Advertisement

कलाकारांच्या स्वप्नांना पाठबळ देणारा अवलिया

अनेक बाल कलाकारांच्या स्वप्नांना बाबुराव यांनी पाठबळ दिलं आहे आणि अजूनही देत आहेत. आतापर्यंत बाराशेहून अधिक मुलांना चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात त्यांनी संधी मिळवून दिली आहे.

SHARES

अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची अनेकांची इच्छा असते. पण मोठ्या-मोठ्या अॅक्टिंग क्लासची फी सर्वांनाच परवडत नाही. हाच विचार करून धारावीतील बाबुराव लाड यांनी गरजूंना कमी पैशात तर काहींना मोफत शिकवण्यास सुरुवात केली.

आतापर्यंत अनेक बाल कलाकारांच्या स्वप्नांना बाबुराव यांनी पाठबळ दिलं आहे आणि अजूनही देत आहेत. वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी अभिनय क्लास सुरू केला. क्लास सुरू करून आता ३०-४० वर्ष झाली. आजतागायत क्लास सुरू आहे. क्लास सुरू करण्यामागे त्यांची प्रचंड मेहनत आहे. सुरुवातीला त्यांनी पेंटर म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली.


अभिनयाचे मोफत धडे

बाबुराव यांच्या क्लासचं नाव फाईव्ह स्टार असून आज त्यांच्या क्लासमध्ये ४० ते ५० विद्यार्थी अभिनय आणि डान्स शिकण्यासाठी येतात. यातील काही विद्यार्थांना बाबुराव विनाशुल्क शिकवतात. ज्यांच्यात शिकण्याची जिद्द आहे, पण हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना मोठ-मोठ्या क्लासेसमध्ये जाऊन अभिनय आणि डान्स शिकणं शक्य नाही अशा गरजू विद्यार्थ्यांना बाबुराव विनाशुल्क शिकवतात. तर ज्यांना शक्य आहे त्यांच्याकडूनच ते पैसे घेतात.


चित्रपटात संधी

चेहऱ्यावरील हावभाव, डायलॉग्स बोलण्याची कला, डान्स या अभिनयाची निगडीत सर्वकाही बाबुराव क्लासमध्ये शिकवतात. आतापर्यंत १५ हजारांहून अधिक मुला-मुलींनी त्यांच्याकडून अभिनयाचे धडे गिरवले आहेत. तर १२०० मुलांना त्यांनी चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात काम मिळवून दिले आहे. काला, बियॉन्ड द क्लाऊड, लैला यासारख्या चित्रपटात अनेक मुलांनी कामं केली आहेत. त्यांच्या इथं अभिनय शिकायला येणारी एक मुलगी लैला या वेबसिरीजमध्ये काम करत आहे. शिवाय माधुरी दीक्षितसोबत देखील ती लवकरच झळकणार आहे.


यशामागे प्रचंड मेहनत

बाबुराव यांच्या यशामागे त्यांची प्रचंड मेहनत आहेच. पण यासोबतच त्यांच्या कुटुंबियांनी देखील त्यांना पाठिंबा दिला. ते आजही सांगतात, माझ्या हातात पैसे नव्हते तेव्हा बायकोचा लक्ष्मी हार विकून मी क्लास सुरू करण्याचं स्वप्न पूर्ण केलं. क्लास सुरू करण्यासाठी मिळतील ती पेंटिंगची कामं ते करायचे. आजही ते पेंटिंगची कामं करतात. अभिनय शिकायला येणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना मोफत शिकवत असल्यानं बाकी खर्चासाठी त्यांना पेंटिंगचा सहारा घ्यावाच लागतो.  





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा