या विकृतांना ठेचायलाच हवं!

Mumbai
या विकृतांना ठेचायलाच हवं!
या विकृतांना ठेचायलाच हवं!
See all
मुंबई  -  

तो एकटक तिच्याकडे पाहत होता. तिनं त्याला पाहताना बघितलं. पण दुर्लक्ष केलं. पण पुढे जे झालं ते खूप भयानक होतं. त्यानं पँटची चेन उघडली आणि तो तिच्यासमोर अश्लील चाळे करू लागला. ती एवढी घाबरली होती की, काय करावं हे सुचतच नव्हतं. तिथून निघून जाणंच तिला योग्य वाटलं. अशा परिस्थितीत बहुतांश महिला हेच करतात.


सीएसटीएमवरचा धक्कादायक प्रकार

पुण्याच्या इशा चिटणीसला मुंबईत आल्यावर अशाच प्रसंगाचा सामना करावा लागला. नाशिकला जायचं म्हणून इशा सकाळी लवकरच सीएसटीएमला पोहोचली. सीएसटीएमवरुन ६.१५ ला सुटणारी तपोवन एक्स्प्रेस इशाला पकडायची होती. ती वेेळेच्या अर्धा तास आधीच सीएसटीएमला पोहोचली. तपोवन एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मवर उभी होती. पण कोचच्या सर्व लाइट्स बंद होत्या. त्यामुळे इशा आत न जाता मैत्रिणीची वाट बघत तिथेच उभी राहिली. तेवढ्यात एका तरूणाला तिनं कोचमध्ये जाताना पाहिलं. तो तिच्याकडेच पाहत होता. सुरुवातीला तिनं दुर्लक्ष केलं. पण तो तरुण तिच्याकडेच बघत होता. त्यानं पँटची झिप उघडली आणि तो हस्तमैथुन करू लागला. 

या प्रकारामुळे घाबरलेली इशा दुसरीकडे जाऊन उभी राहिली. पण तिथेही तो तिच्या समोरच्या बोगीत जाऊन उभा राहिला आणि पुन्हा अश्लील चाळे करू लागला. अखेर तिनं हिंमत करुन त्याचा व्हीडिओ शूट केला. तेवढ्यात इशाची मैत्रिण आली. तरी पण त्या व्यक्तीचा तो प्रकार सुरूच होता. शेवटी इशा रेल्वे पोलिसांना तक्रार देण्यासाठी गेली. तिचा व्हीडिओ पाहून एक पोलिस तिच्यासोबत आला. पण पोलिसांना पाहून त्या तरुणाने तिथून पळ काढला होता. पोलिसांनीही 'तुम्ही दुसऱ्या कोचमध्ये बसा' असा सल्ला दिला आणि तिथून काढता पाय घेतला. 

इशानं तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराचा विरोध करायचं ठरवलं आणि घडलेली घटना फेसबुकवर व्हीडिओसोबत शेअर केली. प्रसारमाध्यमांनी या घटनेची दखल घेत इशानं दाखवलेल्या हिंमतीचं कौतुक केलं. व्हीडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी अशोक प्रधान या तरुणाला अटक केली.कॉलेजमध्ये असताना मला असा अनुभव आला आहे. मी आणि माझी मैत्रिण विद्याविहार स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होतो. रात्रीचे ८-९ वाजले होते. त्यामुळे फार गर्दी नव्हती. आमच्या समोर एक व्यक्ती बसला होता. तो आमच्याकडे बघून हस्थमैथुन करत होता. मला प्रचंड राग आला. मी त्याच्याकडे रागानं पाहिलं . पण तरीही त्याचं तेच चालू होतं. माझी मैत्रिण खूप घाबरली. त्याच्याकडे दुर्लक्ष कर असाच सल्ला तिनं दिला. पण ते माझ्यासाठी शक्य नव्हतं. माझा राग अनावर झाला आणि अखेर मी उठून तिकडे गेले. त्याला चार शब्द ऐकवले आणि पोलिसांना बोलवण्याची धमकी देली. तेव्हा तो घाबरला आणि तिथून पळाला.

रुपाली शिंदे


पवईतही विकृत मानसिकता

इशा चिटणीससोबत झालेली घटना ताजी असतानाच गुरुवारी अशीच एक घटना पवईत घडली. दुचाकीवरुन आलेल्या एका विकृत तरूणानं कॉलेजमधून परतणाऱ्या चार विद्यार्थिनींना गाठून त्यांच्यापुढे अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला. काॅलेजमधून घराकडे जाण्यासाठी निघालेल्या चार विद्यार्थिनी पवई हिरानंदानी येथून जात होत्या. तेवढ्यात गलेरिया माॅलजवळ इटेर्निया बिल्डिंगच्या समोर एक निळ्या रंगाची मोटरसायकल येऊन थांबली. या मोटसायकलवर बसलेल्या विकृत तरूणानं 19 वर्षीय तक्रारदार तरुणी आणि तिच्या मैत्रीणींसमोर हस्तमैथुन करायला सुरुवात केली. घाबरलेल्या विद्यार्थिनींनी त्वरीत 100 क्रमांकावर मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन केला. मात्र घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी विद्यार्थिनींकडून माहिती घेण्याचे सोडून 'तुम्ही घरी जा, आम्ही बघतो', असे म्हणून त्यांना तेथून पळवून लावले. त्यानंतर हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र पोलिसांना जाग आली. त्यांनी महिला पोलिसांचे एक पथक तक्रारदार विद्यार्थिनींच्या घरी पाठवून तक्रार नोंदवून घेतली.


चालत्या ट्रेनमध्ये अश्लील चाळे

पूजा नायर या तरूणीलाही अशा घटनेचा सामना करावा लागला होता. तिनंही तिचा अनुभव फेसबुकवर शेअर केला.

मुलुंडला राहणारी पूजा नायर 24 मे रोजी बोरीवलीहून चर्चेगेटच्या दिशेने जात होती. महिला डब्याला लागून असलेल्या अपंगांच्या डब्यात उभा असलेला विकृत महिलांना पाहून अश्लील चाळे करत होता. तो अर्वाच्य भाषा देखील वापरत होता. हा विकृत एवढ्यावरच थांबला नाही तर, चक्क महिलांना पाहून हस्तमैथुन करू लागला. त्यावेळी पूजाने रेल्वे हेल्पलाइन नंबरवर फोन केला. पण तिथे असलेल्या आरपीएफ जवानाकडून त्वरित कारवाई झाली नाही. गाडी कांदिवलीला येताच हा विकृत अपंगांच्या डब्यातून उतरला आणि त्याने पूजाला बलात्कार करण्याची धमकी दिली. त्यानंतर इतर महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर हा विकृत तिथून पळाला. त्यानंतर हा सगळा प्रकार पूजाने फेसबुकवर शेअर केल्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला.


दिवसाढवळ्याही महिला असुरक्षितच

सर्वात धक्कादायक म्हणजे दिवसाढवळ्याही अशा घटना घडत आहेत. फेब्रुवारी २൦१७ मध्ये अशीच एक घटना चर्चगेट स्टेशनबाहेर घडली होती. चर्चगेट स्टेशनवर प्रवाशांची चांगलीच वर्दळ असते. पण अशा ठिकाणीही अशा घटना घडतात हे लज्जास्पद आहे. पीडित महिला आपल्या नातेवाईकाला सोडायला चर्चगेट स्टेशनला आली होती. ती स्टेशनबाहेर उभी असताना तिच्यामागे येऊन एक व्यक्ती उभी राहिली. त्याच्याकडे तिचं लक्ष नव्हतं. तो तिच्याकडे बघून हस्थमैथुन करू लागला. नंतर तो तिथून निघून गेला. त्या महिलेला नक्की काय झालं हे कळत नव्हतं. पण तिच्या बाजूला उभ्या असलेल्या एका प्रवाशानं घडलेला प्रकार पाहिला होता. त्यानं त्या महिलेला सांगितलं. तसंच मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हीडिओही दाखवला. त्यानंतर महिलेनं पोलिसांना कॉल केला. या प्रकरणातील आरोपीला अटकही करण्यात आली.


घराजवळही विकृतांची वाईट नजर

रेल्वे स्टेशनचं काय घेऊन बसलात? महिला त्यांच्या घराजवळच्या परिसरातही सुरक्षित नाहीत. मालाडमध्ये एक महिला आपल्या मुलांसोबत इमारतीत उभी असते. अचानक एक विकृत तिकडे येतो आणि तिच्यासमोर अश्लिल चाळे करायला सुरुवात करतो. फक्त अश्लील चाळेच नाही, तर तो तिच्याशी अंगलट करू लागला. महिलेनं आरडा ओरडा सुरू केला तेव्हा त्यानं तिकडून पळ काढला.

या घटनांवरुन कुठेतरी आपली सुरक्षा यंत्रणा कमी तर पडत नाही ना? असाही प्रश्न मनात डोकावतो. 'रेल्वेमध्ये महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत' अशी घोषणा मध्यंतरी करण्यात आली होती. पण पुढे त्या घोषणेचं काय झालं? महिला सुरक्षारक्षक सोडा, पण कधी-कधी तर नियुक्त करण्यात आलेले पोलीस देखील कंमपार्टमेंटमध्ये नसतात.

दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढच होत आहे. लोकल, बस आणि इतर गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना भोवतालच्या चोरट्या नजरा, किळसवाणे स्पर्श, घाणेरड्या कमेंट्स आणि अश्लील हावभाव यासारखे प्रकार स्त्रियांना नेहमीच झेलावे लागतात. पण प्रश्न पडतो की कुठून येते ही विकृती?

बहुतांश महिला अशा घटनांचा विरोध करायला घाबरतात. पण महिलांच्या याच मौन बाळगण्याच्या वृत्तीमुळे अशा विकृतांची हिंमत अधिक वाढते. पण आता अशा लोकांना न घाबरता त्यांना अद्दल घडवणं फार गरजेचं आहे. कधी तुमच्यासोबत अशी घटना घडली तर घाबरू नका. त्या व्यक्तीला जाब विचारा किंवा त्याचा फोटो घेण्याचा प्रयत्न करा. जेणेकरुन तुम्ही पोलिसांना पुरावा म्हणून दाखवू शकता, गुन्हेगाराला अटक होऊ शकते. त्यामुळे आता महिलांनी स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी स्वत: घेणं आवश्यक आहे.
हेही वाचा

शिवाजी पार्कात अभिनेत्रीचा विनयभंग

चर्चगेट स्थानकावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.