आरेमध्ये नक्की किती झाडांची कत्तल?

 Aarey Colony
आरेमध्ये नक्की किती झाडांची कत्तल?

मेट्रो-3 प्रकल्पांतर्गत आरेतील झाडांच्या कत्तलीवरून वनशक्ति आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन(एमएमआरसी)मध्ये पुन्हा जुंपली आहे. सोमवारी राष्ट्रीय हरित लवादात झालेल्या सुनावणीदरम्यान एमएमआरसीने आरेतील तीन हेक्टर जागेवरील एकाही झाडाला हात लावला नसल्याचा दावा केला. या दाव्यामुळे याचिकाकर्ते आता चांगलेच खवळले असून एमएमआरसीच्या खोटारडेपणावर वनशक्तिकडून सडकून टीका होत आहे. 

दरम्यान, एमएमआरसीने अंदाजे दीडशे झाडांची बेकायदा कत्तल केली असून बेकायदा कामही केल्याचा दावा सोमवारी हरित लवादात केला असून यासंबंधीचे पुरावेही असल्याचे लवादासमोर सांगितले आहे. त्यानुसार लवादाने पुढील सुनावणीत हे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आरे वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

आरेची जागा मेट्रो-3 च्या कामासाठी देण्यास विरोध करत वनशक्तिने राष्ट्रीय हरित लवादात धाव घेतली आहे. त्यानुसार लवादाने आरेत कोणतेही काम करण्यास स्थगिती दिली आहे. असे असताना गेल्या चार-महिन्यांपासून एमएमआरसीकडून आरेत बेकायदा काम करण्याचा आणि कामासाठी झाडांची बेकायदा कत्तल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा वनशक्तिचा आरोप आहे. साधारणत: तीन महिन्यांपूर्वी वनशक्तिचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंबंधीची लेखी तक्रारही केली आहे.

एमएमआरसीची बेकायदा कामे जनतेच्या लक्षात येऊ नयेत, यासाठी मेट्रो-3 चे काम करण्यासाठी एमएमआरसीने या 3 हेक्टरच्या जागेत चारही बाजूंनी पत्रे लावले असल्याचाही स्टॅलिन यांचा आरोप आहे. दरम्यान, वनशक्तिच्या लक्षात ही बाब आल्यानंतर वनशक्तिने आरेतील या जागेच्या 2000, 2016, आणि 2017 च्या आरेतील सॅटेलाईट इमेज घेतल्या आहेत. या सॅटेलाईट इमेजनुसार झाडांची कत्तल झाल्याचे सिद्ध होत असल्याचे सांगत स्टॅलिन यांनी हे पुरावे लवादासमोर ठेवत एमएमआरडीएचा खोटारडेपण उघड करु असा दावा केला आहे. दरम्यान, लवादाने पुढील सुनावणी 2 ऑगस्ट रोजी ठेवली असून यावेळी वनशक्तिला झाडांच्या कत्तलीसंबंधीचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments