Advertisement

मानवी तरंग आणि भावना टिपणारा चित्रकार


मानवी तरंग आणि भावना टिपणारा चित्रकार
SHARES

एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्यातून पांढऱ्या शुभ्र कागदावर उमटून आलेलं चैतन्यदायी चित्र मनाला प्रसन्न करतं. रंग, रूप, जमीन, आकाश अगदी एखादी निर्जीव वस्तूही चित्रकार आपल्या चित्राद्वारे जिवंत उभी करतात. ठिपके आणि रेषांच्या सहाय्यानं चित्रकार आविष्कार घडवतात. कागदावर उमटणाऱ्या प्रत्येक छटा अगदी भिन्न असतात. पण एकदा रंगांचा खेळ सुरू झाला की पांढरा शुभ्र कागद जिवंत वाटू लागतो. अशीच काहीशी जादू मुंबईतले प्रसिद्ध चित्रकार प्रवीण गांगुर्डे यांच्या चित्रात पाहायला मिळते. मानवी मनाचे प्रतिबिंब आणि वैशिष्ट्य, भावनांचे तरंग प्रवीण गांगुर्डे यांच्या चित्रातून तुम्हाला अनुभवायला मिळतील.

नुकतंच प्रवीण गांगुर्डे यांना सर्वोत्कृष्ट चित्रकार म्हणून दुबईत गौरवण्यात आलं. गेल्या तीन वर्षांपासून दुबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय चित्र आणि शिल्प महोत्सव 'वर्ल्ड आर्ट दुबई' भरवला जातो. ‘दुबई वर्ल्ड आर्ट’ महोत्सवाचं हे तिसरं वर्ष आहे. या वर्षी महोत्सवात जगभरातल्या ३५ देशांचे कलाकार सहभागी झाले होते. या महोत्सवात पहिला क्रमांक जपानला तर दुसरा क्रमांक फ्रान्सला मिळाला आणि तिसरा क्रमांक भारताचे चित्रकार प्रवीण गांगुर्डे यांना मिळाला. दुबईमधल्या प्रसिद्ध भारतीय उद्योजक आणि इंडिया क्लबचे अध्यक्ष वासु श्रॉफ यानी इंडिया क्लबमध्ये झालेल्या विशेष समारंभात प्रवीण गांगुर्डे यांचा मानचिन्ह देऊन सत्कार केला.


आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढा आनंद प्रवीणची चित्र पाहून तुम्हाला होईल. कारण चित्रातील भौमितिक योजना तुमचे लक्ष वेधून घेतात. तुम्हाला एखादी गोष्ट आवडते ते फक्त ती गोष्ट सुंदर आहे म्हणून नव्हे, तर त्याच्या अंतररचनेतील कंगोरे आणि मनाच्या पाकळ्या सुंदर आहेत म्हणून. त्यामुळेच सुंदरतेचे प्रणय प्रवीणच्या चित्रामध्ये दडले आहे.

-सुनिल शेगावकर, सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रकार आणि विचारवंत

फक्त सातासमुद्रापारच नाही तर त्यांच्या या यशाचं भारतातही कौतुक करण्यात आलं. मुंबईत परतल्यावर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विजय कांबळे यांच्या हस्ते प्रवीण गांगुर्डे यांचा सत्कार करण्यात आला.मानवी स्वभावाच्या सूक्ष्म पैलूंना छेडण्याचे धाडस प्रवीण आपल्या शैलीतून करतो. त्यामुळे प्रवीणची चित्रे बघून मानवी मन प्रसन्न होत असते.

-सुभाष तुलसीता, सुप्रसिद्ध चित्रकार आणि कला समीक्षक

चित्रकार प्रवीण गांगुर्डे हे 'आर्ट मुद्रा' या आंतरराष्ट्रीय आर्टिस्ट संस्थेच्या माध्यमातून 'वर्ल्ड आर्ट दुबई' या स्पर्धेत सहभागी झाले. ‘आर्ट मुद्रा’ या संस्थेच्या संचालिका दक्सा खांडवाला आहेत. आर्ट मुद्रा ही संस्था कलाकारांना प्रोत्साहन देते. 'वर्ल्ड आर्ट दुबई' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवीण गांगुर्डे यांची चित्रे दुबईला पाठवण्यात आली होती. त्यानंतरच प्रवीण गांगुर्डे यांच्या चित्रांना पसंती देण्यात आली आणि त्यासोबतच स्पर्धेत सहभागी होण्याची मान्यता मिळाली.


मानवी तरंग, भावना यांची घालमेल तुम्हाला माझ्या चित्रात पाहायला मिळेल. ‘वर्ल्ड आर्ट दुबई’ स्पर्धेला जाण्यापूर्वी गेले सहा महिने नाईफच्या मदतीनं चित्र काढण्याचा सराव करत होतो. कशा प्रकारे मी आपल्या भावना व्यक्त करू शकतो आणि दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो याकडे माझे लक्ष असते. माझ्या मनातील भावना मी संगतीद्वारे मांडतो. गाणी ऐकत मी चित्र काढतो. चित्रात नैराश्य दाखवायचे असेल तेव्हा मी सॅड गाणी लावतो. नंतर नंतर मी रोमँटिक गाणी लावून चित्र काढतो. म्हणजे माझ्या चित्रात तुम्हाला निगेटिव्हकडून पॉजिटिव्हकडे अर्थात नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्याचा मार्ग दिसेल.

- प्रवीण गांगुर्डे, प्रसिद्ध चित्रकार


बहुतांश चित्रकारांना बंदिस्त राहणे आवडत नाही. त्याप्रमाणेच प्रवीण गांगुर्डे यांनाही एका पिंजऱ्यात बांधील राहणे पसंत नव्हते. म्हणून त्यांनी फ्रीलान्सिंग सोडून चित्रकला या क्षेत्रात पाऊल ठेवले. दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर अशा अनेक दिग्गज व्यक्तींसाठी प्रवीण गांगुर्डेंनी चित्रं साकारली आहेत. आतातर प्रवीण गांगुर्डे यांनी सातासमुद्रापार जाऊन भारताची मान उंचावली आहे. त्यांच्या या यशाला ‘मुंबई लाईव्ह’चा सलाम!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा