Advertisement

चिकू वाईन, चिकू सफारी आणि बरेच काही


चिकू वाईन, चिकू सफारी आणि बरेच काही
SHARES

जसा कोकणातला आंबा, नागपूरची संत्री, तसं डहाणू म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो चिकू. डहाणूला लाभलेला समुद्रकिनारा, चिकूच्या बागा हे खरं पर्यटनाचं आकर्षण आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन कोकणभूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था, महाराष्ट्र पर्यटन विकास आणि इतर स्थानिक संघटनांच्या पाठिंब्याने डहाणूमध्ये 'चिकू महोत्सव' आयोजित करण्यात आला होता.



डहाणूतल्या बोर्डी गावच्या निसर्गरम्य वातावरणात इथल्या बीचवर 'चिकू महोत्सव २०१८' आयोजित करण्यात आला होता. गेली पाच वर्ष पर्यटकांची पसंती मिळालेल्या चिकू महोत्सवाचं यंदाचं सहावं वर्ष होतं. २७ आणि २८ जानेवारीला पार पडलेल्या या महोत्सवात मुंबई, ठाणे, नाशिक, सूरत आणि गुजरात इथून पर्यटक आले होते.



डहाणू तालुक्यातील अर्थव्यवस्था ही चिकू या फळपिकावर अवलंबून आहे. चिकूला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा, यासाठी चिकू महोत्सवाची संकल्पना पुढे आली. यासोबतच स्थानिक महिलांना हस्तकला कौशल्ये सादर करण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं, हा या महोत्सवाचा उद्देश आहे.





चिकू महोत्सवाची खासियत

चिकू महोत्सवाच्या निमित्तानं ग्रामीण कारागीर, ग्रामीण खाद्यपदार्थ, लोककला आणि आदिवासी संस्कृती यांचं दर्शन पर्यटकांना झालं. खरंतर चिकू म्हटलं की आपल्याला आठवतो चिकू मिल्क शेक. पण चिकूपासून काय काय बनवता येऊ शकतं, याची भली मोठी यादीच आहे!



चिकू पावडर, चिकू चटणी, लोणची, चिकू मिठाई, चिकू वेफर्स, चिकू हलवा अशा अनेक चिकूच्या पदार्थांची मेजवानीच इथं चाखायला मिळते. याशिवाय खाण्याचे देखील अनेक स्टॉल्स इथं उभारण्यात आले होते.



इथे खाण्याची चंगळ तर होतीच, शिवाय मनोरंजनासाठी वेगवेगळ्या खेळांचं देखील आयोजन केलं होतं. अगदी आपण लहानपणी खेळलेल्या खेळांचाही यात समावेश होता. भवरा, गोट्या, चल्लसआठ अशा लहानपणीची आठवण करून देणाऱ्या अनेक खेळांचा आनंद यावेळी पर्यटकांनी लुटला.



वाळूचा किल्ला बनवणे, जुन्या खेळांची कार्यशाळा, वारली पेंटिंग, वेताची, खजुराच्या पानांची आणि रांगोळ्यांची कार्यशाळा देखील इथे भरविण्यात आली होती. प्रत्येक कार्यशाळेत एक नवीन आणि अनोखे कौशल्य शिकवण्यावर भर दिला गेला. त्यामुळे मोठ्यांसोबतच लहान मुलांनी देखील या महोत्सवात धमाल केली.



स्थानिक संस्कृतीचे दर्शन

या महोत्सवात स्थानिकांच्या खाद्यसंस्कृतीच नव्हे, तर लोककला सुद्धा पाहायला मिळाल्या. आदीवासी समाजाच्या नृत्यकला सादरीकरणामुळे पर्यटकांचं चांगलंच मनोरंजन झालं. या कार्यक्रमाचं उद्घाटन पुनीत डान्स अकादमी आणि योगिनी डान्स ग्रुप यांनी केलं. तेथे काही बँड्सचे प्रत्यक्ष सादरीकरणही झाले.





'अष्मिक पाटील अँड बँड' आणि 'जुईता पाटील अँड बँड' यांचे शास्त्रीय संगीताचे सादरीकरण झाले. पुनीत डान्स अकादमीनं नवरस डान्स अकादमी आणि आशुतोष शेट्टी ग्रुप यांच्याबरोबर शास्त्रीय आणि सांस्कृतिक नृत्य सादर केलं.

 


आदिवासींच्या बोहाडा नृत्याला पसंती

बोहाडा ही नृत्यपरंपरा गेल्या दोनशे वर्षांपासून जोपासली गेली आहे. आदिवासींचा सण म्हणून बोहाडा ओळखला जातो. मुखवट्यांचे नृत्य म्हणजे बोहाडा.



बोहाडा म्हणजे मुखवटेधारी सोंगे, पण ती सोंगे नसून कलाकार स्वत:च ते व्यक्तिमत्व आहोत, असे मानून अवतार घेत असतात.


चिकू सफारी आणि चिकू वायनरी टूरचं आयोजन

या महोत्सवात चिकू सफारीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. या सफारीमध्ये पर्यटकांना एक गाईड दिला जातो. त्यात त्यांना चिकूच्या बागांमध्ये नेलं जातं.



चिकूची झाडं कशी असतात? त्यांचं उत्पादन कसं घेतलं जातं? चिकू झाडावरून कसा तोडला जातो? त्याची काळजी कशी घेतली जाते? या सर्वांची माहिती चिकू फार्मचे मालक शाहरुख इराणी यांनी दिली.



चिकू सफारीसोबतच यावर्षीपासून चिकू वायनरीची टूर देखील आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी चिकू वायनरी टूर पहिल्यांदाच पर्यटकांना अनुभवता आली. यात चिकूपासून वाईन बनवण्याची प्रक्रिया कशी आहे? ती वाईन बाजारात कशी पोहोचवली जाते? याची माहिती या विषयातील तज्ज्ञ अजित बालगी यांनी दिली.




चिकू महोत्सव २०१३ पासून आयोजित करण्यात येतोय. दिवसेंदिवस चिकू महोत्सवाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा