Advertisement

'ती' दिवसभर हेल्मेट घालून का फिरते? वाचा...


'ती' दिवसभर हेल्मेट घालून का फिरते? वाचा...
SHARES

रविवारचा दिवस असल्यामुळं मॉलमध्ये शॉपिंग करायला गेले होते. सुट्टीचा दिवस असल्यानं अपेक्षेनुसार मॉलमध्ये रोजपेक्षा जास्त गर्दी होती. पण एवढ्या गर्दीतही माझी नजर तिच्यावर गेली. माझीच काय मॉलमधील प्रत्येक व्यक्ती तिच्याकडं आश्चर्यानं पाहात होता. कारणही तसंच होतं म्हणा. मॉलमध्ये एक महिला चक्क हेल्मेट घालून फिरत होती. 

रस्त्यावर टू व्हिलर चालवताना हेल्मेट अावश्यकच. पण ही महिला मॉलमध्ये हेल्मेट घालून का फिरतेय? असा प्रश्न इतरांप्रमाणं माझ्याही मनात आला. कदाचित ती हेल्मेट डोक्यातून काढायला विसरली तर नसेल? पण असं कसं शक्य आहे? असे प्रश्न डोक्यात घोळत असताना न राहून मी तिच्यापुढं जाऊन उभी राहिले आणि तिला विचारलंच एक्सक्युजमी, तुम्ही मॉलमध्ये हेल्मेट घालून का फिरत आहात? मॅडमच्या चेहऱ्यावर हसू आलं. कारण हा प्रश्न तिच्यासाठी नवीन नव्हता. तिनं मला हेल्मेट घालण्यामागचं कारण सांगितलं, ते असं...



वांद्र्यात राहणारी लिसा सदाना घराबाहेर पडते तीच मुळात हेल्मेट घालून. मॉल, बाजारपेठ, मुलांची शाळा, एखादा कार्यक्रम, अशा सर्वच ठिकाणी ती हेल्मेट घालून जाते. कारण टू व्हिलर चालवताना प्रत्येक चालकानं हेल्मेट घातलंच पाहिजे, हा महत्त्वपूर्ण संदेश तिला द्यायचा असतो. हा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी लिसानं ही अनोखी शक्कल लढवली आहे. 

हेल्मेट घालून सार्वजनिक ठिकाणी बिनदिक्कतपणं वावरणाऱ्या लिसाला पाहून अनेकजण उत्सुकतेपोटी का होईना, हेल्मेटसंदर्भातला प्रश्न विचारतात आणि तिला आपलं म्हणण मांडण्याची आयती संधीच मिळते. मग काय? लिसा समोरच्या व्यक्तीला हेल्मेट घालून गाडी चालवण्याचं महत्त्व सांगते आणि इतरांनाही आपल्या जनप्रबाेधनाच्या कामात सामील करून घेते. त्यामुळंच वांद्र्यात लिसा 'हेल्मेट गर्ल' नावानं ओळखली जाते.



“मला यापूर्वी तीन गंभीर अपघात झाले आहेत. श्रीलंकेत रहात असताना मला पहिल्यांदा अपघात झाला. तर दुसरा अपघात पुण्यात रहात असताना झाला. मी आणि माझी मैत्रिण टू व्हिलरवरून जात असताना हा अपघात झाला. हेल्मेट न घातल्यानं माझ्या मैत्रिणीच्या डोक्याला २० टाके पडले होते. तर मला किरकोळ लागले होते. मैत्रिणीनं हेल्मेट घातलं असतं, तर तिच्या डोक्याला गंभीर मार बसला नसता, असं मला डॉक्टरांनी सांगितलं. 

तिसरा अपघात झाला तेव्हाही मी हेल्मेट न घालता गाडी चालवत होते. एका रिक्षानं माझ्या गाडीला जोरदार धडक दिली. त्यात मला आणि माझी मुलगी लेयाला जबर दुखापत झाली. माझी मुलगी तेव्हा फक्त सहा वर्षांची होती. तेव्हापासून माझ्या मनात ड्रायव्हिंगची भीतीच बसली. मग मी ठरवलं की आता हेल्मेटशिवाय गाडी चालवायचीच नाही. हेल्मेटचं महत्त्व तेव्हा मला कळालं. तेव्हापासून मी सार्वजनिक ठिकाणी हेल्मेट घालून जनजागृती करते.



लिसाची मुलगी लेया सदाना आणि मुलगा अंगत सदाना हे देखील हेल्मेट घालून जनजागृती करतात. प्रसिद्ध कलाकार आणि चित्रपट निर्माते कमल सदाना लिसाचे पती आहेत. ते सुद्धा जनजागृतीपर व्हिडिओ बनवण्यात लिसाला मदत करतात.

लिसा जर वाहतूक सुरक्षेचे सर्व नियम पाळू शकते, मग आपण का नाही? लिसाचा बोध घेऊन आता तरी मुंबईकरांनो नियम पाळा.  




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा