15 मे ला सावली होणार गायब !

 Mumbai
15 मे ला सावली होणार गायब !

येत्या 15 मे रोजी मुंबईतून सावली गायब होणार आहे! हे वाचून मुंबईकरांना कदाचित धक्का बसू शकेल. पण हे खरं आहे. मनुष्यप्राण्यांसोबत कुणी असो वा नसो, पण त्यांची सावली कधीही पाठ सोडत नाही. ते जातील, तिथे त्यांची सावली सतत साथसोबत करत असते. मात्र वर्षभरात असा एक दिवस येतो, ज्या दिवशी ही सावलीही सोबत सोडते. ज्याला ‘झिरो शॅडो डे’ असं म्हणतात. दक्षिण मुंबईत येत्या 15 मे ला याचप्रकारे 'शून्य सावली'चा दिवस अनुभवता येणार आहे. तर, राज्यभरात 6 ते 20 मे दरम्यान अनेक ठिकाणी 'शून्य सावली'चा दिवस अनुभवता येईल.


अशी होते सावली अदृष्य -

'शून्य सावली'च्या दिवशी सूर्य बरोबर आपल्या माथ्यावर येणार असल्याने मुंबईकरांना आपलीच सावली अदृश्य झाल्याचा अनुभव घेता येईल. सूर्याच्या उत्तरायण ते दक्षिणायनमधील प्रवासात सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची जागा बदलत असल्याने हे घडणार आहे.


वर्षातून दोन वेळा सावलीची नसते सोबत-

सावली अदृश्य होण्याच्या या प्रकाराला वैज्ञानिक भाषेत 'शून्य सावली दिवस' म्हणजेच 'झिरो शॅडो डे' असे म्हणतात. हा अनुभव वर्षांतून दोन वेळा आपल्याला घेता येतो. विषुववृत्तापासून सूर्य उत्तरेकडे साडेतेवीस अंशांवर जाताना आणि पुन्हा विषववृत्ताकडे परतण्याची सुरूवात करताना हा अनुभव आपल्याला घेता येतो. या दोन्ही काळात जेव्हा भरदुपारी सूर्य बरोबर आपल्या माथ्यावर येतो, तेव्हा आपली सावली अदृष्य होते.

सूर्य 21 मार्चपासून 21 जूनपर्यंत विषुववृत्तापासून उत्तरेकडे जात असतो, तर 21 जून ते 23 सप्टेंबर या कालावधीत सूर्य पुन्हा विषुववृत्ताकडे येण्यास सुरुवात होते. या प्रक्रियेमुळे राज्यभरात 6 ते 20 मे दरम्यान 'झिरो शॅडो दिवस' लोकांना अनुभवता येईल.

दक्षिण मुंबईत 15 मे रोजी दुपारी 12 वाजून 34 मिनिटांपासून ते 12 वाजून 36 मिनिटांदरम्यान 'शून्य सावली' अनुभवता येणार असल्याची माहिती मुंबईच्या नेहरू सेंटरमधील नेहरू प्लॅनेटेरिअमचे अध्यक्ष अरविंद परांजपे यांनी दिली.


पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात, तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि ती गायब झाल्याचे दिसते.


अशी येते 'काळरात्र'-

यामुळेच पृथ्वीवर ऋतूची निर्मिती होत असून हिवाळ्यात रात्र ही दिवसापेक्षा मोठी आणि उन्हाळ्यात दिवस हा रात्रीपेक्षा मोठा होतो. 21 डिसेंबर रोजी सूर्यकिरणे सरळ दिशेने मकरवृत्तावर पडतात. त्यामुळे ही वर्षातली सर्वात मोठी रात्र 'काळरात्र' म्हणून ओळखली जाते. तर 21 जून रोजी सूर्यकिरणे सरळ दिशेने कर्कवृत्तावर पडलेली असतात. त्यामुळे हा दिवस वर्षातला सर्वात मोठा दिवस ठरतो. खगोलशास्त्रातील अशाच रंजक घडामोडींमुळे येत्या15 मे ला मुंबईकरांना 'शून्य सावली' दिवसाचा अनुभव घेता येणार आहे.

इथेही असेल शून्य सावलीचा दिवस (6 ते 20 मे) -

6 मे – कोल्हापूर, 7 मे – सांगली, मिरज, 8 मे – कराड, 9 मे – चिपळूण, 10 मे – सोलापूर, सातारा, दापोली, 11 मे- वाई, तुळजापूर, 12 मे – बारामती, 13 मे – पुणे, कर्जत 14 मे – लोणावळा, 15 मे – नवी मुंबई, दक्षिण मुंबई, 16 मे – डोंबिवली, नांदेड,17 मे – शेगाव, शनिशिंगणापूर, 18 मे – श्रीरामपूर, 19 मे – जालना, 20 मे – नाशिक

Loading Comments