Advertisement

हातानं नाही तर पायानं चित्र साकारणारे चित्रकार

बंदेनवाझ नदाफ आणि नदीम शेख यांना जन्मजात व्यंगत्व आलं. पण आपल्या व्यंगत्वावर मात करत दोघांनी यश संपादीत केलं. हातानं अपंगत्व आलं, पण पायानं त्यांना जगण्याची नवी आशा दिली.

हातानं नाही तर पायानं चित्र साकारणारे चित्रकार
SHARES

"लहान असताना मला मुलं चिडवायची की तुझे हात कुठे आहेत? तेव्हा मी त्यांना हसत हसत उत्तर द्यायचो की, मी माझे हात घरी ठेऊन आलोय. मला आवडत नाही, त्यांना सोबत घ्यायला." नदीम शेख आणि बंदेनवाज नदाफ या दोघांचा हाच सकारात्मक दृष्टीकोन त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतो


पायगुणी चित्रकार

नदीम शेख आणि बंदेनवाज नदाफ हे दोन चित्रकार मुंबईतल्या इंडियन माऊथ अॅण्ड फूट पेंटर्स असोसिएशनसोबत काम करत आहेत. आपल्या कलेच्या माध्यमातून दरमहा ३० ते ३५ हजार रुपये ते कमवतात. यशस्वी चित्रकारांमध्ये त्यांची नावाची गणना होते. पण यशाची ही पायरी गाठण्यासाठी त्यांना आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे हा प्रवास त्यांच्यासाठी नक्कीच सोपा नव्हता.


अपंगत्वावर पायानं केली मात

बंदेनवाझ नदाफ आणि नदीम शेख यांना जन्मजात व्यंगत्व आलं होतं. बंदेनवाझ हे मुळचे सोलापूरचे असून तीन वर्षांचे असताना ते मुंबईत आले. स्वप्ननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत जगण त्यांच्यासाठी कठिण होतं. मुंबईत आल्यानंतर काही वर्षांनी आईवडील त्यांना वेगवेगळ्या शाळांमध्ये घेऊन जायचे. पण सगळ्याच शाळांनी त्यांना नकार दिला. बंदेवनवाझ यांना हात नाहीत मग ते कसं शिकणार, हा प्रश्न प्रत्येक शाळेत विचारला जायचा.

याशिवाय इतर मुलांवर याचा परिणाम होऊन ते अभ्यास करणार नाही, अशी कारणं देऊन शाळांमध्ये बंदेनवाजला प्रवेश नाकारला जायचा. वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत बंदेनवाज घरीच होते. अखेर दिव्यांगांसाठीच्या विशेष शाळेत मला प्रवेश मिळाला आणि त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. सातवीपर्यंत बंदेनवाझ या शाळेत शिकले. त्यांना या शाळेत स्विमिंग, चित्रकला आदींची गोडी लागली. चित्रकलेच्या शिक्षिका वनिता जाधव यांच्यामुळे बंदेनवाझ यांना चित्रकलेतले बारकावे कळले. पुढे जाऊन त्यांनी चित्रकलेतच शिक्षण घेतलं


जन्मजात दिव्यांग

नदीम शेख हे मुळचे मुंबईत राहणारे. बंदेनवाज प्रमाणे नदीम शेख देखील जन्मजात दिव्यांग होते. पण त्यांच्या कुटुंबियांनी कधी त्याची जाणीव करून दिली नाही. दिव्यांगांसाठी असणाऱ्या शाळेत त्यांनी देखील शिक्षण घेतलं. तिथूनच नदीम यांना चित्रकलेची आवड निर्माण झालीपुढे दोघंही इंडियन माऊथ अॅण्ड फूट पेंटर्स असोसिएशनच्या संपर्कात आली. निवड प्रक्रिया पार करत दोघांची निवड झाली. आज दोघंही इंडियन माऊथ अॅण्ड फूट पेंटर्स असोसिएशनसाठी काम करतातIMFPA विषयी थोडक्यात

इंडियन माऊथ अॅण्ड फूट पेंटर्स असोसिएशन (IMFPA) ही संस्था जागतिक संस्थेची भारतातील शाखा आहे. स्वित्झर्लंडमध्ये १९५६ मध्ये या संस्थेची स्थापना झाली. एरिक स्टाइगमन या जर्मन माणसाला पोलियो होता. त्यांनी आपल्या तोंडानं आणि पायानं चित्रं काढायला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांच्या चित्रांना चांगलीच मागणी वाढू लागली. त्यातूनच त्यांनी त्यांच्यासारख्याच इतर अपंगांसाठीही या संस्थेची सुरुवात केली

युरोपभरातल्या १८ कलाकारांसह स्थापन झालेल्या या संस्थेत सध्या जगभरातील ८०० हून अधिक कलाकार आहेत. या संस्थेची स्थापना भारतात १९८० मध्ये झाली. सध्या भारतभरात तोंडानं किंवा पायानं चित्र काढणारे २४ कलाकार आहेत. यात मुंबईतून २ कलाकार म्हणजेच बंदेनवाज आणि नदीम यांचा समावेश आहे


कलाकारांना पाठबळ

कलाकारांचा संस्थेत प्रवेश झाला की, लगेचच त्यांना वेतन मिळायला सुरुवात होते. कलाकारांचा दर्जा लक्षात घेऊन हे वेतन १० ते ३० हजार रुपये यादरम्यान दिलं जातं. पहिल्या महिन्यापासूनच त्यांना वेतन दिलं जातं. या कलाकारांना मग त्यांची चित्रं संस्थेला द्यावी लागतात. या चित्रांची ग्रिटिंग कार्ड्स किंवा इतर गोष्टी बनवून विकली जातात. त्यातून त्यांना पैसे देणं शक्य होतं.हेही वाचा -

कलाकारांच्या स्वप्नांना पाठबळ देणारा अवलिया
संबंधित विषय
Advertisement