Advertisement

'त्याच' इमारतीतलं दुसरं घर म्हाडापेक्षा ७५ लाखांनी स्वस्त


'त्याच' इमारतीतलं दुसरं घर म्हाडापेक्षा ७५ लाखांनी स्वस्त
SHARES

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 10 नोव्हेंबरला फुटणाऱ्या लाॅटरीतील लोअर परळमधील घराची किंमत सुमारे 2 कोटी असल्याच्या 'मुंबई लाइव्ह'च्या वृत्ताने चांगलीच खळबळ उडवली आहे. या किंमती एेकून सर्वांच्या भुवया उंचावल्या असून म्हाडावर जोरदार टीका होत आहे. त्यातच आता लोअर परळमधील सुमारे 2 कोटीच्या घरासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने प्रति चौ. फूट 43 हजार रुपये असा दर आकारला असून हा दर खासगी विकासकांच्या प्रकल्पातील दरांपेक्षा महाग असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

819 घरांच्या सोडतीतील 36 घरे ही लोअर परळ येथील 'लोढा वर्ल्ड वन'ला लागून असलेल्या 'सिटी व्ह्यू' इमारतीतील आहेत. ही घरे मुंबई मंडळाला पुनर्विकासाच्या माध्यमातून मिळाली आहेत. 36 पैकी 2 घरे 472 चौ. फुटांची असून या घरांची किंमत रू. 1 कोटी 95 लाख 67 हजार 103  अशी आहे. तर 330 चौ.फुटाच्या 34  घरांच्या किंमती 1 कोटी 42 लाख 96 हजार 517 रुपये अशी आहे.

लोअर परळ हे सध्या निवासी-अनिवासी मालमत्तेसाठी प्राईम लोकेशन मानले जाते. त्यामुळे येथील जागेचे दर नेहमीच चढे असतात. त्यानुसार सध्या या परिसरातील खासगी विकासकाच्या प्रकल्पातील घरांचे दर रु. 35 हजार  प्रति चौ. फूट  ते रू. 38 हजार प्रति चौ. फूट असे असल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. असे असताना म्हाडाच्या घरांचे दर खासगी विकसकांच्या घरांना टक्कर देत पुढे गेले आहे. कारण म्हाडाच्या 'सिटी व्ह्यू' इमारतीतील दोन घरांचे दर रु. प्रति चौ. फूट 43 हजार रुपये असे आहेत.


फुकटात मिळाले घर

लोअर परळमधील ही घरे म्हाडाला पुनर्विकासाद्वारे फुकटात मिळाली आहेत. असे असताना या घरांच्या किंमती 1 कोटी 95 लाख ते 1 कोटी 42 लाख अशा ठेवण्यात आल्या आहेत. म्हाडाच्या किंमतीच्या धोरणानुसार जमिनीची किंमत, बांधकाम शुल्क, इतर शुल्क आणि उत्पन्न गटानुसार नफा या सर्व बाबींचा विचार करत किंमती निश्चित केल्या जातात. त्यानुसार या घरांचा विचार करता येथे जमिनीची किंमत आणि बांधकाम शुल्क याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे ही घरे इतकी महाग कशी असा प्रश्न आता विचारला जात आहे.

याच इमारतीतील घर 1 कोटी 20 लाखांत

'सिटी व्ह्यू'मधील म्हाडाच्या 472 चौ. फुटाच्या घराची किंमत 1 कोटी 95 लाख अशी असताना याच इमारतीत म्हाडाच्या घरापेक्षा मोठे घर 540 चौ. फुटाचे घर 'मकान डाॅट काॅम' या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 20 लाखांत विक्रीसाठी ठेवले आहे. 'मकान डाॅट काॅम' या वेबसाईटवर भेट देत कुणालाही याची खात्री करून घेता येईल. 'मकान डाॅट काॅम'ची ही किंमत म्हाडाचे घरे खासगी बिल्डरांच्या घरापेक्षा महाग आहेत हे सिद्ध करण्यास पुरेशी असल्याचे म्हटले जात आहे.


छे...छे...हे तर स्वस्त - सुभाष लाखे

मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही घरे महाग नसून खासगी बिल्डरांच्या घरांच्य तुलनेत चक्क 30 टक्क्यांनी स्वस्त असल्याचा दावा 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला आहे. तर अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील घरे कशी स्वस्त ठेवता येईल याचा विचार करत या घरांचा सर्व भार लोअर परळमधील घरांवर टाकण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले हे. त्याचवेळी या घरांना चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


लाॅटरीतून गरीब हद्दपार

अत्यल्प आणि अल्प गटाला परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हेच म्हाडाचे मुख्य उद्दीष्टय. त्यामुळेच म्हाडाच्या प्रकल्पात अंदाजे 60 टक्के घरे ही अत्यल्प आणि अल्प गटासाठीच बांधली जातात. त्याअनुषंगाने साहजिकच म्हाडाच्या  लाॅटरीतही याच गटासाठी सर्वाधिक घरे असतात. यंदा मात्र म्हाडाने आपल्या उद्दीष्टाला हरताळ फासला आहे. कारण 819 घरांच्या लाॅटरीत अत्यल्प गटासाठी केवळ 8 घरे आहेत. तर अल्प गटासाठी 192 घरे आहेत. म्हणजेच म्हाडाचा मुख्य ग्राहक असलेल्या गटासाठी 819 पैकी केवळ 200 घरे आहेत.

त्याचवेळी उच्च गटासाठी मात्र सर्वाधिक 338 घरे असून मध्यम गटासाठी 281 घरांचा समावेश लाॅटरीत करण्यात आला आहे. त्यामुळे ही लाॅटरी गरीबांसाठी नव्हे तर श्रीमंतासाठी असल्याची टीकाही म्हाडावर होत आहे.


किंमती कमी करा

दोन कोटीच्या घरांनी सर्वसामान्यांना भोवळ आणली आहेच. पण त्याचवेळी म्हाडाच्या सर्वच घरांच्या किंमती या वाढल्याचे चित्र आहे. 15 लाख ते 1 कोटी 95 लाख दरम्यान म्हाडाच्या घरांची विक्री होणार आहे. त्यामुळे घरांच्या किंमती कमी कराव्यात, अशी मागणीही आता सर्व स्तरातून होत आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा