Advertisement

'त्या' दिवसांत सुट्टीची खरंच गरज आहे का?


'त्या' दिवसांत सुट्टीची खरंच गरज आहे का?
SHARES

''Periods च्या फर्स्ट डे ला सुट्टी? व्वाह, सही ना?''

"काय? पहिल्या दिवशी सुट्टी हे काय नवीन आता?" 

"अगं पण पहिल्या दिवशी मला त्रास होतच नाही. मग त्या दिवशी सुट्टी घेऊन काय करू?"

 हे  आणि अशा पद्धतीचे संवाद घराघरात झडले असतीलच. घरात जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या महिला आपसात अशा विषयांवर चर्चा करणारच.  

'कल्चर मशीन' या खाजगी कंपनीने त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी रजा देण्याचा निर्णय घेतला आणि कंपनीतल्या संबंधितांनी घेतलेला हा एक चर्चेचं गुऱ्हाळ सुरू करायला कारणीभूत ठरला. लगेचच शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे एका पत्राद्वारे मासिक पाळीची सुट्टी प्रत्येक कार्यालयात लागू करावी, अशी मागणी केली.


''माझ्या मतदारसंघात म्हणजे दहिसरमध्ये एका मिठाईच्या दुकानात बऱ्याच महिला काम करतात. दुकानदाराने मला सांगितलं की, त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या महिलांना महिन्यातून 1-2 दिवस सुट्टी दिली जाते. मी त्याला कारण विचारल्यावर ते म्हणाले, 'त्या' दिवसांत महिलांना प्रचंड त्रास होतो. त्यांचं डोकं दुखतं. कामावर लक्ष लागत नाही. त्या बोलल्या नाहीत तरी आम्हाला त्यांची समस्या लक्षात येते आणि आम्ही त्यांना त्या दिवसापुरती सुट्टी देतो. जेणेकरुन दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या कामावर रुजू होतील तेव्हा शरीर, मनानं प्रसन्न असतील. दरम्यान, मी कुठेतरी ऐकलं की एका कंपनीने महिलांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी रजा देण्याचा निर्णय घेतला आहे. मला त्यांचा निर्णय आवडला. आम्हीही विचार केला की आम्ही हा निर्णय का अमलात आणू नये?

शीतल म्हात्रे, नगरसेविका, शिवसेना


अशा रजेची खरंच गरज आहे का?

शीतल म्हात्रे  यांच्याशी बोलल्यानंतर माझ्या मनात प्रश्न उपस्थित झाला की, खरंच मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना रजा दिली जावी का? मग ठरवलं, काही महिलांशी या विषयावर मोकळेणाने बोलायचं आणि त्यांची मतं जाणून घ्यायची. 


महिलांना पाळीच्या दिवसात पाहिला दिवस सुट्टी हे ऐकून बरं वाटलं. पण काही महिलांना पाळीचा त्रास हा पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जास्त होतो. मग तेव्हा काय करायचं ? तेव्हा ही सुट्टी मिळणार का?

- अंजली मगर



मला नाही वाटत त्या दिवसात सुट्टी मिळावी. शाळेत असताना मी स्वतः पाळीच्या दिवसांत बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. काही मुलींना या दिवसांत त्रास होतो आणि त्या मुली त्रासाच्या दिवसात ऑफीसला जाण्यापेक्षा घरीच आराम करतात. थोडक्यात, गरज असेल तेव्हा त्या सुट्टी घेतात. मग सरसकट सर्व महिलाना सुट्टी दिली जावी, हा अट्टाहास का?

- मनाली परब


मला मासिक पाळीत त्रास होत नाही. पण जर मला सुट्टी मिळणार असेल तर का नाही आवडणार? त्यामुळे किमान सुट्टीसाठी मी या निर्णयाचं समर्थन नक्कीच करेन.

- ऋतुजा साठे


कशाला हवी सुट्टी? महिलांना या दिवसांत अाराम मिळावा म्हणून जर ही सुट्टी असेल तर मला घरापेक्षा ऑफीसमध्येच जास्त आराम मिळतो. पाळीच्या पहिल्या दिवशी मी घरी बसले तर जास्त काम करावं लागेल. त्यापेक्षा मला ऑफीसला येणं परवडेल.

- हेमलता बोराटे



सोयीप्रमाणे निकष बदलायला नकोत

महिलांना मासिक पाळीमध्ये होणारा त्रास हा एका दिवसाच्या सुट्टीने कमी होणार आहे का ? मुळात सगळ्याच महिलांना मासिक पाळीत त्रास होतो का ?आणि सरसकट सगळ्याच महिलांना ही सुट्टी हवी आहे  का ? असे बरेच प्रश्न या प्रतिक्रिया पाहिल्यावर उपस्थित होतात. एकीकडे आपण महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जातेय, असं म्हणतोय. अगदी गरोदर महिला नवव्या महिन्यापर्यंत ऑफीसला जाऊन काम करण्याची तयारी दाखवते. एवढंच काय तर आपण दररोज टेलिव्हिजन वर पाळीच्या दिवसात कसं बिनधास्त काहीही करू शकतो हे सांगणाऱ्या जाहिराती पाहतो. मग केवळ  एका सुट्टीसाठी महिलेला होणारा त्रास, तिचं दुखणं लगेच एवढं मोठं कसं झालं ?


मी स्वतः योगा आणि जिम ट्रेनर आहे आणि पाळीच्या दिवसात वर्कआउट करते. एवढंच नाही तर, माझ्या जिममध्ये बऱ्याच महिला पाळीच्या दिवसातही व्यायाम करायला येतात. माझं फक्त त्यांना एवढंच सांगणं असतं की , त्रास होतोय तर करू नका. पण ज्यांना पाळीच्या दिवसात त्रास  होत नसेल त्या बिनधास्त वर्कआउट करू शकतात. फक्त आम्ही त्या दिवसांत पोटावर प्रेशर येईल किंवा श्वासोच्छवास करताना त्रास होईल ( उदा. कपालभाती) अशी आसनं त्यांना करू देत नाही.

- अंजू गुप्ता 

( जिम- योगा ट्रेनर )



ज्या सुट्टीसाठी एवढी चर्चा सुरु आहे त्यात फक्त ऑफीसमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांचाच समावेश आहे. जर 'त्या' दिवसात बाईला त्रास होतो म्हणून अशा सुट्टीची मागणी केली जातेय. तर , शाळेत जाणाऱ्या मुलींना हा त्रास होत नाही का? की त्यांचं दुखणं कमी असतं? घरात दिवसभर राबणाऱ्या महिलेचं काय? त्यांना मिळते का सुट्टी? आज पाळी आली, थोडं काम कमी कर असं कुटुंबातलं कुणी तिला सांगतं का? उलट 'पाळी आली आहे किचनमध्ये येऊ नकोस. बाहेरच्या बाहेरच तुझी कामं उरक.' अशी मुक्ताफळं उधळणारी तोंडच आपल्या कुुटुंबव्यवस्थेत अजूनही आहेत. 

जगभरातल्या  अनेक देशांमध्ये मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी दिली जाते. इटली, चीन, दक्षिण कोरिया, जपान आणि तैवानमध्येही मासिक पाळीची सुट्टी दिली जाते. त्याचप्रमाणे देशात सध्या काही खाजगी कंपन्या आपल्या महिला कर्मचा-यांनाा अशी रजा देत आहेत. मग मुंबईतही मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना सुट्टी का देऊ नये? असा ही प्रश्न उपस्थित केला गेला होता. आता माझा प्रश्न इतकाच आहे की, ज्या देशांची नावं आता घेतली गेली, त्यातल्या कुठल्या देशात महिलेला इथल्यासारखी वागणूक दिली जाते, हे कुणीतरी सांगावं. किती देशात आपल्याकडच्या परंपरेप्रमाणे स्त्रीला मासिक पाळीच्या दिवसांत कोपऱ्यात बसवलं जातं?



शाळेतल्या मुली त्यांच्या शिक्षिकांशी बोलू शकतात. ऑफीसमध्ये काम करणाऱ्या महिला त्यांच्या बॉसशी कस बोलणार?अशी ही प्रतिक्रिया नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी दिली. म्हणून मी अशा काही कंपनीच्या महिलांशी संवाद साधला, जिथे बॉस 'पुरुष' आहे. आणि या प्रातिनिधीक प्रतिक्रिया ऐकून 'पुरुषाला' बाईचं दुखणं कळत नाही असा विचारही डोक्यात येणार नाही.


पुरुषालाही स्त्रीचं दुखणं कळतं


मी गेली २ वर्ष  *** कंपनीत काम करतेय आणि मला माझ्या पाळीच्या दिवसांत नेहमी नाही पण बऱ्याचदा त्रास होतो. अशा वेळी मी ऑफीसला येते. पण जास्तच त्रास व्हायला लागला तर मी खरं कारण सांगून लवकर निघते. विशेष म्हणजे 'तू निघालीस तरी चालेल' हे सांगणारा माझा बॉस 'पुरुष'च आहे. 

- सुरेख माने


मी ज्या कंपनीत काम करते तिथे माझे सिनिअर पुरुष आहे. माझ्या टीममध्ये ही मुलांची संख्या जास्त आहे. सुरुवातीला मलाही वाटायचं की आपण 'अशा' विषयांवर उघड कसं बोलायचं? पण नंतर 'माझ्या पोटात दुखतंय' किंवा 'माझी कंबर आज खूप दुखतेय' असं म्हटल्यावर सिनियर्सनाही  समजायचं की, माझी पाळी सुरु आहे. अशा परिस्थितीत माझी काळजी करणारेही तेच असतात. 

- संपदा जोशी



पुरुषांच्या घरातही त्यांची बहीण, आई असतात. त्यांनाही मैत्रिणी असतात. एवढंच काय, आजकाल मुलांना प्रेयसीमुळेही बऱ्याच गोष्टी समजत असतात. मग पुरुषांशी कसं बोलायचं, हा विचारच मुळात मनात यायला नको.

ज्या महिलांना या सुट्टीची गरज आहे, ज्यांना फायदा होणार आहे त्यांना ती नक्कीच मिळावी. पण ह्या सुट्टीचा गैरवापर होणार नाही कशावरून? ही सुट्टी विनाकारण 'हक्काची सुट्टी' बनू नये.   तोपर्यंत 'ती' खंबीरपणे सगळ्याच गोष्टींना तोंड देत आली आहे आणि यापुढेही देत राहील. या एका सुट्टीपेक्षा 'तिला' त्रास होणाऱ्या बऱ्याच गोष्टींवर बोलायची आणि त्यावर उपाय शोधायची गरज आहे, त्यांच्या व्यथा जाणून घ्यायच्या आहेत. या विषयांवर बोलणं जास्त महत्वाचं वाटत नाही का?      


हे ही वाचा

मासिक पाळी..समज कमी, गैरसमज जास्त!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा