्याने उपचार करणार तरी कसे? याविचाराने डॉक्टरांनी प्रसंगावधान दाखवत रात्री 12 वाजता कलमकर यांना जे. जे. रुग्णालयात दाखल केले.


कलमकर यांना योग्य ते उपचार देण्यासाठी या रुग्णालयात कार्डिओलॉजी विभाग किंवा 2 डी इको हा कक्षच नाहीये. म्हणून आम्ही त्यांना तत्काळ शुक्रवारी रात्री 12 वाजताच जे.जे. रुग्णालयात दाखल केलं. सेंट जॉर्ज ते जे.जे. रुग्णालय हे अंतर एक किलोमीटर एवढं आहे.

डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय

तर, सेंट जॉर्ज या रुग्णालयात काही सुपर स्पेशालिटी सुविधा देण्यात याव्यात, याविषयी सर जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी बोलणार असून तसा प्रस्तावही आम्ही त्यांना देणार असल्याचं डॉ. गायकवाड यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं. जर, कार्डिओलॉजी विभाग सुरू केला, तर त्यासाठी कॅथलॅब आणि तेवढ्याच कार्डिओलॉजिस्टची व्यवस्था करावी लागेल, असंही त्यांनी या वेळी स्पष्ट केलं.

काही दिवसांपूर्वीच सेंट जॉर्ज रुग्णालयातील औषध विभागातीलच विश्वनाथ मोरे (38) या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यावेळी घटनास्थळी वरिष्ठ डॉक्टर्स उपलब्ध नसल्याकारणाने त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेला 15 दिवसही उलटले नसताना आता संतोष कलमकर यांची ही दुसरी घटना आहे.



हेही वाचा

जे. जे. रुग्णालयात पहिल्यांदाच ब्रेनडेड रुग्णाचे अवयवदान


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा