Advertisement

मेट्रो-४ साठी सल्लागाराची नियुक्ती


मेट्रो-४ साठी सल्लागाराची नियुक्ती
SHARES

मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण केल्यानंतर आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एमएमआरडीए) ठाणेकरांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठीच वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो-४ प्रकल्प शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्याच्या प्रक्रियेला एमएमआरडीएकडून वेग देण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी एमएमआरडीए प्राधिकरणाच्या बैठकीत मेट्रो-४ साठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

मेट्रो-४च्या माध्यमातून मुंबई आणि ठाणे मेट्रोने जोडले जाणार असून या दोन शहरांमधील अंतर कमी होणार आहे. त्यामुळे मुंबईकर आणि ठाणेकर हे दोघेही मेट्रो-४ मार्गाची प्रतिक्षा करत आहेत. असे असताना आता एमएमआरडीएकडून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले जात आहे. त्याचाच भाग म्हणून सोमवारी मेट्रो-४ करता मे. डी. बी. इंजिनियरींग अॅण्ड जीएमबीएच सहित हिल इंटरनॅशनल इंक आणि ल्युइस बर्जर कन्सल्टिंग कॉ. लिमिटेड या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

यासंबंधीच्या प्रस्तावाला प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने हिरवा कंदील दिला आहे. आता ही सल्लागार कंपनी मेट्रो-४ चे संकल्पचित्र तयार करणे, बांधकामाचे व्यवस्थापन करणे, बांधकामावर देखरेख करणे, एकत्रित प्रणाली राबवणे, चाचण्या घेणे यासह प्रकल्पातील अनेक कामे करणार आहे. त्यामुळे मेट्रो-४ मार्गााच्या दृष्टीने ही नियुक्ती अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

सोमवारच्या बैठकीत बीकेसी आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महत्त्वाकांक्षी अशा अनेक रस्ते प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार वांद्रे-कुर्ला संकुल आणि सांताक्रुझ-चेंबुर जंक्शन येथील वाहतूक कोंडी दूर करण्याकरता भारत डायमंड बोर्स, बीकेसी ते वाकोला जंक्शन या २.२ किमी लांबीच्या उन्नत रस्ते प्रकल्पासाठी मे. नीरज सिमेंट स्ट्रक्चरल लि. कंपनीच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे हा प्रकल्पही आता पुढे नेणे एमएमआरडीएला सोपे होणार आहे. 

३५ किमी लांबीचा मार्वे-भाईंदर-घोडबंदर रोड प्रकल्प मार्गी लावण्यासाठी या प्रकल्पाचा विस्तृत आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी मे. स्तुप दाराशाॅ या कंपनीची नियुक्ती करण्यालाही सोमवारी प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने हिरवा कंदील दाखवला आहे. त्याचवेळी ३३.८ किमी लांबीच्या ठाणे-बेलापुर ते राष्ट्रीय महामार्ग-४ या रस्ते प्रकल्पासही कार्यकारी समितीने मंजुरी दिली आहे. या रस्त्याच्या बांधणीकरता मे. एसएससी या कंपनीची नियुक्ती केली आहे. तर मे. पीइएमएस इंजिनिअरिंग कन्सल्टंट प्रा. लि. आणि मे. आकार अभिन कन्सल्टंट यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यासही समितीने मंजुरी दिली आहे. या रस्त्यामुळे एमएमआरमधील वाहतुक कोंडी दूर होणार असल्याचा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे.



हेही वाचा

मेट्रो- ३ च्या कामामुळे चर्चगेटमधील रहिवाशांना केमिकलयुक्त पाणी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा