Advertisement

धारावीतील टाटा पॉवरची जागा होणार मोकळी, झोपड्यांच्या जागी गार्डनचा प्रस्ताव!


धारावीतील टाटा पॉवरची जागा होणार मोकळी, झोपड्यांच्या जागी गार्डनचा प्रस्ताव!
SHARES

सायन रेल्वे स्थानकाला लागून टाटा पॉवरच्या मालकीची जमीन असून तेथे टाटा पॉवरच्या हाय टेन्शन वायर्स आहेत. त्यामुळे ही जागा धोक्याची असतानाही या जागेवर मोठ्या प्रमाणावर झोपड्या वसल्या आहेत. पण आता मात्र लवकरच या झोपड्या येथून गायब होणार असून या जागेवर एक छानसं गार्डन उभं राहणार आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाखाली टाटा पॉवरच्या या जमिनीचा भाग सेक्टर-5 मध्ये येतो. तर सेक्टर-5 चा पुनर्विकास म्हाडा करत आहे. त्यानुसार सेक्टर-5 च्या पुनर्विकास आराखड्यात या जागेचा समावेश होता खरा. पण ही जागा टाटा पॉवरच्या मालकीची असल्याने, तसेच ही जागा धोक्याची असल्याने, तिथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. या सर्व अडचणींमुळे ही जागा पुनर्विकासात घेणे म्हाडाच्या मुंबई मंडळाला अवघड झाले होते.

दरम्यान, ही जागा पुनर्विकासात समाविष्ट करत जागेचा कायापालट करण्यासाठी  टाटा पॉवरने जागा म्हाडाच्या ताब्यात द्यावी, यासाठी मुंबई मंडळाकडून जोरदार पाठपुरावा सुरू होता. अखेर मुंबई मंडळाला यात यश मिळाले आहे. टाटा पॉवरने ही जागा नुकतीच मंडळाकडे हस्तांतरीत केल्याची माहिती मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

या जागेवर अंदाजे 800 झोपड्या असून या झोपड्यांचे पुनर्वसन करत त्यावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम मुंबई मंडळ करणार नाही, या अटीवर ही जागा टाटा पॉवरने मुंबई मंडळाला दिली आहे. तर मुंबई मंडळाने ही मागणी मान्य करत या जागेचा वापर गार्डन म्हणून करण्याचा निर्णय घेतल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता लवकरच या जागेवरील झोपड्यांना टाटा करत तिथे मोठे, छानसे गार्डन तयार करण्यात येणार आहे.

सेक्टर-5 च्या पुनर्विकासांतर्गत या जागेवरील पात्र झोपड्यांचे पुनर्वसन करत तिथे गार्डन बांधण्यासंबंधीचा आराखडा धारावी पुनर्विकास प्रकल्पा (डीआरपी)कडे मंजुरीसाठी नुकताच पाठवण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. या आराखड्याला मंजुरी मिळाल्यास गार्डन बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.



हेही वाचा

धारावीकरांसाठी सेक्टर-५ मध्ये आणखी २ टाॅवर

अरेरे, म्हाडाच्या १६ घरांना शून्य प्रतिसाद


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा