Advertisement

या वीक-एंडला करा चिकू महोत्सवात धमाल!


या वीक-एंडला करा चिकू महोत्सवात धमाल!
SHARES

आंबा महोत्सव, काजू महोत्सव, हुरडा पार्टी असे अनेक महोत्सव आत्तापर्यंत आपण पाहिले असतील. पण तुम्ही कधी चिकू महोत्सव भरवला जातो हे ऐकलं आहे का? नाही? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. त्यात जर तुम्ही चिकूचे चाहते असाल, तर तुमच्यासाठी ही पर्वणीच आहे. चिकूचं आगार समजल्या जाणाऱ्या डहाणूत चिकू महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. २७ आणि २८ जानेवारीला डहाणूमधल्या बोर्डी इथं चिकू महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.


चिकू महोत्सवाचं वैशिष्ट्य

दोन दिवस भरवण्यात येणाऱ्या चिकू फेस्टिव्हलला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. मुंबई, पुणे, गुजरात अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून अनेक पर्यटक या महोत्सवाला भेट देतात. महोत्सवादरम्यान हजारो पर्यटक चिकूचा आस्वाद तर घेतातच. याशिवाय चिकूच्या नवनवीन रेसिपीही समजून घेण्याची संधी मिळते. डहाणू आणि बोर्डी इथले ग्रामस्थ एकत्र येऊन या महोत्सवात रंगत आणतात.


आदिवासी कला-संस्कृतीचा अनुभव

चिकूच्या आस्वादासह, पारंपरिक आदिवासी कला आणि कारागिरी, कुटिरोद्योग यांची ५० हून अधिक प्रदर्शन दालनं असं भरपूर काही या महोत्सवात पाहायला मिळणार आहे. याशिवाय पारंपरिक नृत्यगाणी असे अनेक कार्यक्रम तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत. चिकू या फळाचा गोडवा सर्वदूर पसरावा आणि त्याला मोठी बाजारपेठ मिळावी, या उद्देशानं दरवर्षी चिकू महोत्सवाचं आयोजन केलं जातं.



काय करता येईल चिकू महोत्सवात?

१) चिकूची लागवड करण्याचे तंत्र शिकण्याची संधी

२) चिकूच्या झाडांची काळजी कशी घ्याल? चिकू झाडावरून कधी काढाल? यासंदर्भात माहिती

३) चिकू मॅरेथॉनमध्ये सहभाग

४) वारली गावाला भेट देऊन वारली चित्रकला आणि मातीची भांडी बनवायला शिका

५) चिकू वाईनरीला भेट द्या

६) चिकू सफारी करण्याची संधी



डहाणूला कसे पोहोचायचे?

महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर डहाणू हे छोटेसे गाव आहे. मुंबईपासून १८३ कि. मी. अंतरावर डहाणू आहे. रेल्वे आणि रस्ते मार्गे डहाणूला पोहोचणं सोपं आहे. जर तुम्ही डहाणूला कारनं जात असाल, तर तीन तासात तुम्ही पोहोचू शकाल.


चिकू महोत्सव म्हणजे निसर्ग आणि संस्कृतीचा समन्वय आहे. या महोत्सवाला तुम्ही संपूर्ण कुटुंबियांसोबत देखील भेट देऊ शकता. या वीक-एंडला तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा परिवारासोबत चिकू महोत्सवाला हजेरी लावून मधुर अशा चिकूचा किंवा चिकूपासून बनलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा